बुधवार, १२ फेब्रुवारी, २०१४

लोकमतच्या दिनांक ०९/०२/२०१४ च्या अंकातील मंथन पुरवणीतील प्रा. डॉ. द. ता. भोसले यांचा चर्चासत्रातील लेख


प्राध्यापकांचे त्यांच्या-त्यांच्या विषयातील ज्ञान अद्ययावत व्हावे, यासाठी विद्यापीठ किंवा अन्य संस्थांच्या साहय़ाने चर्चासत्रांचे आयोजन केले जात असते. अशाच एका चर्चासत्रातील मार्मिक अनुभव..
-----------------
एका चर्चासत्राच्या निमित्ताने शहरातील तीन-चार महाविद्यालयांतील आमच्या विषयाचे प्राध्यापक आणि परिसरातील बर्‍याच महाविद्यालयातील प्राध्यापक दोन-तीन दिवस एकत्र होतो. काही शोधनिबंध वाचणारे होते. काही ऐकायला आलेले होते; तर बरेच जण चर्चासत्राच्या निमित्ताने परिसरातील प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा हेतू ठेवून गोळा झालेले होते.
संयोजकांनी या सार्‍यांची दोन-तीन ठिकाणी निवासव्यवस्था केलेली होती. यासाठी जे विशेष निमंत्रित होते, त्यांची व्यवस्था वेगळीच केलेली होती. ते आदल्या दिवशीच आले होते. मनसोक्त गप्पा, मनसोक्त खाणे-पिणे हा अलिखित विषय ठरलेला. त्यावरच विशेष भर असावा.
‘मनसोक्त पिणे’ यालाच अग्रक्रम. अन्य ठिकाणी ज्यांची व्यवस्था केलेली होती, त्यातील काहींनी तिथेच भोजन घेतले. जी काही असेल ती भाजी-भाकरी त्यांनी खाल्ली; पण इतर मंडळींनी ‘असला बेचव कडबा खाण्यासाठी आपण इथे आलो आहोत का? या कॉलेजने मनासारखे दिले नाही तरी आपण आपला खर्च करू.आपणाला पगार कमी नाही. शिवाय माझ्यापुरते म्हणाल तर माझा व्याजबट्टय़ाचा धंदा जोरात चालतो. म्हणत असाल, तर मी माझ्या खर्चानं तुम्हाला ‘तीर्थ’ पाजतो. जाऊया एखाद्या चांगल्या हॉटेलात,’ असे म्हणत मित्रांना खोलीबाहेर ढकललेही. रस्त्यावर येताच एक जण चेष्टेच्या सुरात म्हणाला, ‘अरे, या आपल्या रमेशला यंदा ऊस आणि कांद्याचे भन्नाट उत्पन्न झाले आहे. त्याचे निम्मे तास तर त्यानं उसाला पाणी देण्यासाठीच खर्च केले. सवड मिळेल तसा हा कॉलेजवर यायचा. यानं दिलेली कोंबडी पोटात गेली का, याचा प्राचार्य गपगार व्हायचा. तेव्हा यानं आपणाला या आनंदासाठी कोंबडी खाऊ घातली पाहिजे. काय रमेश?’ सगळ्यांनीच जोरात पाठिंबा दिला. रमेश प्राध्यापकाची पंचाइत झाली. ‘बरं देतो बाबा,’ असं म्हणून त्यानं आपली सुटका करून घेतली; पण ज्या सहकार्‍यानं उसाच्या उत्पन्नाचे घबाड उघडे केले, त्यालाच चिमटा घेत प्राध्यापक रमेश म्हणाला, ‘भाऊसाहेब, आपला पराक्रम कुठं कमी आहे? तुम्हीच आमचे यातले ‘गुरू’ आहात.
वर्षातले चार महिन्यांची सुट्टी सोडली तर उरलेल्या आठ महिन्यांत आईची शपथ घेऊन सांगा; तुम्ही किती तास घेतले? तासासाठी थांबणार्‍या मुलांना तुम्ही पिटाळून लावता. त्यातल्याच एखाद्या पोराला दहा-वीस रुपये देऊन घरातले काम सांगता. भाऊसाहेब, आपणाला मिळणार्‍या पगाराशी तरी प्रामाणिक राहा. जरा अभ्यास करून, जरा तयारी करून शिकवत चला.’ भाऊसाहेबांना हा घाव वर्मी लागला असावा. स्वत:ला सावरत भाऊसाहेब म्हणाले, ‘अरे, मी एकटाच हे करीत नाही. सारेच प्राध्यापक असे वागतात. शिवाय आजकालची मुले तरी कुठे सिन्सियर आहेत? मजा करायलाच कॉलेजवर येतात. त्यांना भरपूर अभ्यास करून तुम्ही शिकविले तरी पसंत पडत नाही. त्यांची मागणी असते परीक्षेला पास होण्यापुरते शिकवा अशी. वाटल्यास आम्हाला नोट्स लिहून द्या.’
भाऊसाहेबांना टाळी देत तिसरा प्राध्यापक म्हणाला, ‘बरोबर आहे भाऊसाहेब तुमचे, माझा अनुभव तुम्हाला सांगतो. एकदा दोन-तीन विद्यार्थी माझ्याकडे आले आणि मलाच विचारतात, की तुमच्या विषयासाठी कुणाचं गाइड वापरू.मग मीही चालूगिरी केली. ज्याच्याकडून मला भरघोस कमिशन मिळणार, त्या गाइडची मी शिफारस केली. आता बोला, कशाला अभ्यास करायचा मग आपण? त्यापेक्षा रोज एक नवा पदार्थ करून खावा; कंटाळा आला तर बायकोला घेऊन हॉटेलात जेवावे. रात्री-उशिरापर्यंत टी.व्ही. बघावा. नातेवाइकांच्या लग्नाला जावे, लग्ने जमवावीत. संस्थाचालकांना अधूनमधून भेटावे. त्याच्या पायावर झुकावे. त्याच्या वाढदिवसाला मोठी भेट द्यावी, जमले तर त्याच्या पोरापोरीच्या लग्नात राबावे. ज्यांच्या हातात आपली नोकरी आहे, अशा सार्‍यांचा उदोउदो करावा. आपल्या आवडीच्या विषयावर लेखन करावे, शोधनिबंध लिहावेत याची आता आवश्यकता उरली नाही आणि आजही उरली नाही. आपल्या शेजारच्या कॉलेजचे चर्चासत्राला आलेले सहकारी गेले की, देवधर्म करायला, पर्यटनस्थळे बघायला!’
दुसर्‍या दिवशीच चर्चासत्राच्या उद्घाटनाचा कार्यक्रमही यथातथाच झाला. मान्यवर मंडळींनी सुचेल ते आणि सुचेल तसे बोलून प्रसंग साजरा केला. संस्थेचे अध्यक्ष, सचिव सल्लागार या मंडळींनी प्राध्यापकांसमोर बोलण्याची हौस भागवून घेतली. प्राचार्यांनी नेहमीप्रमाणे कॉलेजप्रगतीचा ‘तेजस्वी’ इतिहास सांगितला. सूत्रसंचालन करणार्‍या प्राध्यपिकेने संचलन करण्याच्या निमित्ताने एक लांबलचक व्याख्यानच दिले, त्यामध्ये शेरो-शायरीच्या आणि गाजलेल्या काव्यपंक्तींचा पाऊस पाडला. सभागृहात असलेला श्रोतृवर्ग शांतपणे सारे सोसत होता. मध्येच श्रोत्यांची संख्या कमी वाटल्याने प्राचार्यांनी एक वर्गच सभागृहात आणून बसवला. या मुलांच्या डोक्यावरून सारे वाहून जाऊ लागल्याने त्यांनी गप्पा मारायला सुरुवात केली अन् अशाप्रकारे संस्मरणीय उद्घाटन साजरे झाले. सर्वांनाच सुटकेचा आनंद झाला.
दुपारच्या भोजनाची व्यवस्था शेजारीच असलेल्या भोजनगृहात केलेली होती. सर्वजण त्याच्यावर तुटून पडले. हातात प्लेट घेऊन गटागटाने चर्चा करीत होते. नव्या-जुन्या आठवणींना उजाळा देत होते. नव्याने ओळखी करून घेत होते. आपल्या कॉलेजच्या प्राचार्यांचा ‘उद्धार’ करीत होते. काहीजण नव्या वेतनश्रेणीचा फरक केव्हा मिळणार, वाढलेला डी. ए. अद्याप का मिळाला नाही. विद्यापीठ अनुदान मंडळाने घातलेल्या जाचक अटीवर नाराजी प्रकट करीत होते तर काहीजण अशा चर्चासत्रांचा काय उपयोग? अशाने गुणवत्ता वाढणार आहे का? अशी टीकाही करीत होते.
फार थोडेच-अगदी थोडे लोक नवीन काय वाचले यावर चर्चा करीत होते. काही पठ्ठे तर समोरचे मिष्टान्न खातखातच मागच्या दोन वर्षांत झालेल्या चर्चासत्रात कुणी काय-काय खाऊ घातले. प्रतिनिधींची खाण्याची किती चोख व्यवस्था ठेवली होती, यावरच तोंडाला पाणी सुटेपर्यंत बोलत होते अन् शेवटी शोधनिबंधाच्या वाचनाला प्रारंभ होणार, अशी उद्घोषणा झाल्यावरच सारेजण सभागृहात खुर्चीवर मान टाकून झोपायच्या तयारीने आत आले. नेहमीच्या सवयीप्रमाणे दुपारची विश्रांती त्यांना आवश्यकच होती, नव्हे अत्यावश्यक होती. त्यातच भर पडली सुमार शोधनिबंधांची.
पेपर सादर करणार्‍या या प्राध्यापकांनी शोध (रिसर्च) किंवा ‘संशोधन’ म्हणून जे काही चारपानी कागदांत गोळा केले होते, ती चार पुस्तकांतील मजकुराची तयार केलेली भेळ होती. चार लेखकांची मते आणि अवतरणे यांच्या साहय़ाने त्याने आपला हा ‘रिसर्च पेपर’ सिद्ध केला होता. त्यात ‘सर्च’ही नव्हते, आणि ‘रिसर्च’ही नव्हते. अशा श्रवणीय (चिंतनीय नसलेल्या) निबंधाच्या श्रवणाने गच्च पोट भरलेल्या श्रोत्यांना झोप नाही लागणार तर का होईल? डोळे मिटून मंद सुराच्या साक्षीने सूक्ष्म आणि सखोल ‘चिंतन’ करणार्‍या या प्राध्यापकांना समोर चहा आल्यावरच भान आले. त्यांच्या दृष्टीने वाचलेले शोधनिबंध खूपच ‘उपयुक्त’ ठरले.
रात्री भोजन झाल्यानंतर आम्ही तीन-चार मित्र गप्पा मारत बसलो असतानाच आमच्या शहरातील पण दुसर्‍या महाविद्यालयात नोकरीस असणारे दोन-तीन प्राध्यापक आले. पाच-दहा मिनिटे इकडच्या-तिकडच्या गप्पा झाल्यावर एकजण म्हणाला, ‘सर, मी तुम्हाला एक प्लॉट द्यायचं ठरवलं आहे. इतरांपेक्षा चार पैसे स्वस्त देतो. अगदी मोक्यावरचा आहे. प्लॉट खरेदी-विक्रीचा मी व्यवसाय करतो.’ त्याबरोबर शेजारचा प्राध्यापक तितक्याच आग्रहानं मला म्हणाला, ‘मी तुमची विमा पॉलिसी करणार आहे. मी एल. आय. सी. चा एजंट म्हणून काम करतो. पगाराइतका पैसा कमावतो मी.’
थोड्या वेळानं तिसरा म्हणाला, ‘मी डेअरी चालवतो. छान धंदा चालतो. काही लागलं तर सांगत चला तेवढीच तुमची सेवा होईल.’ मी हसत-हसत त्यांना म्हणालो, ‘त्या कोपर्‍यात दोन सेवानवृत्त प्राध्यापक आपल्याच विषयावर चर्चा करताहेत. त्यांच्याकडे जाऊन आधी ऐकूया. उद्या तुम्हाला तुमच्या कामाविषयी सांगतो,’ असं म्हणताच त्या तिघांचेही चेहरे अपेक्षाभंगामुळे वेडेवाकडे झाले होते.
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक असून, मराठी भाषा,लोकसंस्कृती यांचे ज्येष्ठ अभ्यासकव निवृत्त प्राचार्य आहेत.)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा