रविवार, ११ जानेवारी, २०१५

कोकरांनी  आपआपल्या कळपात रहावे.

प्रत्येक धर्माचे (आणि जातीचे सुद्धा) कळप झाले आहेत. गुराख्यांचे समूह त्यांना हाकताहेत. कालक्रमणात ते कळपाला वेळोवेळी (इतर धर्माच्या/ जातींच्या) लांडग्यान्पासून सावध राहण्याचे इशारे देत असतात. ते इशारे असे असतात. " तुम्ही (कोकरांनो ) काळजी घ्या, सावध रहा, लांडगे (? )केंव्हा तुमचे लचके तोडतील याचा नेम नाही, तुम्ही सतत आमच्या सोबत रहा, आमच्या मागोमाग चालत रहा (म्हणजेच निवडणुकांमध्ये आम्हाला निवडून द्या). आणि हेच गुराखी नंतर लांडग्यान्सोबत पार्ट्या करतांना दिसतात तेंव्हा कळपातील काही कोकरे कमी झालेली दिसतात हे इतर कोकरांच्या लक्षातही येत नाही. काही गुराखी म्हणतात सर्व मराठी कोकरांनी माझ्या मागे रहा (म्हणजे मी अमराठी लोकांना राज्यसभेवर पाठवू शकेल) , काही म्हणतात सर्व दलित कोकरांनी माझ्या मागे रहा (म्हणजे मला मंत्रीपदासाठी दावा करता येईल), काही गुराखी म्हणतात सर्व मराठ्यांनी माझ्या मागे रहा ( म्हणजे ………… काय ते तुम्ही समजा ). अर्थात ही फक्त वानगी झाली. सर्व जाती धर्मात आणि पोट जातीत अशा गुराख्यांची मांदियाळी आहे. अर्थात गुराखी सुरवातीला प्रामाणिकपणाच्या भावनेने यात उडी घेतो. मात्र कालांतराने जेंव्हा सत्तासुन्दरीची चाहूल लागते तेंव्हा मात्र कोकारांचा बळी देऊन तो तीला हस्तगत करू पाहतो. सत्तासुन्दरीने भल्याभल्या विश्वामित्रांचा तपोभंग केला आहे. कोकरांमध्ये काही गटप्रमुख असतात ते गुराख्याला उचकावतात, " भाऊ, असा चानस पुन्हा येणार नाही, बेलाशक लांडग्यांसोबत ' सोबतीचा करार करा ', कोकरांना आम्ही समजावतो लांडग्यानसोबत गोडीगुलाबीने राहण्यातच कोकारांची कशी भलाई आहे ते. " आणि मग कोकरांचे रक्षणकर्ते गुराखी आणि लांडगे एकाच ताटात जेवतांना दिसून येतात. अशा प्रकारे सर्वच साठा उत्तराची कहाणी वारंवार पाचा उत्तरी सुफळ संपन्न होतांना दिसत राहते.
राजेंद्र कडू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा