शनिवार, २१ मे, २०१६

देशात हिंदू राष्ट्रवाद लादण्याचा प्रयत्न  ……

  आरएसएसचे हिंदुत्व जात आणि वंश या ब्राह्मणी मूल्यावर आधारले आहे. गांधीजींच्या असहकार चळवळीला विरोधी भूमिका घेण्यासाठीच आरएसएसची स्थापना झाली. कारण या चळवळीत उच्चवर्णीय ब्राह्मणांचे आणि जमीनदारांचे हितसंबंध सांभाळले जाऊ शकत नव्हते. असहकार चळवळीने मोठ्या प्रमाणात देशभरातील सर्वसामान्य लोकांना चळवळीत आणले. याच काळात फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राह्मणेतर चळवळीला प्रेरणा दिली. या चळवळीचे संघाने कधीच समर्थन केले नाही. पुरोगामी चळवळींना धार्मिक सांस्कृतिक भूमिका घेत विरोध करण्याचे काम संघ करत राहिला. अल्पसंख्याकांच्या विरुद्ध द्वेषमूलक प्रचार सुरू करण्यात आला. राम मंदिराचा विषय राजकीय अजेंड्यावर आणला. नाझी सैन्याच्या धर्तीवर बजरंग दलाची स्थापना केली. राजकारणासाठी जातिवादी हिंसक भूमिका घेतल्या गेल्या.
२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत बहुमताने केंद्रात सत्ता मिळवल्यावर संघाने सर्व शक्तिनिशी आपला अजेंडा राबवायला सुरुवात केली आहे. संघाच्या सर्व संघटना हा अजेंडा राबवत असताना मोठ्या प्रमाणात असहिष्णुता दहशत पसरवत आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर डॉ. आंबेडकरांची जातिअंताची भूमिका संघाला मानवणारी नाही. मात्र, संघाच्या हिंदुराष्ट्र संकल्पनेला विद्यमान राज्यघटना तसेच लोकशाहीने विरोध केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून संघ परिवार शिक्षण, अन्न, सांस्कृतिक स्वातंत्र्यावरही दबाव आणत आहे. संघाचे प्रचारक, स्वयंसेवक त्यांचा अजेंडा रेटण्यासाठी दबाव आणत आहेत. राम मंदिर, मांस, वंदे मातरम्, भारत माता की जय अशा भावनिक विषयांवर संघ चर्चा करत आहे. भारतीय राज्यघटनेतील लोकशाही मूल्यांशी संघाला देणे-घेणे नाही. निरनिराळ्या धर्मांतील दरी वाढवणे हा संघाचा उद्देश आहे. त्यामुळेच भाजप सत्तेवर आल्यापासून राज्यघटनेची समीक्षा करण्यासाठी समिती नेमली आहे. मनुस्मृतीसारख्या ग्रंथावर आणि त्याचा कायदा प्रस्थापित करण्यासाठी हिंदुत्वाचा राजकीय वापर, ही संघाची भूमिका डॉ. आंबेडकरांनी नाकारली होती. संघवाले वरकरणी बाबासाहेबांविषयी आदर दाखवतात, परंतु बाबासाहेबांच्या मूळ वैचारिक भूमिकेला त्यांचा विरोध आहे. संघाचा छुपा मुखवटा समजून घेऊ आणि लोकशाही, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय ही भारतीय राज्यघटनेने दिलेली मूल्ये सुरक्षित राखू. - ज्येष्ठ विचारवंत राम पुनियानी यांचे विद्रोही साहित्य संमेलनातील भाषण  दिव्यमराठीमधून
 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा