मराठी दिनाच्या (२७ फेब्रुवारी ) निमित्ताने
अमरावती शहरातील दोन सच्चे मराठी ……….
अमरावती शहरातील व्यावसायिक आपल्या व्यवसायाची जाहिरात करतांना बहुधा हिंदीतून करतांना दिसतात. वर्तमान पत्रातून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती एकवेळ मराठीतून प्रसिद्ध होतात. मात्र जाहिरात करण्याचा आणखी एक मार्ग म्हाणजे ऑटो रिक्षावर लाऊड स्पीकर द्वारे केल्या जाणाऱ्या जाहिराती, त्या मात्र हिंदीतूनच असतात. कारण ऑडीयो जाहिराती म्हणजे जाहिरातीला आवाज देणाऱ्यांला अमीन सयानी बनण्याची हुकमी संधी. आणि समस्त व्यावसायिक बंधूंनी असा गैरसमाज करून घेतला आहे की अमरावती शहरातील नागरिकांना हिंदी शिवाय इतर दुसरी कुठलीच भाषा समाजात नाही आणि अमरावतील " काही " लोकांना मराठी अजिबात समाजत नाही. वास्तव हे आहे की बोलालेले मराठी अमरावतीतील प्रत्येक नागरिकाला समजते. मग तो मारवाडी, गुजराती, सिंधी, पंजाबी, मुसलमान कुणीही असो. अशा या पार्श्वभूमीवर एक व्यावसायिक मात्र फक्त आणि फक्त मराठीतूनच आपल्या व्यवसायाची जाहिरात करतात ते प्रतिष्ठान म्हणजे मोतीनगर मधील पूनम इलेक्ट्रानीक्स. शहरात आता या प्रतिष्ठानाच्या बऱ्याच शाखा आहेत. यांची प्रत्येकच जाहिरात मग ती छापील असो कि ऑडियो मी फक्त मराठीतूनच केलेली पाहिलेली आहे व त्यासाठी मी पत्र लिहून त्यांचे अभिनंदनही केले आहे. या प्रतिष्ठानाचे संचालक सच्चे मराठी आहेत असे मी समजतो.
दुसरे असेच एक सच्चे मराठी म्हणजे राजकमल चौकातील दुग्धपुर्णा हे प्रतिष्ठान. माझ्या माहितीप्रमाणे हे दुकान फक्त उन्हाळ्यातच सुरु असते कारण हे शीत पेयांचे दुकान आहे. मात्र उन्हाळ्यात व्यवसायाला सुरुवात केल्या दिवसापासून स्थानिक वृत्तपत्रातून त्यांची जाहिरात सुरु होते. अर्थात या जाहिरातीत प्रसिद्धीचा मजकूर कमीच असतो मात्र दररोज उतमोत्तम मराठी कविता, त्याही नामवंत कवींच्या त्यातून प्रसिद्ध होत असतात. यांचा हा व्यवसायाचा हंगाम म्हणजे मराठी साहित्य रसिकांना एक मेजवानीच असते. माझ्या माहिती प्रमाणे या प्रतिष्ठानाचे संचालक हे रूढ अर्थाने मराठी नाहीत. तरीही त्यांनी आपल्या जाहिरातीत आवर्जून मराठी कविताच प्रसिद्ध कराव्यात याचे मला खूप अप्रूप वाटते. घराबाहेर पडल्यावर दोन मराठी माणसे आपसात मराठीत बोलतील की नाही याची खात्री नाही. आणि मंचावरून कार्यक्रमाचे संचालन करणाऱ्या मंडळींना तर संचलन करतांना फक्त शेरोशायरीच आठवते त्याशिवाय आपले संचलन दमदार होणार नाही यांची त्यांना धास्ती वाटत असते. कुसुमाग्रज किंवा विंदा यांच्या कवितेचा दाखला देतांना कुणी दिसत नाही. मराठी कवींना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत याचाही त्यांना विसर पडलेला असतो. असे असतांना दुग्धपुर्णाच्या संचालकांना मराठी कवितांची दाखल घ्यावीशी वाटली हे मराठीचे सौभाग्य आहे. व मराठी स्वाभिमान गीत लिहिणाऱ्या कविवर्य सुरेश भटांचा आत्मा त्यांना नक्कीच दुवा देत असेल.
वरील दोन्ही प्रतिष्ठानच्या संचालकांना मी वैयक्तिकरीत्या ओळखत नाही. किंवा ते काळे आहेत कि गोरे आहेत हेही मला माहित नाही. पण ते सच्चे " मराठी "आहेत हे मात्र नक्की.
राजेंद्र कडू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा