सोमवार, १७ मार्च, २०१४

मोदी आणि जयप्रकाशजी यांची प्राध्यापकी तुलना 

एका स्थानिक दैनिकाच्या दिनांक १७ मार्चच्या अंकात एका प्राध्यापक महाशयांचा नरेंद्र मोदी व पूज्य जयप्रकाशजी यांची तुलना करणारा लेख प्रसिध्द झाला आहे. त्यात त्यांनी या दोघांमधील बरीचशी साम्यस्थळे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. लेख वाचून भरपूर करमणूक झाली. आम्हा सगळ्यांच्या माहितीप्रमाणे जयप्रकाशजी हे गांधीजींचे वैचारिक वारस होते व सत्य, अहिंसा, सर्वसमभावाचे ते एक चालते बोलते प्रतिक होते. कुठल्याही जाती धर्माबद्दल त्यांच्या मनात द्वेष नव्हता. इंदिरा गांधीच्या आणीबाणी पर्वानंतर त्यांनी लोकमत संघटीत करून त्याविरुद्ध लढा दिला. मोदी मात्र सर्वधर्मसमभावाबद्दल प्रसिद्ध नाहीत. मी हिंदू राष्ट्रवादी आहे असे ते म्हणतात. अहिंसेचे ते पुजारी आहेत असेही म्हणता येणार नाही. गुजरात दंगली मध्ये शेकडो महिला पुरुष मुले मारली जात असतांना ते त्यांचे रक्षण करू शकले नाहीत. त्यांच्या राज्यात राज्याचा गृहमंत्री सुद्धा सुरक्षित नाही. वाजपेयींनी त्यांना राजधर्म न पाळल्याचे प्रमाणपत्र दंगली सुरु असतांनाच दिले होते. ते प्रखर राष्ट्रवादी आहेत असे ही म्हणता येणार नाही कारण अमेरिकेने त्यांना एकदा व्हिसा नाकारल्यानंतर पुन्हा पुन्हा ते लोचटासारखे व्हिसासाठी अर्ज करताहेत. अमेरिकेला काय सोने लागले आहे ते मोदीच जाणोत. 
सत्य आणि मोदी यांचाही छत्तीसचा आकडा दिसतो. कारण प्रत्येक भाषणात ते काहीनाकाही ठोकून देत असतात. त्यामुळे कॉंग्रेसने त्यांना " फेकू " म्हणजेच थापाड्या ही उपाधी प्रदान केली आहे. त्यांचा इतिहास हा विषय तर इतका कच्चा आहेकी त्यांनी त्याची शिकवणी लावावी. त्यांच्या स्मरणशक्तीचीही पुरती वाट  लागलेली आहे. जास्त जुन्या घटना त्यांना आठवत नाहीत. उदा. २००१ साली भाजपाच्या काळात १६ लष्करी जवानांना  बांगला देश सैनिकांनी हाल हाल करून ठार मारले होते ती घटना. आता ते चीन पाकिस्तानला धमकावताहेत. परंतु भाजपा सरकारने तीन दहशतवादी सन्मानपूर्वक काबूलला पोहोचवून दिले होते याचे मोदींना विस्मरण झालेले आहे.  भाजपाच्याच काळात देशाची मानबिंदू असलेल्या संसदेवर हल्ला झाला होता व मुशर्रफला बासुंदी खाऊ घातली होती. 
मोदींप्रमाणे प्राध्यापक महाशयांची सुद्धा स्मरणशक्ती कमकुवत दिसते. त्यांनी पुढीलप्रमाणे आपली विद्वत्ता दाखविली आहे. 
१) जगदीशचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेना स्थापन केली आहे. २) मार्शल टिटो  हे फ्रांसचे अध्यक्ष होते. ३) हिटलर अजूनही जर्मनांच्या गळ्यातला ताईत आहे. ( हिटलर च्या झेंड्यावर स्वस्तिक चिन्ह होते. नुकतेच लंडनमधील हिंदूंनी हिटलरमुले स्वस्तिक चिन्ह बदनाम झाले आहे म्हणून एका इमारतीवर ते चिन्ह लावण्यास मनाई केली आहे  हिटलरच्या अतिरेकी राष्ट्रवादामुळे जर्मनीचे दोन तुकडे झाले एवढेच नव्हे तर बर्लिन शहराचेसुद्धा दोन तुकडे होऊन एका भागातून दुसऱ्या भागात जायला पासपोर्ट, व्हिसा लागायला लागला नंतर साम्यवादी जर्मनीला लोकशाहीवादी जर्मनीत सामील व्हावे लागले .)  ४) चीन मधील लोक अजूनही माओला मानतात. ( कारण माओला न मानणारा अचानक दिसेनासा  होतो व नंतर तो कुणालाही जिवंत दिसत नाही म्हणून.  सत्ताधाऱ्यांना नको असलेली मंडळी अचानक भ्रष्टाचारी ठरून तुरुंगात डांबली जाते. शिवाय चीन मध्ये भ्रष्टाचाऱ्याची गय केल्या जात नाही असा गवगवा ही  केल्या जातो. ) ५) 
अशा प्रकारे प्राध्यापक महाशयांनी बरेच तारे तोडले आहेत. लेनिनने रशियात क्रांती केली ( प्रत्यक्षात लेनिनने तेथे एकाच पक्षाची हुकुमशाही आणली. १९९१ साली गार्बाचेव्ह यांनी पुन्हा लोकशाही प्रस्थापित केली आणि दडपशाहीतून मुक्त झालेल्या जनतेने लेनिनचे महाकाय पुतळे जमीनदोस्त केलेत. लेनिनवादी रशियात चहाच्या एका कपाला हजारो रुबल मोजावे लागत होते. आता तेथे लोकशाही असल्यामुळे जनता सुखाने नांदत आहे. ६) लेनिनमुळे रशिया अमेरिकेच्या बरोबरीत आला. ( लोकशाही वादी अमेरिकेने रशियाला शेकडो मैल मागे टाकले. नंतर रशिया खीळखिळा होऊन १९९१ साली त्याचे तेरा तुकडे झाले. ७) इस्त्रायलने सर्व अरब जगाला हलवून सोडले आहे. ( इस्त्रायलच्या अतिरेकी राष्ट्रवादामुळे संपूर्ण देश दहशतीखाली जगतो आहे. व दहशतवाद्यांचा मुकाबला करायसाठी तेथे पण जास्तीत जास्त संतती पैदा करण्यावर ते भर देताहेत. आपल्याकडेही काही मंडळी धर्मकार्यासाठी कमीत कमी पाच मुलांना जन्म द्यावा असा संदेश देत आहेत. )
तात्पर्य हेच की हुकुमशाही  ही सर्वत्र अपयशी ठरली असून लोकशाहीत कितीही दोष असले तरी दोष दूर करून तीच जनतेची तारणहार ठरू शकते हेच खरे आहे. प्राधयापकांसारखे बऱ्याच मंडळींना हिटलरच्या हुकूमशाहीचे आकर्षण निर्माण झाले आहे. परंतु त्यांची अवस्था " घी देखा लेकिन बडगा नही देखा " अशीच होण्याची शक्यता आहे. भारताच्या सभोवती लोकशाही नसलेल्या देशांची काय अवस्था आहे हे आपण पाहतोच आहे. प्राध्यापक महाशय त्यांच्या विद्यार्थ्यांना काय चुकीचुकीचे शिकवत असतील याची  त्यांचा  लेख वाचून कल्पना येते. देव त्या विद्यार्थ्यांचे कल्याण करो. ज्या दैनिकात हा लेख प्रसिध्द झाला आहे तेथील संपादकीय विभागातील कर्मचाऱ्याने न वाचताच हा लेख छपाई विभागाकडे पाठविलेला दिसतो. दिलेले संदर्भ जर चुकीचे असतील तर ते लिखाण वाचकांची पत्रे या विभागात प्रसिद्ध व्हायला पाहिजे. लेख म्हणून नव्हे. वाचकांचे अपप्रबोधन व्हायला नको हि काळजी वृत्तपत्रांनी घ्यायला हवी. 
राजेंद्र कडू   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा