बुधवार, १२ फेब्रुवारी, २०१४

फक्त ईंग्रजी न येण्याची लाज का वाटते ? 

आम्ही जेंव्हा महाराष्ट्राबाहेर एखाद्या प्रांतात उदा. पश्चिम बंगाल किंवा केरळ मध्ये फिरायला जातो तेंव्हा बंगाली किंवा मल्याळी भाषा आम्हाला येत नसली तरी आम्हाला त्याची लाज वाटत नाही. आम्ही थायलंड किंवा जापान मध्ये पर्यटनाला गेलो तरीसुद्धा आम्हाला तेथील भाषा येत नसली तरी आम्हाला कुठल्याही प्रकारची लाज वाटत नाही. मात्र आम्ही जर ब्रिटन, अमेरिका किंवा युरोप मधील काही ईंग्रजी बोलल्या जाणाऱ्यां एखाद्या ( युरोप मधील मोजक्याच देशांमध्ये ईंग्रजी बोलली जाते) देशामध्ये गेलो व आम्हाला ईंग्रजी येत नसली तर मात्र लाजिरवाणे झाल्या सारखे वाटते.

एवढेच काय मुंबई पुणे किंवा नागपूर सारख्या शहरातील एखाद्या खाजगी कंपनीच्या पॉश कार्यालयात गेलो व आम्हाला ईंग्रजी येत नसेल तर आम्ही ओशाळवाणे होतो. तेथील स्वागतिका आमची विचारपूस ईंग्रजीतूनच सुरु करते व आमची अवस्था केविलवाणी होते. मात्र " मला ईंग्रजी समजत नाही कृपया मराठीत बोला " असे म्हणण्याची आमची हिम्मत नसते. तिची ईंग्रजीतील बोलणे समजून घेण्याची व आपले म्हणणे मोडक्या तोडक्या ईंग्रजीत समजावून सांगण्याची आमची केविलवाणी धडपड सुरु असते.

आजकाल आमच्या मुलांना आम्ही ईंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतो. आम्ही बोलतांना  एखादा आकडा मराठीतून सांगितला उदा. एकोणचाळीस, की सात आठ वर्षाचा चिमुरडा/चिमुरडी लगेच विचारतो/ते  " म्हणजे कितीहो  काका/आजोबा  ? " मग त्याला सांगावे लागते थर्टी नाईन.

घरी मराठी बोलल्या जात असल्यामुळे त्याला प्राथमिक स्वरूपाचे मराठी समजते. परंतु एखादा थोडाफार  "भारी " मराठी शब्द वापरला तर त्याच्या चेहऱ्यावर  " म्हणजे काय रे भाऊ " असे भाव असतात. ईंग्रजी व्याकरण त्या लहानग्याला अचूक माहित असते मात्र मराठीत बोलतांना गव्हाची पोळी असे न म्हणता गहुची पोळी असे म्हणतो. पालकही त्याची ही चूक दुरुस्त करतांना दिसत नाहीत.
कारण फक्त ईंग्रजीच बिनचूक बोलायचे असते, चुकीचे मराठी बोलले तर "चलता हैं " खरे तर आम्हाला मराठी बिनचूक न बोलता आल्यास लाज वाटायला पाहिजे परंतु परिस्थिती उलट आहे. आम्हाला ईंग्रजी बोलता न येण्याची किंवा फाडफाड ईंग्रजी बोलता न येण्याची लाज वाटते वाटते.

श्रीदेवीने इंग्लिश विंग्लिश चित्रपट काढून, लपून छापून का होईना पण ईंग्रजी शिका, इंग्रजी आलेच पाहिजे हा संदेश दिला व आम्हाला ईंग्रजी न येण्याची जी लाज वाटते ती अधिक धृढ केली.

येत्या २७ फेब्रुवारीला मराठी दिन आहे तेंव्हा लाज कशाची बाळगायची ईंग्रजी न येण्याची की मराठी बिनचूक न येण्याची हे आतापासून ठरवायला हवे.
राजेंद्र कडू


1 टिप्पणी: