मंगळवार, ४ मार्च, २०१४

यात चूक कोणाची ? ...............

एस्थर या तरुणीच्या खुनाच्या तपासात असे आढळून आलेकी वाहन चालक असलेली एक व्यक्ती तिला रेल्वे स्थानकावर भेटली व तो तिला ३०० रुपयात घरी सोडतो म्हणाला. परंतु बाहेर आल्यानंतर तिच्या असे लक्षात आलेकी त्याच्याकडे ट्याक्सी किंवा ऑटो सारखे कुठलेही भाडोत्री वाहन नसून तो तिला मोटारसायकलवरून घरी सोडून देणार होता. तिचा विश्वास बसावा म्हणून त्याने आपल्या वाहनाचा क्रमांक व आपला मोबाईल क्रमांक घरच्या लोकांना कळविण्यास सांगितले. एवढ्या गोष्टीवर विश्वास ठेऊन एस्थर त्या खुन्यासोबत गेली व स्वतःचा मृत्यू तिने ओढवून घेतला. यात अनोळखी व्यक्तीसोबत जाण्यात एस्थरनेच चूक केली आहे. 
शक्ती मील प्रकरणातसुद्धा पिडीत तरुणीने दिवस मावळतीला आला असतांना बंद पडलेल्या शक्ती मीलच्या निर्जन परिसरात जावयास नको होते. या दोन्ही प्रकरणात या मुलींनी स्वतःहून आपले दुर्दैव ओढवून घेतले असे नाइलाजाने म्हणावे लागते. जवळचा मार्ग म्हणून एखाद्या निर्जन भागातून गेल्यावर पुरुष मंडळींनासुद्धा लुबाडल्या गेले आहे किंवा त्यांना जीव गमवावा लागलेला आहे. अमरावती शहरात सुद्धा काही बाहेरगावी नोकरीसाठी बसने ये जा करणाऱ्या महिला अंधार पडलेला असूनही जवळचा मार्ग म्हणून सायन्स कोर मैदानातून जातात हे चूक आहे. अंधार पडल्यावरच नाही तर दिवसा उजेडी सुद्धा अशा जवळच्या मार्गाने जाणे महिलांसाठीच नाही तर पुरुष मंडळींसाठीसुद्धा धोक्याचे आहे कारण काही दुर्दैवी प्रसंग घडल्यास रस्त्याने जाणाऱ्या पादचाऱ्यांचे तुमच्याकडे लक्ष वेधल्या जायच्या आत तुमच्या अंगावरील दागिने किंवा पुरुष मंडळींच्या खिशातील रोकड पळविल्या जाऊ शकते. रात्रीच्या वेळेस काय होऊ शकते याची कल्पनाच केली जाऊ शकते. नंतर पोलिसांच्या नावाने बोटे मोडण्यापेक्षा आधीच काळजी घेतलेली बरी. 
राजेंद्र कडू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा