मंगळवार, २४ फेब्रुवारी, २०१५

अति(दूर)दर्शन महागात पडणार काय ?


आपल्या देशात दूरदर्शन येउन अर्ध शतकाचा काळ लोटला. पण खरे महत्व आले १९८२ च्या एशियाड सामन्यांपासून. तेंव्हा चार महानगरांसोबतच इतर काही महत्वाच्या शहरांमध्ये दूरदर्शन पोहोचले. त्यानंतर मात्र लगेचच  दुसरऱ्या वर्षी म्हणजे १९८३ साली पंतप्रधान इंदिरा गांधीनी दररोज एक लघुशक्ती प्रक्षेपक उभारण्याचे उद्दिष्ट नभोवाणी खात्याला दिले. त्या मोहिमेत जिल्ह्यांच्या ठिकाणीच नव्हे तर तालुक्यांच्या गावीसुद्धा दूरदर्शन पोहोचले. आता जरी राजकारण्यांना आपली छबी लोकांना वारंवार लोकासमोर ठेवण्यासाठी दूरदर्शनचा उपयोग होत असला तरी इंदिरा गांधींना मात्र याचा लाभ मिळण्याआधीच त्यांची निर्घृण हत्या झाली व त्यांची अन्त्ययात्रा व अन्त्यसंस्कारच लोकांना दूरदर्शनवर पाहायल मिळाले. त्यानंतर पंतप्रधान झालेल्या राजीव गांधी यांचे मात्र भरपूर (दूर)दर्शन लोकांना झाले. त्यांच्या प्रत्येक भाषणातील ' हमे देखना हैं " हा तकिया कलामही  लोकांच्या पाठ झाला होता. मात्र हे अतिदर्शन राजीवजींना महागात पडले व नंतर १९८९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचा पराभव झाला. त्यांच्यानंतर आलेले व्हि .पी सिंग ही दोन वर्षातच पाय उतार झाले. त्यानंतर राजकारणातून निवृत्ती पत्करलेले व सामानाची बांधाबांध करून हैदराबादला जायच्या तयारीत असलेल्या सौम्य प्रकृतीच्या नरसिंहराव यांच्या शिरावर १९९१ मध्ये पंतप्रधानपदाची जबाबदारी येउन पडली. त्यांनी पाच वर्षे नाईट वाचमन म्हणून काढले. बिगर गांधी असल्यामुळे त्यांना प्रसिद्धीचे तंत्र कदाचित गवसले नसावे. नंतरचे दोन पंतप्रधान एक एक वर्षाचा आपआपला ओव्हर खेळून गेले. त्यांना आपली खुर्ची सांभाळण्याच्या कसरतीमुळे दूरदर्शनच्या ताकदीकडे लक्ष देता आले नाही. नंतर मात्र प्रथम १३ महिने व नंतर पाच वर्षे अशी सहा वर्षे भाजपचे अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते. त्यांच्या मंत्रिमंडळात प्रमोद महाजानांसारखे कॉर्पोरेट संस्कृतीची जाण असलेले तडफदार मंत्री होते. या काळात सरकार व नेत्यांच्या प्रसिद्धीसाठी दूरदर्शनचा भरपूर वापर करण्यात आला. वाजपेयींच्या कार्यकाळाच्या शेवटच्या वर्षात तर दूरदर्शन व वृत्तपत्रांमधून 'फील गुड' व 'शायनिंग इंडिया'चा जनतेवर मारा करण्यात आला. आणि या अतिप्रसिद्धीनेच भाजपचा घात केला. कारण जो सतात नजरेसमोर समोर दिसतो त्याची जनता चिकित्सा करत असते. तशी चिकित्सा जनतेने वाजपेयींची व भाजपची केली आणि त्यांना घरी जावे लागले. २००४ मध्ये सत्तेवर आलेल्या मनमोहनसिंगांनी मात्र पदावर येताच आपला फोटो कुठल्याही सरकारी कार्यालयात लावू नये व कारण नसतांना आपल्याला दूरदर्शनवर  दाखवू नये अशी सक्त ताकीद दिली. त्यामुळे की काय जनतेने त्यांना पुन्हा २००४ पेक्षा जास्त जागांवर निवडून दिले. म्हणजे परत असेच म्हणावे लागते की लोकांना जर तुम्ही माफक (दूर)दर्शन दिले तर तुमची जास्त चिकित्सा केली जात नाही. आता मोदी मात्र कधी दूरदर्शन, कधी आकाशवाणी, कधी दिलकी बात, कधी मनकी बात, कधी झाडू तर कधी दहा लाखाचा अंगरखा असे सतत लोकांसमोर येत राहतात. ज्याप्रमाणे राजीव गांधी, वाजपेयी यांना या अति (दूर)दर्शनाचा फटका बसला तसा मोदींनाही बसेल असा माझा अंदाज आहे. राजकारणीच नव्हे तर अण्णा हजारेंना सुद्धा या अति(दूरदर्शनाचा फटका बसला आहे. दिल्लीत भरपूर (दूर)दर्शन दिल्यामुळे मुंबईतील त्यांचे आंदोलन फ्लॉप झाले होते. याचे कारण माझ्यामते एकच, जो सतत नजरेसमोर असतो त्याची चिकित्सा केली जाते. तशीच ती अण्णांची झाली असावी. आणि अशी ही चिकित्सा ती बहुतेक नकारात्मक फळच देते. तेंव्हा मोदींना  या अति(दूर)दर्शनाचा फटका बसू शकतो असे माझे मत आहे. कारण की तुम्ही लोकांसमोर येउन जितके जास्त बोलाल तितके तुमच्या उक्ती व कृतीची तुलना केली जाते आणि उक्तीपेक्षा कृतीचे पारडे केंव्हाही हलकेच भारत असते. म्हणूनच तुकारामांनी म्हटले आहेकी " बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाउले"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा