सोमवार, १ सप्टेंबर, २०१४

स्वतंत्र पुस्तक मेळावा आयोजित करावा. 

यंदाचे मराठी साहित्य संमेलन पंजाबमधील घुमान सारख्या लहान व  मराठी भाषिक अल्पसंख्येत असलेल्या शहरात होत आहे त्यामुळे प्रकाशक व पुस्तक विक्रेते नाराज आहेत. यावेळेस अपेक्षित अशी विक्री होणार नाही व स्टाल लावण्याचा खर्चही निघणार नाही अशी भीती वाटत आहे. यावर उपाय म्हणून साहित्य महामंडळाने एक स्वतंत्र पुस्तक मेळावा महाराष्ट्रातील एखाद्या महत्वाच्या शहरात आयोजित करावा. हा पुस्तक मेळावा जानेवारी महिन्यातच घेता येईल कारण यावर्षीचे संमेलन उशिरा म्हणजे एप्रिल मध्ये आहे. यासाठी नागपूर शहर निवडता येइल. हा मेळावां  दरवर्षी घेता येईल व दिल्ली पुस्तक मेळाव्या सारखे स्वरूप त्याला येऊ शकते. त्यामुळे मराठी पुस्तकांच्या विक्रीत लक्षणीय वाढ होऊ शकेल. हा पुस्तक मेळावा मुबई व पुणे शहर वगळून व्हावा कारण येथे पुस्तकांची कायम दुकाने आहेत. आणि लहान शहरांमध्ये पुस्तकांची भूक खूप जास्त व उपलब्धतता कमी आहे. दरवर्षी दिल्ली येथे पुस्तक मेला व जयपूर येथे साहित्य मेळावा (Literary Meet ) असे दोन उपक्रम आहेत तसेच मराठीतही असे दोन उपक्रम राबविता येतील. शिवाय आपल्या साहित्य संमेलनापेक्षा जयपूर येथील साहित्य मेळावा हा फार वेगळा असतो व तेथे वाचक व लेखक यांच्यात वैचारिक देवाणघेवाण फार मोठ्या प्रमाणात होते असे ऐकले आहे. आपल्या साहित्य सम्मेलनातही असा काही बदल करता येईल काय याचाही मराठी सारस्वतांनी विचार करायला हरकत नाही.
राजेंद्र कडू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा