गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०१४

महात्मा गांधींच्या सर्व फिल्म एकाच छत्राखाली उपलब्ध 

दिव्या मराठीच्या दिनांक ०३/०२/२०१४ च्या अंकात प्रसिद्ध झालेली बातमी
अशोक अडसूळ । मुंबई
महात्मा गांधी याचं खरंखुरं जीवन शब्दबद्ध करणे कोण्याही लेखकाला शक्य नाही, असे पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले होते. पण साक्षात बापूंना भेटणे, न्याहाळणे, ऐकणे आता शक्य झालं आहे. कारण मुंबईच्या मणीभवनात गांधींच्या खर्‍याखुर्‍या फिल्म्स नि:शुल्क पाहण्याची कायमस्वरूपी सुविधा गांधी फिल्म फाउंडेशनने उपलब्ध करून दिली आहे. गांधी पुण्यतिथीच्या दिवशी फिल्मच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
आपण जिवंत बापू पाहिलेत, पण ते रिचर्ड अँटनबरोच्या चित्रपटात. त्यातील गांधीबेन किंग्जले होते. खर्‍या बापूंचे चुकूनमाकून दर्शन फिल्म डिव्हिजनच्या माहितीपटात झाले, पण त्रोटक स्वरूपात. जगभरात महात्मा गांधी यांचे सात तासांचे खरेखरे चित्रीकरण उपलब्ध आहे. चलचित्र रूपातील हे बापू आजपर्यंत गोडाऊनमध्ये बंद होते. गांधी स्मारक निधीने ते आता बाहेर आणले आहे. गांधी फिल्म फाउंडेशनने बापूंसंदर्भातील सर्व फिल्मसचे कायस्वरूपी प्रदर्शन उभारले आहे. त्यामुळे कोणालाही जिवंत बापूंना भेटण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तीदेखील नि:शुल्क. येथे तुम्हाला विठ्ठलभाई जव्हेरी यांनी बनवलेली साडेपाच तासाची 'महात्मा' नावाची फिल्म पाहता येईल. ही फिल्म तब्बल नऊ भारतीय भाषांत असून यातील सर्व चित्रीकरण त्या त्या वेळी ब्रिटिश सरकारने केलेले आहे. त्यामुळे आपल्याला साक्षात बापूंना भेटल्याचे समाधान मिळते. खान अब्दुल गफार खान यांचे जीवन चितारणारी 'सरहद्द गांधी यांची कथा', भंगी समाजाच्या जीवनावरील 'अभिशाप', स्वातंत्र्याच्या पूर्वसंधेचा घटनाक्रम दाखवणारी '14 ऑगस्ट 1947 ची मध्यरात्र' आणि 'करेंगे या मरेंगे' हा भारत छोडो आंदोलनावरील माहितीपटही येथील प्रदर्शनात ठेवला आहे.
1942 ची भारत छोडो चळवळ, गोलमेज परिषदांमधील बोलणी, येरवड्यातील 21 दिवसांचे उपोषण, फाळणीच्या काळातील दंगली, त्या शमवण्यासाठी केलेल्या पायपिटीपासून ते नथुराम गोडसेने गोळय़ा झाडण्याच्या काही क्षणापूर्वी बिर्ला भवनाच्या हिरवळीवरची प्रार्थना हे सर्व येथील फिल्ममध्ये पाहण्यास मिळेल.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा