रविवार, १३ जुलै, २०१४

" चोराच्या सुलट्या …"  

लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काही दिवस अगोदर हरियाणातील सूरजकुंडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या खासदारांची पाठशाळा घेतली. खासदारांना शिस्तीचे, नीतीचे धडे द्यावेत आणि युक्तीच्याही चार गोष्टी सांगाव्यात, असा त्यामागचा उद्देश होता. भ्रष्टाचारापासून लांब राहा, हा संदेशही त्याच पाठशाळेत मोदी यांनी खासदारांना दिला. केवळ कट्टर मोदीभक्ती एवढय़ाच निकषावर खासदारकीपर्यंत पोहोचलेले आणि सातत्याने वादाच्या भोवऱ्यात वावरलेले बिहारच्या बाराहिया मतदारसंघातील भाजपचे खासदार गिरिराज सिंह यांनी सूरजकुंडमधील या संदेशाचा आपल्या परीने योग्य असा धडा घेतला असावा. गेल्या आठवडय़ात घरातून ५० हजार रुपयांची चोरी झाल्याची तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी पकडलेल्या संशयिताकडे पैशाचे आणि मौल्यवान वस्तूंचे घबाडच सापडले. जवळपास एक कोटी १४ लाख रुपयांची रोकड, सहाशे अमेरिकन डॉलर्स, सोने-चांदी, जवाहीर आणि सहा मौल्यवान घडय़ाळे हा एका चोरटय़ाकडून पोलिसांनी हस्तगत केलेला ऐवज एकाच ठिकाणचा आहे, हे या संशयिताने कबूलही केल्यामुळे गिरिराज सिंह यांच्याभोवती  संशयाचे वादळ घोंघावणे साहजिकच होते. साधनशुचितेच्या गप्पा मारणाऱ्या आणि नैतिक आचरणाचे धडे सांगणाऱ्या पक्षाच्या एका खासदाराच्या घरातून चोराच्या हाती लागलेल्या एवढय़ा संपत्तीचा स्रोत काय, ही शंका बळावली. भ्रष्टाचारापासून दूर राहा या मोदी यांच्या संदेशाचे सूर ताजे असतानाच हा प्रकार उघडकीला आल्याने गिरिराज सिंह यांच्याबरोबरच भाजपच्या अवघड जागेचे दुखणे बळावले आहे. यातून बाहेर पडण्याची गिरिराज सिंह यांची धडपड सुरू असतानाच अचानक या प्रकरणात, त्यांचा नागपूरस्थित उद्योजक चुलत भाऊ अवतरला आहे. आपल्या घरातून चोराला सापडलेले हे घबाड आपल्या या चुलत भावाचे होते अशी सारवासारव करून स्वत:ला भ्रष्टाचाराच्या संशयापासून दूर राखण्यासाठी आता गिरिराज सिंह यांची धडपड सुरू झाली आहे. भ्रष्टाचारापासून स्वत:ला लांब ठेवण्याचा मोदी यांच्या पाठशाळेतील एखादा धडा अशा युक्तीने आचरणात आणण्याच्या अशा प्रयत्नांमुळे, नीतिमूल्यांच्या पायावर उभे असल्याचा दावा करणाऱ्या पक्षधुरिणांच्या पायावरच धोंडा पडला आहे. गिरिराज सिंह यांनी लोकसभा निवडणुकीआधीही बेजबाबदार विधानांमुळे पक्षाची पंचाईत केली होती.  गिरिराज सिंह यांचा हा चुलत भाऊ म्हणे, नागपूरमध्ये जमीन खरेदी-विक्री आणि धान्य व्यापार करतो. गिरिराज सिंह यांच्या घरातून चोरीला गेलेला हा ऐवज या भावाचा असेल, तर त्याच्या उत्पन्नाचे स्रोत पुराव्यानिशी स्पष्ट करण्याचे दिव्य या भावाला पार पाडावे लागणार आहे. भ्रष्टाचारापासून स्वत:ला दूर ठेवण्याचा हा प्रकार कोणाच्या अंगाशी येतो, आणि अशा प्रकारात पक्ष काय भूमिका घेतो, याकडे देशाचे लक्ष लागून राहणार आहे. गिरिराज सिंह प्रकरणामुळे भाजपला आपले नैतिक स्वत्त्व पटवून देण्याची अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. या साऱ्या प्रकारात, पक्षाच्या खासदाराच्या घरातील संपत्तीचे लागेबांधे भावाच्या निमित्ताने का होईना, नागपूरशीच जोडले जावेत हा योगायोगही भाजपसाठी काहीसा अडचणीचाच आहे. त्यामुळे या स्वामीनिष्ठ सिंहाचे भाजप काय करणार, याकडेही देशाचे लक्ष लागणार आहे. दुसरे म्हणजे, या प्रकरणामुळे एक नवी सामाजिक रूढी रुजण्याची भीती निर्माण झाली आहे. आजवर चोराच्या सांगण्यावर कुणाचाच विश्वास बसत नसे. कारण चोर नेहमी उलटय़ाच बोंबा मारतो, असे मानले जायचे. आता मात्र, चोराचे सांगणे खरे असा लोकांचा समज झाला, तर जगरहाटी बदलली असेच म्हणावे लागेल.. (लोकसत्ता १४/०७/१४)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा