सिद्धुलाही समन्स पाठवायला हवे.
एका हिंदी भाषिक वाहिनीवरून बाष्कळ विनोद सदर करणाऱ्या एका विनोदविराला गरोदर महिलांची टिंगल केल्याबद्दल महिला आयोगाने नोटीस पाठविली होती. मात्र दिलेल्या पंधरा दिवसाच्या मुदतीत आपले म्हणणे सादर न केल्यामुळे महिला आयोगाने त्याला आयोगासमोर हजर राहण्याचे समन्स पाठविले आहे. याच प्रकरणात या कार्यक्रमात प्रमुख पाहुणा ( की परीक्षक ) म्हणून उपस्थित राहणाऱ्या नवज्योतसिंग सिद्धू याला सुद्धा समन्स पाठवायला हवे. कारण हे सिद्धू ( की बुद्धू ) महाशय या कार्यक्रमात समोर सुरु असलेल्या पांचट विनोदांना अगदी चेकाळ्ल्या सारखे आपल्या मांडीवर थाप मारून व " व्वा गुरु " म्हणून खास पंजाबी शैलीत दाद देत असतात. आणि कलाकारही मग चेव आल्यासारखा वाटेल ते बडबडत असतो. हा सगळा प्रकार बीभत्सपणाकडे झुकणारा आहे. विशेष म्हणजे हे सिद्धू महाशय काही दिवसांपूर्वी अमरावती येथे एका महाविद्यालयात येउन युवकांना ध्येयप्राप्तीकरिता प्रामाणीकपणे मेहनत करण्याचा सल्ला देऊन गेले होते. स्वतः मात्र ते ज्या मतदार संघाचे म्हणजे खासदार आहेत त्या जालंधर शहराकडे फिरकतसुद्धा नाहीत अशी तेथील मतदारांची तक्रार आहे व आमचे खासदार हरवले आहेत असे फलक जालंधर शहरात लागले होते. आता महिला आयोगाने काढलेल्या समन्समुळे नररत्न सिद्धूचा हा नवा पैलूही उजेडात आणल्या जावा. किंबहुना मी तर असे म्हणेल की या निमित्ताने या " विनोदी " कार्यक्रमाच्या सर्वच जुन्या भागांच्या चित्रफिती मागवून महिला आयोगाने त्यात काय काय अश्लाघ्य शेरेबाजी केलेली आहे ते तपासुन पहावे व या टारगटांवर कारवाई करावी.विशेष म्हणजे हे सिद्धू महाशय संस्कृतीरक्षणाचा ठेका घेतलेल्या पक्षाचे खासदार आहेत. ही मंडळी आपल्यासमोर काय आदर्श ठेवताहेत हेही युवकांनी तपासून पहावे.
राजेंद्र कडू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा