शनिवार, १८ ऑक्टोबर, २०१४

कुठे नेउन ठेवलाय कॅलीफोर्निया तुझा ? 

मुळात अमेरिका आणि दुष्काळ हे समीकरणच आपणांस पचायला अवघड आहे. याला कारण हॉलीवूडचे चित्रपट आणि रंगीबेरंगी वृत्तमाध्यमे. त्यांतून अमेरिकेची जी प्रतिमा आपल्यासमोर येते ती अगदी इस्टमनकलर आणि सिनेमास्कोपच असते. काश्मीरबाबत एक शेर सांगितला जातो. गर फिरदौस बर-रू-ए-जमीं अस्त, हमीं अस्तो हमी अस्तो हमी अस्त. हेच आज अमेरिकेला म्हटले जाते. धरतीवरचा स्वर्ग कोठे असेल तर तो अमेरिकेतच असे मानल्यामुळे मग माध्यमांचाही कल अमेरिकेतील वंगाळ सारे लपविण्याकडेच असतो. परिणामी कॅलिफोर्नियासारखे राज्य सलग तीन वष्रे दुष्काळाच्या खाईत पडलेले आहे आणि तरीही माध्यमांतून ते बेदखलच आहे. दुष्काळ अलाबामा, ओक्लाहामा या राज्यांतही आहे. पण कॅलिफोर्नियातील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. तेथील अनेक गावांत पाण्याचे दुर्भिक्ष आहे. नळाला पाण्याचे टिपूस नाही. तळी, विहिरी आटल्या आहेत. हिरव्याकंच शेतांची माळराने बनली आहेत. जनावरे मरत आहेत. पण अजून कोठे सरकारने चाराछावण्या उभारल्याच्या बातम्या नाहीत. गोरगरिबांकडे पाणी विकत घ्यायलाही पसे नाहीत. ज्यांच्याकडे आहेत त्यांना विकत घ्यायला पाणी नाही. शहरांमधून पाणीकपात करण्यात आली आहे. कॅलिफोíनयातील सांता बार्बरा तहसिलातील मॉन्टेसिटो म्हणजे अतिश्रीमंतांचा भाग. माध्यमसम्राज्ञी ओप्रा विन्फ्रे, अभिनेता टॉम क्रूझ, दूरचित्रवाणी वाहिन्यांचा निर्माता-विनोदवीर एलेन डीजेनेरेस यांसारखे मातब्बर तेथे राहतात. तेथे पाण्याचे रेशिनग सुरू आहे आणि जास्त पाणी वापरणाऱ्यांना भरभक्कम दंड केला जात आहे. या दुष्काळाचा परिणाम अमेरिकेतल्या सणासुदीवरही झाला आहे. दरवर्षी ३१ ऑक्टोबरला तेथे हॅलोविन हा एक दिवसाचा पितृपाट साजरा केला जातो. त्यात भोपळ्याला फार महत्त्व. अमेरिकेतील इलिनॉयनंतर सर्वाधिक भोपळा पिकतो तो कॅलिफोíनयात. पण दुष्काळाने त्या पिकालाही मार दिला आहे. यंदा अमेरिकन नागरिकांना त्यांचा पितृपाट भलताच महागात जाणार आहे. हे सगळे सुरू असताना ओबामांचे सरकार झोपले आहे का? जगावर सत्ता गाजविणारी अमेरिका या दुष्काळातून नागरिकांना दिलासा देऊ शकत नाही काय? सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. नवनव्या पाणीपुरवठा, सिंचन योजना आखल्या जात आहेत. गावांना, शहरांना त्यासाठी अनुदाने दिली जात आहेत. ओबामा सत्तेवर आल्यापासून एकटय़ा कॅलिफोíनयाच्या ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांसाठी ३१० दशलक्ष डॉलर एवढी प्रचंड रक्कम खर्च करण्यात आली आहे आणि तरीही तेथील अनेक भाग कोरडे आहेत. केवळ अमेरिकेतच अशी परिस्थिती आहे असे नाही. त्या खंडातील पनामा, कोलंबा, व्हेनेझ्युएला, ब्राझील, बोलेव्हिया अशा अनेक देशांत अवर्षण आहे. याचा परिणाम सर्वात आधी भोगावा लागतो तो शेतकऱ्यांनाच. सहा महिन्यांपूर्वी 'न्यूजवीक'ने एक मुखपृष्ठकथा केली होती. तिचे नाव होते शिवारातले मृत्यू. अवर्षणातून येणारा कर्जबाजारीपणा आणि वैफल्य यांचा पहिला आणि खरे तर अखेरचाही बळी असतो तो बळीराजाच. हे चित्र जसे महाराष्ट्रात दिसते तसेच ते समृद्धीचे आगार असलेल्या अमेरिकेतही असते हेच त्या वृत्तलेखाने स्पष्ट केले. (लोकसत्ताच्या आजच्या अग्रलेखातून )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा