२४ महिनेतरी टिकतील काय ? ………
शिक्षक दिनाच्या (सॉरी गुरु दिवस) दिवशी एका विद्यार्थ्याने मोदींना विचारले , " पंतप्रधान होण्यासाठी काय करावे लागते." मोदींनी उत्तर दिले की २०२४ पर्यंत पंतप्रधान होण्याचा कुणी विचारही करू नये कारण २०२४ पर्यंत मीच पंतप्रधान आहे. एकूण लक्षणे मात्र अशी दिसताहेत की मोदी पंतप्रधानपदावर २४ महिनेतरी टिकतील की नाही अशी शंका वाटत आहे. यापूर्वी जनता लाटेत मोरारजी देसाई जनता पक्षाच्या लेबलखाली पंतप्रधान झाले होते. तेंव्हा जनतेचा एवढा दबाव होता की जनतेने आंदोलन करून नेत्यांना युती करण्यास बाध्य केले होते. मात्र जनतेचा एवढा सॉलिड सपोर्ट असूनही हे सरकार २८ महिन्यात कोसळले होते. वाजपेयी सरकारची सुद्धा राममंदिराची लाट असून आधी १३ दिवस नंतर १३ महिने अशा हप्तेवारीने त्यांनी राज्य केले. दुसरे असे की आताच्या या इंटरनेट युगात जनतेचे हिरो दरवर्षी बदलताहेत, आपल्या फेसबुक अकाउंटच्या प्रोफाईल पिक्चर सारखे. २०१२ चे जनतेचे हिरो होते अण्णा. २०१३ चे हिरो होते केजडीवाल. २०१४ चे हिरो आहेत मोदी. २०१५ मध्येही ते हिरो असतीलच असे नाही. हिरोला आपल्या कामगिरीत सातत्य ठेवावे लागते. आणि सगळी सोंगे आणता येतात पण विकासाचे, प्रगतीचे सोंग आणता येइलच असे नाही, कितीही मिडीयाला आपल्या दावणीला बांधले तरी. मिडीयाने कोंबडे झाकून ठेवले तरी जनतेचा दिवस उगवतोच उगवतो. .विधानसभांच्या पोट निवडणुकीत याची चुणूक दिसलीच. शिवाय एक उदाहरण दिसलेच की हिरो नसूनही मनमोहनसिंगांना लोकांनी २००९ मध्ये पुन्हा निवडून दिले होते. तेंव्हा २०२४ पर्यंत किंवा त्याहीपेक्षा जास्त मुदतीसाठी कोणी पंतप्रधान राहणारा " लंबी रेस का घोडा " कुणी असेल तर तो नॉन हिरो किंवा चरित्र अभिनेताच असेल असे मला वाटते. आपण टीव्ही वर पाहतोच की कालचा सुपरस्टार आज लक्स साबणाची जाहिरात करतो किंवा मग सत्यमेव जयते सारखे भरपूर बिदागी देणारे कार्यक्रम करतो किंवा चित्रपटांमध्ये रेडीओचा आडोसा घेऊन नग्न पोज देतो कारण नवीन चित्रपट फारसे मिळत नाही आहेत आणि ओम पुरी, नसिरुद्दीन शहा,अनुपम खेर सारखे खरे अभिनेता आपला दबदबा कायम ठेवून आहेत.--- राजेंद्र कडू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा