विचारपूर्वक मतदान म्हणजे काय रे भाऊ ?
आजकाल सर्वच " विचारवंत " विचारपूर्वक मतदान करा असा सल्ला देतांना दिसतात. यातील नेमका अर्थ काय ते मला समजले नाही. विचारपूर्वक म्हणजे सध्या ज्या पक्षाचे सरकार आहे त्याला मतदान करू नका असा तर त्याचा अर्थ निघत नाही. मागिल आठवड्यात एक बातमी प्रसिध्द झाली होती. काही युवक संघटनांनी एकत्र येउन मतदारांच्या प्रबोधनाचा मनसुबा जाहीर केला होता. संपर्कासाठी काही फोन नम्बरही दिले होते. म्हणजे युवकांनी त्यांचेशी विचार विनिमय करून मतदान करावे अशी या संघटनांची व्यूहनिती होती. म्हणजेच युवकांचे ब्रेन वाशिंग करून त्यांना आपल्याला हव्या असलेल्या उमेदवाराला मतदानास प्रवुत्त करावे असा हा डाव असू शकतो. बातमीत असेही आवाहन करण्यात आले होते की युवकांनी विकासचा दृष्टीकोन समोर ठेवून मतदान करावे. आणि विकासाचा दृष्टीकोन असलेला एकच नेता आणि त्याच्या मागे फरफटत जाणारा राजकीय पक्ष भारतात उरला आहे. म्हणजे हे युवकांचे प्रबोधन म्हणजे मुखवटा प्रबोधनाचा आणि प्रत्यक्षात प्रचार कुण्यातरी पक्षाचा.
सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता आमिर खानने सुद्धा विचारपूर्वक मतदान करण्याचे आवाहन केले आहे. अर्थात असे नुसते आवाहन न करता कसा कसा व कोणता विचार करायचा ते सुद्धा सांगितले असते तर बरे झाले असते. खरे पाहता सर्व सामान्य माणूस एवढा मोठा विचार करू शकत नाही. कुणीतरी विचार करून त्याला मार्गदर्शन करावयास पाहिजे. मात्र आपण खूप खोलवर विचार करून तो लोकांसमोर मांडला तर कुण्या तरी पक्ष्याची बाजू घ्यावी लागते. आणि असा जाहीर विचार मांडणे म्हणजे इतर पक्षाशी पंगा घेणे होय. आणि दुसराच पक्ष निवडून आला तर आपली कामे कशी होणार ही भीती या तथाकथित विचारवंतांना सतावत असते. त्यामुळे लोकांना विचारपूर्वक मतदान करण्याचा कोरडा सल्ला ते देत असतात. प्रत्यक्षात लोकांना विचार देणारे लोक हवे आहेत. मात्र हे विचारवंत पुढे येणाऱ्या संकटाचा सामना टाळण्याकरिता शहामृगासारखे वाळूत तोंड खुपसुन बसतात. एखादाच विजय तेंडूलकर, अनंतमूर्ती, या निवडणुकोत्तर संकटाला घाबरत नाही.आणि अशा लोकांच्या डोक्यात फरक पडला आहे असाही प्रचार केल्या जातो.
आणि युवकांना तर विचारवंताचे वावडेच आहे. क्रिकेट खेळाडू , चित्रपट अभिनेते, आणि राजकीय नेते यांचीच पालखी उचलन्यातच ते धन्यता मानातांना दिसत आहेत. कॉलेजच्या स्नेहसम्मेलनात वरील त्रयींपैकीच कुणीतरी प्रमुख पाहुणा म्हणून त्याना हवा असतो. विचारवंतांना ऐकावे त्यासाठी त्यांच्या घरापर्यंत जावे असे कुणालाही वाटत नाही. कारण विचारवंत मी नोकऱ्या देईल, मोफत घरे देईल, तुमचे कर्ज माफ करेल, पाकिस्तानला धडा शिकविल असे कुठलेही आश्वासन देत नाही. त्यामुळे आमचा युवा वर्ग सिद्धूसारख्या, चावट विनोदांना चेकाटल्यासारखा दाद देणाऱ्यालाच विचारवंत समजायला लागले आहेत. गांभीर्याने एखाद्या गोष्टीवर स्वतंत्रपणे विचार करणारे युवक खूप कमी दिसतात . त्यामुळे राजकीय पक्षांना अशा युवकांची मोट बांधणे सोपे जाते. आणि पक्षात जनतेचे प्रश्न उभे करणाऱ्याला पुढे काही करियर करू शकण्याची शक्यता फारच क्षीण असते. त्याला पद्धतशिरपणे वेगळे पाडण्यात येते. आणि मग पक्षाचे रुपांतर एका शिस्तबद्ध सैन्यात रुपांतर होते. त्यालाच काही लोक क्याडर बेस्ड पक्ष म्हणतात.
तेंव्हा जनतेच्यावतीने विचार करून तो लोकांसमोर मांडणारे बिगर राजकारणी विचारवंत हवे आहेत. परिस्थिती अशी आहे की एक महिन्यापूर्वी स्वतःला निष्पक्ष विचारवंत म्हणवून घेणारी मंडळी आता एका प्रखर राष्ट्रवादी पक्षाच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे सामान्य माणसावर शेक्सपियर सारखे ' ब्रुटस यु टु ' म्हणावयाची पाळी आली आहे.
सामान्य माणूस आपल्या दैनंदिन रहाटगाडग्यात व्यस्त असतांना निवांतपणे विचार करण्याची क्षमता घालवून बसला आहे. तो फक्त लाट कुणाची आहे ते पाहतो आणि कुणालातरी मत देऊन मोकळा होतो. आणि सामान्य जनतेने विचार जर करतो म्हटले तर तो एवढेच म्हणेल की सर्वच राजकीय पक्ष हे एकमेकाचे मावसभाऊच आहेत. सर्वांनी आपली नालायकी सिध्द केली आहे. आणि मग त्याल एकाच पर्याय उरतो तो म्हणजे मतदान यंत्रावरील " NOTA " ( या पैकी कुणीही नाही ) हे बटन दाबणे. आणि मग विदेशातून चांगल्या राजकीय पक्षांची आयात करायची काय असाही विचार सुरु होईल.( कारण त्यात कमिशन खाता येईल ) म्हणूनच मला प्रश्न पडतो, विचारपूर्वक मतदान म्हणजे काय रे भाऊ ?
राजेंद्र कडू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा