रविवार, १४ जून, २०१५

स्वतंत्र विदर्भाचे तुणतुणे थांबवावे. 

नवीन महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होऊन सात महिने होऊन गेले आहेत. या निवडणुका होण्यापूर्वी विदर्भातील तीन थोर भाजप नेते; मा. नितीन गडकरी, मा. देवेंद्र फडणवीस, मा. सुधीर मुनगंटीवार; स्वतंत्र विदर्भ निर्मितीकरिता वारंवार निवेदने देत होते. महाराष्ट्रात प्रथमच भाजपची एकहाती सत्ता आली. खूप खूप वर्षांनी विदर्भातील एका तरुण नेत्यास मुख्यमंत्री होण्याची सुसंधी मिळाली. त्यानंतर जवळपास पाच महिने 'स्वतंत्र विदर्भ व्हायलाच पाहिजे' असे वक्तव्य, भाषण किंवा निवेदन, जाहीरपणे या त्रयींपैकी कोणीच केले नाही. आता मात्र काही थोर वृत्तपत्रांतून; स्वतंत्र विदर्भाच्या 'शिळ्या कढीला नवीन फोडणी' देण्यासारखे लेख येत आहेत.
आजचा महाराष्ट्र हा संयुक्त महाराष्ट्राच्या जबरदस्त लढय़ातून, तावूनसुलाखून घडलेला आहे. याच्या जडणघडणीमागे १०५ हुतात्म्यांचे मोलाचे जीवनदान आहे. आताचा भौगोलिकदृष्टय़ा महत्त्वाचा असणारा महाराष्ट्र श्री ज्ञानेश्वरांच्या अगोदरपासून एका मोठय़ा मराठमोळ्या मराठी संस्कृतीचा वारसा घेऊन वाटचाल करत आहे. ही मराठमोळी संस्कृती फक्त पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडय़ापुरती मर्यादित नसून त्यामध्ये नागपूर, वऱ्हाडसकट विदर्भाचा सक्रिय सहभाग आहे. स्वतंत्र विदर्भाचे तुणतुणे जवळपास पन्नास वर्षे तरी अधेमधे वाजत असते. लोकनायक श्रीयुत अणे हे विदर्भ नेते स्वतंत्र विदर्भाचे पुरस्कर्ते होते. पण त्याचबरोबर विदर्भातील थोर साहित्यिक श्रीयुत ग. त्र्यं. माडखोलकर हे स्वतंत्र विदर्भाच्या कट्टर विरोधकांपैकी एक होते, हे नवीन पिढीला माहिती पाहिजे. विदर्भाचे एक तरुण सुपुत्र ज्यांनी आपल्या तरुणपणी अर्धा डझन विषयांत पीएच.डी. मिळविली, ते डॉ. श्रीकांत जिचकार स्वत:ही स्वतंत्र विदर्भाच्या कट्टर विरोधात होते. विदर्भातील जनसामान्यांना स्वतंत्र विदर्भ नकोच आहे याकरिता गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या आमदारांची वाढलेली प्रचंड संख्या खूपच बोलकी आहे.
स्वतंत्र विदर्भवादीयांनी, त्यांच्या कट्टर पुरस्कर्त्यांनी पुढील मुद्दय़ांचा मोकळेपणाने विचार करावा.
१) यापूर्वी विदर्भातीलच तीन थोर व्यक्तींना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दीर्घ काळ राज्य करण्याची संधी मिळाली. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आजपर्यंत विदर्भातील डझनांनी व्यक्तींनी मंत्रिपद उपभोगले. पश्चिम महाराष्ट्र किंवा पुणे-मुंबईच्या तुलनेत, विदर्भाचा विकास झाला नाही; याचा दोष महाराष्ट्राकडे कसा येईल? २) यदाकदाचित स्वतंत्र विदर्भ जन्माला आला, तर तो स्वत:च्या पायावर आर्थिकदृष्टय़ा, स्वावलंबी वा भक्कम प्रगती करू शकेल, याला आधार काय? स्वतंत्र विदर्भाच्या आठ जिल्ह्य़ांना समुद्रकिनारा नाही. मुंबई-पुणेसारखी अशी समृद्ध बाजारपेठ नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घ्यावयास हवी. नुसत्या विदर्भातील संत्री, कापूस व ज्वारी किंवा तथाकथित खनिज संपत्तीवर स्वतंत्र विदर्भ काही विशेष प्रगती करू शकेल असे आजच्या प्रचंड जागतिक स्पर्धेच्या युगात वाटत नाही.
३) स्वतंत्र विदर्भ झाला, तर विदर्भातील भावी पिढी, निसर्गसुंदर कोकण विशेषत: अलिबाग, मुरुड-जंजिरा, रेवदंडा, गुहागर, वेळणेश्वर अशा संपन्न संस्कृतीला कायमची मुकेल. विदर्भातील नवीन तरुणाईला उर्वरित महाराष्ट्रातील रायगड, प्रतापगड, सिंहगड, शिवनेरी, पुरंदर, तोरणा बघायला मिळतील का? श्रीक्षेत्र पंढरपूर, आळंदी, देहू, अक्कलकोट, सज्जनगड, गोंदवले, चिंचवड अशा पवित्र स्थळांना विदर्भवादी मुकतील. याच प्रकारे उर्वरित महाराष्ट्रातील तरुण पिढी विदर्भातील शेगाव, अमरावती, श्रीयुत तुकडोजी महाराज, श्री गुलाबराव महाराज, श्री गाडगेमहाराज यांच्या परमस्मृतीने पावन झालेल्या स्थळांना दुरावतील. उर्वरित महाराष्ट्रातील नवीन पिढीला; थोर विदर्भसेनानी रघुजी भोसले यांच्या बंगालवरील यशस्वी लढायांचा इतिहास कसा बरे माहीत होईल? विदर्भातील धर्मवीर डॉ. मुंजे, संघ संस्थापक डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, साहित्यिक ग. त्र्यं. माडखोलकर, अ. ब. कोल्हटकर, श्री. कृ. कोल्हटकर, डॉ. श्री. व्यं. केतकर, श्री. द. भि. कुलकर्णी  यांना उर्वरित महाराष्ट्रातील तरुण पिढी; स्वतंत्र विदर्भ झाल्यास नक्कीच मुकणार आहे. हे स्वतंत्र विदर्भवाद्यांना मान्य आहे का?
स्वतंत्र विदर्भवादी मंडळींनी पुढील मुद्दय़ांचा अधिक गांभीर्याने विचार करावा असे मला वाटते. महाराष्ट्राच्या दुर्दैवाने स्वतंत्र विदर्भ जर झाला व त्यातील कोणी तरुण मंडळी पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सातारा अशा ठिकाणी नोकरी-धंद्याकरिता आली, तर त्या त्या भागातील सर्वसामान्य उद्योजक, व्यापारी, लहान-मोठय़ा कंपन्यांचे डायरेक्टर नक्कीच म्हणतील, ''तू विदर्भातून इकडे कशाला आलास? जा तिकडे, शोध नोकरी!'' वैदर्भीय तरुण व्यक्ती उर्वरित महाराष्ट्रातील लहान-मोठय़ा शहरात घर, निवारा शोधायला लागली, तर विदारक अनुभव घेतील.
स्वतंत्र विदर्भाचे तुणतुणे खूप काळापासून बियाणी, काही वाणी वा आपमतलबी स्वयंघोषित नेते वाजवीत आहेत. पूर्वीच सांगितलेल्या मुख्यमंत्र्यांसकट तीन थोर नेत्यांच्या मतदारसंघांत मी या विषयावर जाहीर जनसभेत वरील स्वरूपाचे प्रतिपादन करावयास केव्हाही तयार आहे. विदर्भ मित्रहो, कटुता टाळू, आपण सारे मऱ्हाटी बाणा टिकवू!
- वैद्य प. य. वैद्य खडीवाले, पुणे (लोकसत्ता दिनांक १३ जून २०१५ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा