"ऐ मेरे वतनके लोगो "
नुकताच "ऐ मेरे वतनके लोगो " या राष्ट्रभक्ती गीताच्या सादरीकरणाचा ५१ व वर्धापन दिन काही राष्ट्रप्रेमी व्यक्तींकडून साजरा करण्यात आला. त्याला जनतेची अलोट गर्दी उसळली होती. या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी फारच प्रेरणादायी भाषण केले. फक्त आपल्याच देशात युद्ध संग्रहालय नाही या उणीवेवर त्यांनी नेमके बोट ठेवेले. तसेच सीमेवर लढणाऱ्या सैनिकाला " लढतांना मरण आलेच तर ते छातीवर गोळी लागून यावे, पाठिवर गोळी लागून नव्हे " असे वाटत असते, असे प्रतिपादन केले. शिवाय पाकिस्तानी सैनिकांनी आपल्या काही सैनिकांची डोकी कापून नेलीत व शहिदांच्या पत्नींनी त्यासाठी मोठा आक्रोश करूनही आपल्या सरकारने त्याबाबतीत काहीही केले नाही असा आरोपही केला.
या आरोपाच्या पार्श्वभूमीवर मला २००१ साली घडलेली एक घटना आठवली. १७ एप्रिल २००१ रोजी बांगलादेशच्या सैनिकांनी आपल्या १७ सैनिकांचे अपहरण करून त्यांना हालहाल करून ठार मारले व त्यांची प्रेते विद्रूप करून भारताच्या हवाली केली. २००१ साली भारतात कोणत्या पक्षाचे सरकार होते व तेंव्हाच्या विरोधी पक्षाने याचे भांडवल केले की राष्ट्रीय एकोपा कायम रहावा म्हणून संयम बाळगला याचा आपण शोध घेतला पाहिजे. या प्रकरणात सोळाही सैनिकांना छातीवर गोळी झेलण्याची संधी मिळाली नाही या बद्दल या "राष्ट्रवाद्यांना " काही खंत किंवा खेद वाटत असेल तर तोही त्यांनी व्यक्त करायला हरकत नाही. या विषयावरील लेख व छायाचित्रण इंटरनेटवर उपलब्ध आहेत. मराठीतील एक म्हण " दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते पण स्वतःच्या डोळ्यातील मुसळसुद्धा दिसत नाही " ही म्हण येथे चपखलपणे लागू पडते.
राजेंद्र कडू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा