रविवार, २४ जुलै, २०१६

प्रत्येक गावांत जहांगीराची घंटा/ अर्थात सुप्रीम कोर्ट हवे. 

इतिहासात जहांगीर बादशहा हा न्यायप्रिय शासक होऊन गेला असे म्हणतात. तो दरबारात हजर असतांना त्याच्यासमोर आलेल्या प्रकरणाचा ताबडतोब व समाधानकारक असा न्यायनिवाडा करत असे.
असे सांगतात की, जेंव्हा दरबार चालू नसेल तेंव्हासुद्धा कुठल्याही अन्यायाचे  सत्वर निवारण व्हावे म्हणून त्याने आपल्या महालात एक घंटा बांधलेली होती व घंटेच्या दोरीचे टोक महालाच्या प्रवेशद्वाराजवळ सोडलेले होते. पीडित व्यक्तीने अगदी रात्री अपरात्री सुद्धा ती घंटा वाजवली तर जहांगीर त्या व्यक्तीचे गाऱ्हाणे लगेच ऐकून न्यायनिवाड्यास सुरवात होऊन पिडीताला न्याय मिळत असे.

त्याच्या न्यायप्रियतेचा एक किस्सा सांगितला जातो तो असा -

एकदा जहांगीराकडे एक नागरिक राणीवरच मनुष्यवधाचा आरोप करतो. जहांगीरच्या न्यायप्रियतेचा व निष्पक्ष वृत्तीचा कस लागतो. अर्थात या प्रकरणात काय होते हे जाणून घेण्याकरिता जिज्ञासुन्नी सोहराब मोदी निर्मित/दिगदर्शित/ अभिनित १९३९ सालचा जुना चित्रपट "पुकार" पहावा. ज्यांना जहांगिराबद्दल आकस असेल त्यांनी कमीतकमी सोहराबमोदी यांचे 'डायलॉग' ऐकण्यासाठी तरी पाहावा म्हणजे ते सलीम-जावेद व महानायकाला विसरून जातील.(युट्युबवर उपलब्ध आहे)
आज जहांगिराची आठवण होण्याचे कारण आमची आजची न्यायव्यवस्था.

एखाद्या खेडेगावातील व्यक्तीवर अन्याय झाला असेल तर त्याला सर्वप्रथम तालुका न्यायालयात दाद मागावी लागते. तेथे त्याच्याविरुद्ध निकाल गेल्यास जिल्हा कोर्ट नंतर हायकोर्ट व शेवटी सुप्रीम कोर्टात जावे लागते. ही सर्व न्यायालये त्याच्या गावापासून २०/३०  किलोमीटर पासून २०००/३००० किलोमीटर पर्यंत लांब असू शकतात. म्हणजे त्याची बाजू न्याय असून सुद्धा त्याला त्यासाठी भरपूर पैसे, व आपली उभी हयात घालवावी लागते. मला वाटते की  ह्या सर्व सुविधा त्याला आपल्या गावातच उपलब्ध व्हाव्यात.

पूर्वी गावात (पाच सुज्ञ व्यक्तींची) गावपंचायत असायची व पाचामुखी परमेश्वर बोलतो असा गावकऱयांमध्ये विश्वास होता व त्यांचा निवाडा अंतिम समजला जायचा व दोन्ही पक्षांनी त्याचे पालन करणे बंधनकारक असायचे. महाराष्ट्रात पंचायतराज लागू झाल्यावर काही ठिकाणी न्यायपंचायतीसुद्धा होत्या. आमच्या गावात अशी न्यायपंचायत (१९६५ च्या सुमारास) असल्याचे मला आठवते.
माझे मते माझ्या गावात जर एखादा वाद/ तंटा उदभवला तर त्याचे निवारण गावातच व्हावे, त्यासाठी मला गावोगावी भटकण्याचे काम पडू नये.
अर्थात हे कसे साध्य होईल यावर सर्वांनी विचार करणे आवश्यक आहे. ही एक आदर्शवादी  (Utopian) कल्पना आहे हे मला मान्य आहे पण सध्याची अंदाधुंदी पाहता मला हे आवश्यक वाटते .

माझ्यामते प्रत्येक गावात जहांगिराची घंटा असावी.

राजेंद्र कडू, अमरावती
०८०८७०६१६७२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा