सोमवार, २ मार्च, २०१५

परशुरामाने एकवीसवेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली असे म्हणतात. म्हणजे त्या आधी २० वेळा तसा प्रयत्न करुनही तो यशस्वी झाला नाही असे यावरून सिध्द होते. आणि एकविसाव्या वेळी प्रयत्न करूनही तो यशस्वी झाल्याचे दिसत नाही. कारण अजूनही क्षत्रीय मराठा, क्षत्रिय राजपूत, क्षत्रिय किरात अशा जाती पोटजातीचे लोक अस्तित्वात आहेत असे दिसतात. म्हणजे परशुरामाचा हा सर्व खटाटोप अयशस्वी झालेला दिसतो. हे सर्व "विक्रम आणि वेताळ" या कथेतल्या सारखे वाटते. विक्रम पुन्हा पुन्हा वेताळाला झाडावरून काढायचा आणि त्याचे मौन भंग झाले की वेताळ पुन्हा झाडाला जाउन लोंबकळायचा. विक्रमाच्या या खटाटोपात आपला एक फायदा मात्र झाला. मुलांवर  चांगले  संस्कार करणाऱ्या बोधकथा जन्माला आल्या व त्यावर पिढ्यांपिढ्या पोसल्या गेल्या. परशुरामाचा हा उपक्रम मात्र याबाबतीत भाकड ठरला. तेंव्हा हिंसा सर्वत्र वर्ज्य. हिटलरही असाच तोंडघशी पडला होता. संपूर्ण ज्यू जमातीचा नायनाट करायचे त्याने ठरविले होते. त्यासाठी जर्मनीत त्याने छळ छावण्या उभारल्या होत्या. ज्यूंना एकगठ्ठा मारण्यासाठी मोठ मोठी ग्यास चेम्बर्स उभारली होती लाखो ज्यू मारलेही. मात्र ज्यू जमात नष्ट झाली नाही. उलट कुठलाही देश नसणाऱ्या ज्यूंना स्वतंत्र देश (इस्त्रायल) मिळाला. अमेरिकेततर  ज्यू लॉबी प्रबळ आहे, त्यांना विचारल्याशिवाय कुठलाही मोठा निर्णय घेतल्या जात नाही,  असे म्हणतात. हिटलराला मात्र स्वत:वर गोळी झाडून घ्यावी लागली. तेंव्हा पुन्हा एकदा म्हणावेसे वाटते, हिंसा सर्वत्र वर्ज्य.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा