गुरुवार, १६ जानेवारी, २०१४

संपादक विचारवंत नसू शकतो काय ? 

मुंबईहून प्रसिद्ध होणाऱ्या एका नामांकित दैनिकाच्या दिनांक ६ डिसेम्बरच्या अग्रलेखात सासवड येथे नुकत्याच पार पडलेल्या संमेलनाचा आढावा घेतांना पुढीलप्रमाणे विधान केले आहे,  ""त्याहूनही क्लेशकारक असा प्रकार महाराष्ट्र सारस्वताच्या अंगणात अलीकडे वारंवार घडताना दिसतो. तो असा की साहित्य आणि वाङ्मय व्यवहारातील वैचारिकतेचे वाण अलीकडे एकूणच घसरत चाललेले असल्याने याची जाणीव असणारे संधिसाधू अलीकडच्या काळात वृत्तपत्रे आदींच्या संपादकांनाच विचारवंत असे संबोधताना दिसतात. मराठीतील एकूणच विचार आणि साहित्यविश्वावर असलेल्या वर्तमानपत्रीय मक्तेदारीमुळे संपादकांनाच विचारवंत संबोधणे यात परस्परांची सोय यापलीकडे अन्य काही नाही. " अग्रलेखातील या विधानाचा रोख निर्विवादपणे जेष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचेकडे होता . सासवडच्या साहित्यसम्मेलनात केतकर यांनी मोदींवर घेतलेले तोंडसुख संपादकांना  रुचलेले दिसत नाही. मात्र आपली वैयक्तिक आवड निवड अशाप्रकारे आपण आपल्या वृत्तपत्राच्या वाचकांवर लादावयास नको . प्रत्येक व्यक्ति काहीतरी विचार करतच असते व या न्यायाने प्रत्येकच व्यक्ति ही विचारवंतच समजल्या गेली पाहिजे असा माझा वैयक्तिक " विचार " आहे. ज्या वृत्तपत्रामध्ये केतकरांना लक्ष्य करण्यात आले त्याच  दैनिकाचे केतकर हे माजी संपादक आहेत.  आणि विचारवंत व्यक्ति संपादकपदी नेमण्याची  परंपरा या दैनिकात अजुनतरी खंडित झाली आहे असे दिसत नाही. 
आपण अशा प्रकारे केतकरांवर शरसंधान करण्यामागे व्यावसायिक वैमनस्य हे कारण तर नाही ? कारण केतकर आता दुसऱ्या  एका बलाढ्य वृत्तपत्र समुहात दाखल झाले आहेत व आपल्या  मालकांना खुष करण्यासोबतच    केतकरांबद्दलचे  किल्मिष हि व्यक्त करणे असा दुहेरी उद्देश या मल्लीनाथीमागे दिसतो. अर्थात यामुळे केतकरांच्या प्रमितेला काही धोका संभवेल असे मला वाटत नाही. केतकरांनी साहित्य संमेलनात मोदींवर टिकास्त्र सोडले व या दैनिकाने अग्रलेखात त्यांचे नाव न घेता परंतु ओळखू येईल अशाप्रकारे शेरेबाजी  केली आहे. यामुळे मोदींचे चाहते खूष झाले असतील व केतकरांची हेटाळणी करण्याचा त्यांचा उद्देशही  सफल झाला आहे. यामुळे केतकरांचे काहीही नुकसान होईल असे मला वाटत नाही परंतु  "लोकमान्य ", " लोकशक्तीचा" वापर असा क्षुद्र कारणासाठी या दैनिकातून व्हावा   याचे दु:ख माझ्यासारख्या  वाचकाला नक्कीच होइल.  या दैनिकाचे सध्याचे संपादक विचारवंत आहेत की नाही याबद्दल मात्र मला शंका वाटायला लागली आहे.

अजिंक्य भारतीय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा