हुकूमशाहीचं मुसळ आणि 'इटालियन कनेक्शन'
Published: Friday, April 11, 2014 in daily loksatta dt. 11/04/2014
मतपेटीतून
हुकूमशाहीच्या संदर्भात 'लोकसत्ते'त जो काही पत्रव्यवहार सुरू आहे,
त्यातून मोदींच्या येण्याने फॅसिझम / हुकूमशाहीचा कसा धोका नाही हे संघ
परिवारातली मंडळी आपल्याला पटवून देण्याचा जो प्रयत्न करत आहेत, त्यात
आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. उलट नेहरू आणि (विशेषत:) इंदिरा गांधी
यांच्यात या प्रवृत्ती कशा होत्या हे सांगून पर्यायाने संघ परिवाराची
रंगसफेदी करण्याचा त्यांचा अविरत प्रयत्न लक्षात घेता काही गोष्टींचा
उल्लेख करणं आवश्यक आहे. कारण संघ परिवारातल्या व्यक्ती त्या उघडपणे
स्वीकारण्याची शक्यता धूसर आहे. रा. स्व. संघाची कल्पना जरी मूर्त स्वरूपात आणण्याचं श्रेय डॉ. हेडगेवारांना दिलं गेलं असलं तरी डॉ. मुंजे यांचा त्या संघटनेला फॅसिस्ट वळण देण्यावर भर होता. मुसोलिनीला ते १९३१ मध्ये इटलीत जाऊन भेटले होते आणि बालिल्ला आणि अवाँगार्दस्तिी या दोन (फॅसिस्ट) संघटनांनी आपण प्रभावित झाल्याचे त्यांनी आपल्या दैनंदिनीत नमूद केले आहे. िहदूंचे मोठय़ा प्रमाणात लष्करीकरण होणे आवश्यक आहे, लढाऊ जमाती आणि बिनलढाऊ जमाती हा ब्रिटिशनिर्मित भेद नष्ट झाला पाहिजे अशा अर्थाची विधाने त्यांनी केली आहेत. फॅसिझममुळे जनतेतील एकीवर भर दिला जातो असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्यावर फॅसिझमचा विलक्षण पगडा होता हे त्यांच्या सच्चा अनुयायांनाही नाकारता येणार नाही. हेडगेवारांची रा. स्व. संघ ही संघटना अशा विचारात बसत असल्याने आपल्या उर्वरित आयुष्यात आपण हेडगेवारांच्या कामाला स्वत:ला वाहून घेणार असल्याचे इटलीहून परत आल्यावर मुंजे यांनी नमूद केले आहे. भोसला मिलिटरी स्कूलची स्थापना करण्यामागे त्यांचा नेमका हाच हेतू होता.
नाझी जर्मनी आणि फॅसिस्ट इटली यांच्या धर्तीवर भारतात िहदूंची संघटना कशी निर्माण करता येईल; हिंदू समाजाचे प्रभावीपणे लष्करीकरण कसे करता येईल याचा विचार मुंजेंबरोबर हेडगेवारसुद्धा सतत करत होते. या संदर्भात हेडगेवार आणि मुंजेंच्या भेटीगाठीही झाल्या होत्या. या साऱ्याचा रा. स्व. संघाच्या कार्यपद्धतीवर प्रभाव होता हे उघड आहे. (आजची 'िहदुत्व' नावाची जी कल्पना आकाराला आली आहे तिच्यात हिंदू परंपरा फॅसिस्ट चौकटीत बसवण्याचा आटोकाट प्रयत्न सुरूआहे.)
धर्मशास्त्राप्रमाणे हिंदू धर्माचे प्रमाणीकरण होईल अशी काही योजना आपण आखली पाहिजे, असे मुंजे यांना वाटत होते. आपल्याला स्वराज्य हवे आहे; पण पूर्वीच्या काळात जसे शिवछत्रपती होते आणि आजच्या काळात जसे मुसोलिनी किंवा हिटलर आहेत, तशा हुकूमशहांची आपल्याला आवश्यकता आहे आणि तसे जोपर्यंत होत नाहीत, तोपर्यंत आपण हाताची घडी घालून स्वस्थ बसू शकत नाही; त्यासाठी आपण शास्त्रशुद्ध योजना आखून तसा प्रचार केला पाहिजे, असे मुंजेंचे मत होते. (माíझया कासोलारी या इटालियन विदुषीने अनेक कागदपत्रे तपासून संघाच्या या 'इटालियन कनेक्शन'वर विस्तृत भाष्य केलं आहे. त्याचा मराठी अनुवादही पुस्तिकेच्या रूपात उपलब्ध आहे.)
अर्थातच या साऱ्याचा संबंध 'स्वयंसेवक' मोदींपर्यंत पोचतो. आणि २००२ साली गुजरातमध्ये याची 'झांकी' त्यांनी प्रभावीपणे दाखवल्याने आपला हिंदू भद्रलोक मोदींवर जाम खूश आहे. हुकूमशाही प्रवृत्तीबद्दल- इंदिरा गांधी वा अगदी नेहरू असले तरी- गौरवण्यासारखे काहीच नाही. पण ती कुसळं काढून आपल्या डोळ्यातलं मुसळ लपवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर ते हास्यास्पद आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा