लोकसत्ताच्या दिनांक ०८/०२/२०१४ च्या अंकात गिरीश कुबेरयांनी लिहिलेल्या " बेगानी शादीमे…. " या लेखातील काही अंश
Published: Saturday, February 8, 2014
म्हणजे
एखाद्या भारतातल्या कंपनीत अमेरिकी प्रमुख नेमला गेला तर तिकडे त्याच्या
गावात पेढे वाटतात का? किंवा केक कापतात का? एखादं कुठलं आपल्या देशातलं
पारितोषिक एखाद्या ब्रिटिशाला जाहीर झालं तर आपलीच मान ताठ झाली असं समस्त
ब्रिटिशांना वाटलंय असं कधी झालंय का? किंवा ब्रिटनमधलं बुकर वगैरे तत्सम
पारितोषिक एखाद्या फ्रेंच वा जर्मन लेखकाला मिळाल्यावर तर तो फ्रेंच वा
जर्मन भाषेचाच सन्मान आहे.. अशी भावना त्या त्या भाषकांत दाटून आलीये.. असं
कधी अनुभवायला मिळालंय का? या सगळय़ा प्रश्नांचं उत्तर प्रामाणिकपणे
द्यायचं झालं तर नाही असं असेल.मग हे हास्यास्पद उद्योग करावं असं आपल्यालाच का वाटतं?
कारण आपण अजूनही वैचारिकदृष्टय़ा गुलामीच्या अवस्थेतच आहोत म्हणून.
वर उल्लेखलेल्या गुलामांच्या जथ्थ्याला आपल्यातल्या एखाद्याचं पळून जाणं हेच मोठं यश वाटायचं, तसंच आपलंही आहे. कोणीतरी देशाबाहेर जाऊन काही तरी दिवे लावतोय.. तर करा त्याच्या नावानं आरत्या. असं केल्यामुळे दोन गोष्टी साध्य होतात. इथे असलेल्यांना आपण किती गुणग्राहक आहोत हे दाखवता येतं आणि दुसरं म्हणजे फुकाचं राष्ट्रीयत्वही मिरवता येतं. यातल्या राष्ट्रीयत्वाला फुकाचं म्हणायचं ते अशासाठी की ज्यांच्या यशाच्या गुणगानाची स्पर्धा आपल्यात लागते त्यांचं यश काही त्यांना ते भारतीय आहेत म्हणून मिळालेलं नसतं. म्हणजे चला.. हा आला आर्यसंस्कृतीतला सद्गुणांचा पुतळा भारतीय..देऊन टाका त्याला वरचं पद.. असं काही कुठे घडलेलं नसतं. जे काही असेल ते त्यानं मेहनतीनं मिळवलेलं असतं.
म्हणजे खरं श्रेय ते मेहनतीचं. त्याकडे आपण लक्षच द्यायचं नाही. आणि मिरवायचं काय तर भारतीयत्व. मग कधीतरी एखादा रामकृष्णन खरं बोलून गेला तर ते लागतं आपल्याला.
आणि आणखी एक मुद्दा. तो असा की साजरं करण्याइतकं भव्यपण काय, हे कळतं का आपल्याला? उदाहरणार्थ सत्या नाडेला.
तो बिल गेट्स यांच्या मायक्रोसॉफ्ट्स कंपनीचा प्रमुख कार्यकारी अधिकारीपदी नेमला गेल्यावर समस्त भारतवर्षांला धन्य धन्य झालं. आपल्या मातृभूमीचे त्याने पांग फेडले असंच अनेकांना वाटायला लागलं. पण ही नियुक्ती आपण मिरवावी इतकी महत्त्वाची आहे का? खरं तर या नियुक्तीबद्दल आनंद साजरा करण्यापेक्षा आपल्याला भारतीय म्हणून लाज वाटायला हवी, अशी परिस्थिती आहे, याची जाण आपल्याला आहे का? याचंही खरं उत्तर नाही असंच असेल.
आज जगात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सर्वाधिक अभियंते भारतीय आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अनेक कंपन्यांत ज्येष्ठ ज्येष्ठ पदांवर भारतीयच आहेत. तेव्हा त्याचा आनंद साजरा करत असताना एक प्रश्न आपण आपल्याला विचारायला हवा.
माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातलं एक तरी उत्पादन भारतीयानं जन्माला घातलेलं आहे का मायक्रोसॉफ्ट. अॅपल. गुगल. फेसबुक. ट्विटर. विकिपीडिया. व्हॉट्सअॅप. झालंच तर गेलाबाजार याहू. ऑर्कुट.. यादी कितीही वाढवता येईल. यातलं आपलं काय? त्यावर काही जण सुबीर भाटिया आणि हॉटमेलचा दाखला देतील. पण सुबीर किती भारतीय आणि हॉटमेलचं आज काय झालंय हे सांगायची गरज नाही.
तेव्हा इतर कुणी काही तरी जन्माला घालायचं आणि आपण त्याचं पालनपोषण करायचं ही गुलामीच आपण करतोय, हे आपण लक्षात घ्यायला हवं. पण त्याच वेळी नवीन काही जन्माला घालायची ताकद आपण हरवून बसलोय, हेही ध्यानात घ्यायला हवं. आता ही बाब काय आपण साजरी करावी इतकी थोर आहे?
पण हे कुठं कळतंय आपल्याला?
बेगानी शादी में धुंद होऊन नाचणारा आपला भारतीय अब्दुल्ला दीवानाच आहे..
*********************************************************************************
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा