शुक्रवार, १० ऑक्टोबर, २०१४

अमेरिकेतील मोदी उत्सव - उदय दंडवते 

अमेरिकेत मोदींच्या भेटीचे काय प्रतिसाद उमटले हे देखील समजून घेतले पाहिजे. बहुवर्णीय न्यूयॉर्कमध्ये वेगवेगळ्या देशाचे लोक आपापल्या संस्कृतीचे प्रदर्शन नेहमीच करतात. त्याची लोकांना सवय असते. त्यामुळे मोदी महोत्सवाबद्दल रस्त्यावर घुटमळणाऱ्या लोकांमध्ये कुतूहल होते, परंतु हा महोत्सव अमेरिकन लोकांपर्यंत काही ठोस कार्यक्रम पोहोचवू शकला, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. जरी राजकीय स्तरावर सेनेटर आणि राष्ट्राध्यक्षांनी आपल्या पंतप्रधानांना सन्मानाने वागवले असले तरी अमेरिकी प्रसार माध्यमांनी या भेटीची फारशी दखल घेतली नाही हेच खरे. जॉन ओलिवर या विनोदी कार्यक्रमाच्या यजमानाने तर मोदींच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधील कार्यक्रमाची आणि सेंट्रल पार्कमधील भाषणाची टिंगल टवाळीच केली. काही मोदी समर्थकांनी वृत्तपत्रांचा मोदींबद्दलचा निरुत्साह, आणि काही माध्यमांनी केलेली टिंगल टवाळी यामागे वर्णद्वेष ोता, असा आरोपही केला. सत्य काही असो, परंतु प्रवासी भारतीयांचा भरभरून ओसंडलेला उत्साह आणि स्थानिक लोकांमधले सौम्य कुतूहल यातला फरक नक्कीच दिसून आला. पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्याबरोबर मोदी समर्थकांची झालेली बाचाबाची आणि ठिकठिकाणी मोदींविरोधी झालेली निदर्शने यांचा मोदी समर्थकांच्या उत्साहावर फारसा परिणाम झाला नाही हे खरे. अमेरिकन राजकारणात उद्योगपतींचे हितसंबंध जपण्यावर खूप भर असतो. त्यादृष्टीने भारताचा बाजार म्हणून जास्तीत जास्त उपयोग कसा करून घेता येईल, पेटंट कायद्याला मान्यता देऊन अमेरिकन उद्योगांचा अधिकाधिक फायदा कसा करून घेता येईल, शस्त्रास्त्र उत्पादन कंपन्यांसाठी भारतातून मागणी कशी वाढवता येईल आणि दहशतवादाविरुद्ध अमेरिकेने सुरू केलेल्या युद्धात, भारताचे भौगोलिक महत्त्व जाणून घेऊन कशाप्रकारे समर्थन प्राप्त होईल, या विषयांवर अमेरिकन सरकारची अधिक रुची होती, असे जाणवते. मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये जमा झालेल्या जनसमूहाकडे पाहिल्यावर मला वर्षानुवर्षे मुंबईत नानी पालखीवाला यांच्या अर्थसंकल्पानंतर दरवर्षी होणाऱ्या भाषणाला जमा होणाऱ्या श्रोत्यांची आठवण झाली. अर्थसंकल्पाचा आपल्या गुंतवणुकीवर परिणाम काय होईल या कुतूहलाने जमा होणाऱ्या लोकांसारखेच अमेरिकेतील प्रगतिशील भारतीय मोदींच्या धोरणांचा त्यांच्या गुंतवणुकीच्या भवितव्याला आणि भारतातील सुविधांना "अच्छे दिन आने वाले हैं' या आशेने जमा झाले होते हे स्पष्ट दिसत होते.( हा लेख सविस्तर वाचाण्याकरिता  www.divyamarathi.com ला भेट द्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा