रविवार, २ मार्च, २०१४

बंदुका सोडा , तराजू हातात घ्या ..................

गुर्जर बंधू मोठ्या संख्येने सैन्यात भरती का होत नाहीत ही  सतत होणारी टीका ऐकून ऐकून मोदींचा संयम ढळलेला दिसतो व शेवटी या आरोपाला त्यांनी उत्तर दिले. मोदी म्हणाले की सैनिकी पेशात जोखीम असते पण व्यापारात सैनिकापेक्षाही जास्त जोखीम घ्यावी लागते. म्हणजेच  व्यापार हा सैनिक पेशापेक्षाही उदात्त व्यवसाय आहे असे त्यांना सुचवायचे होते कि काय न कळे ? त्यांचे हे विधान अनेकांना आवडलेले नाही. 
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कारकुनी नोकऱ्यात धन्यता मानणाऱ्या मराठी तरुणांना "लेखण्या सोडा बंदुका हातात घ्या" असे आवाहन केले होते. मोदींच्या या ताज्या उपदेशामुळे जोखमीलाच  आवाहन समजणारी तरुणाई सैन्यात भरती होण्याऐवजी व्यापारात उडी घेण्याची शक्यता नाकारता येत नाही व त्यामुळे सैन्य दलाला जवानांची कमतरता भासण्याची समस्या उदभवू शकते. आधीच आयटी क्षेत्रात मिळणाऱ्या लाखोंच्या प्याकेज मुळे सैन्यात जाण्यास तरुण उत्सुक नसतात व सैन्यात काही हजार अधिकाऱ्यांची कमतरता आहे असे सांगितले जाते. मोदींच्या या विधानामुळे त्यात आणखी भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
 त्यातही सावरकर व मोदी यांच्या उपदेश करण्यात एक मुलभूत फरक आहे. तो असा की सावरकरांनी आपल्या प्रांतातील कारकुनी करणाऱ्या तरुणांचा धिक्कार केलेला आहे तर मोदी मात्र आपल्या प्रांतातील सैन्यात भरती होण्याकडे कल नसणाऱ्या तरुणांचे वकीलपत्र घेणारे विधान करत आहेत. त्यातही "आपल्या सैन्यदलाची सरकार नीट  काळजी घेत नाही व मी पंतप्रधान झाल्यावर यात प्राधान्याने लक्ष घालील" असेही  विधान केलेले आहे. त्यामुळे सैन्यात भरती होऊ इच्छिणारे तरुण येत्या लोकसभा निवडणुकीचा निकाल काय लागतो ते पाहू व मोदी पंतप्रधान झाले तरच सैन्यात भरती होऊ असा विचार करण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे सर्व चित्र फारच भयावह दिसते आहे. मात्र मोदींना आपल्या पंतप्रधानपदापुढे इतर सर्व गोष्टींचा विसर पडलेला दिसतो व वाशिंग्टनच्या कुऱ्हाडीसारखे ते आपल्या प्रत्येक भाषणात सपासप वार करत सुटले आहेत. आता तर जणू काही त्यांनी अप्रत्यक्षपणे,  बंदुका सोडा, तराजू हातात घ्या असाच संदेश युवकांना दिलेला आहे.  
राजेंद्र कडू

२ टिप्पण्या: