मंगळवार, २१ जानेवारी, २०१४

शाहू महाराज , मोदी आणि लोखंड ...........

१०० वर्षांपूर्वी लक्ष्मणराव किर्लोस्करांनी सांगली जिल्ह्यातील कुंडल गावाच्या माळरानावर लोखंडी नांगर  बनविण्याचा कारखाना सुरु केला. त्यांना नांगर निर्मितीसाठी लोखंडाची कमतरता भासू लागली तेंव्हा आपली अडचण घेऊन ते शाहू महाराजांकडे गेले. शाहू महाराजांनी आपल्या कारभाऱ्याना आदेश दिलेकी त्यांच्या राज्यात असलेल्या किल्ल्यांवर ज्या तोफा पडून आहेत त्या लक्ष्मणरावांच्या हवाली करण्यात याव्यात. जंग खात पडण्यापेक्षा त्या शेतकऱ्यांच्या कामी आल्या पाहिजेत हा यामागचा महाराजांचा उदात्त हेतू होता.
शंभर वर्षानंतर पुन्हा एकदा शेतकऱ्यांशी संबंधित लोखंड चर्चेत आले आहे. या वेळेस मात्र या लोखंडाचा प्रवास उलट दिशेने होणार आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्यदिव्य असा पुतळा नर्मदा प्रकल्पाच्या परिसरात उभारण्याची " महाघोषणा " ( भाजपचे सर्व महाच असते, महाअधिवेशन, महासंकल्प ,महासत्संग )मोदींनी केली आहे व या पुतळ्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळची शेतीची अवजारे दान करावी असे मोदींनी आवाहन केले आहे. शेतकरी सर्व बाजूंनी कोंडीत सापडलेला असून व शेतकऱ्याची अवस्था सुधारण्याचे कोणताही राजकीय पक्ष प्रयत्न करत नसण्याच्या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आलेले आहे. शेतकऱ्याला काही देण्याऐवजी त्यालाच दानवीर होण्याचे हे आवाहन आहे. अंगावर असलेली लंगोट सुद्धा काढून घेण्याचा हा प्रकार आहे. नर्मदा प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी आपल्या सुपीक जमिनी कवडीमोलाने राष्ट्राला दिल्या. त्यात सर्वसामान्य जनतेऐवजी मंत्री, अधिकारी आणि ठेकेदारांचे कोटकल्याण झाले. चविष्ट पुरणपोळीवर आता साजूक तूप हवे आहे. तेही शेतकऱ्यांकडूनच. आपल्या राज्यातील तोफा शेतकऱ्यांच्या भल्यासाठी देणारा जाणता राजा शाहू महाराज कुठे आणि आताचे मतलबी राजकारणी कुठे ?

राजेंद्र कडू ,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा