शनिवार, १ फेब्रुवारी, २०१४

भारताची प्रतिष्ठा कशी काय धुळीस मिळाली ? 

नुकत्याच झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेत भारताचा ४-० असा पराभव झाला. हि बातमी देतांना एका वृत्तपत्राने   " भारताची प्रतिष्ठा धुळीला मिळाली " अश्या शीर्षकासहीत बातमी दिली आहे. क्रिकेट सामन्यात झालेल्या पराभवाने भारताची प्रतिष्ठा कशी काय धुळीस मिळू शकते हे मला समझले नाही. कारण क्रिकेटची ही टीम भारत सरकारची अधिकृत टीम नसून ही टीम बीसीसीआय म्हणजेच  बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल ऑफ इंडिया या संघटनेची टीम होती. सरकारचा या संघटनेशी दुरान्वयेही काही संबंध नाही. काही वर्षांपूर्वी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा वाद कोर्टात गेला होता तेंव्हा आमचा सरकारशी काहीही संबंध नाही व सरकारकडून आम्ही कुठल्याही प्रकारचे अनुदान अथवा अर्थ सहाय्य घेत नाही, असे शपथपत्र बीसीसीआयच्या वतीने कोर्टात करण्यात आले होते. बीसीसीआय ही केवळ एक नोंदणीकृत संस्था असून अशा प्रकारची नोंदणी कुठलाही प्रकारचा समूह अथवा गट करू शकतो व सामने भरवू शकतो.

वर्षोनुवर्षे सर्वच माध्यमे क्रिकेटविषयक बातम्या देतांना बीसीसीआय टीम असा उल्लेख न करता भारत असा उल्लेख करत आली आहे. उदा. भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना कधीच नसतो तर बीसीसीआय टीम विरुद्ध पीसीबी म्हणजेच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड टीम असा असतो. मात्र एकच चुकीची गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितल्या गेल्यास ती खरी वाटायला लागते तसेच काही या बाबतीत झालेले आहे. बीसीसीआयने सुद्धा या गोष्टीला कधी हरकत घेतली नाही. राष्ट्रभक्तीच्या तव्यावर आपल्या भरघोस उत्पन्नाची पोळी बीसीसीआयला भाजून घ्यायची असल्यामुळे ते कधी अशी हरकत घेतील अशी चुकूनही शक्यता नाही. कुणीतरी कोर्टात याचिका दाखल करून माध्यमांना तसेच बीसीसीआयला भारताची टीम असा उल्लेख करण्यास मनाई करणारा आदेश मिळविल्याशिवाय हा प्रकार बंद होणार नाही. त्यातही आश्चर्याची गोष्ट म्हणजे दुसऱ्या काही मंडळींनी अशाच प्रकारच्या  संस्थेची नोंदणी करून क्रिकेट सामने भरविण्याचा प्रयत्न केला असता बीसीसीआयने त्याला कोर्टात आवाहन दिले होते. हे म्हणजे एखाद्या भिकाऱ्याने मी खूप वर्षांपासून या फुटपाथवर भिक मागत आहे इथे दुसऱ्या कुणालाही भिक मागण्याचा अधिकार नाही असा दावा करण्यासारखे झाले. असो.  मालिकेत पराभव झाला म्हणजे भारताची प्रतिष्ठा धुळीला मिळाली असे मला वाटत नाही. 

राजेंद्र कडू         Email----- rajendra.kadu02@gmail.com


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा