शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०१५

१९६५ आणि १९७१ च्या युद्धांमध्ये भेदभाव का ?

१९६५ च्या भारत पाकिस्तान युद्धाचे ५० वे वर्ष सरकार साजरे करत आहे. हा सोहळा १ ते २६ सप्टेंबर चालेल. या युद्धात भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून लाहोर शहराला वेढा घातला होता. अमेरिकेने पाकिस्तानला पुरवलेले ११० रणगाडे (कुप्रसिद्ध Pattern Tank ) भारतीय सैन्याने ताब्यात घेतले होते. तर बलाढ्य अशा Sabarjet विमानांचा आपल्या चिमुकल्या Nat विमानांनी धुव्वा उडवला होता. " Nat सलामत तो Sabarjet पचास " अशी म्हणच तेंव्हा प्रचलित झाली होती. विशेष म्हणजे आपली सर्व युद्धसामग्री ब्रिटीशकालीन म्हणजे १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यावर आपल्याला वारशाने मिळालेली होती. हे सर्व स्व. पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या नेतृवाखाली घडले (आणि त्यांची छाती ५६ इंची नक्कीच नव्हती).
यापेक्षाही अभिमानाची गोष्ट घडली ती १९७१ मध्ये. तेंव्हा भारताने पाकिस्तानचा समोरासमोरच्या युद्धात निर्णायक पराभव केला होता. तेंव्हा पाकिस्तानी सैन्याचे कमांडर जनरल एए क़े नियाझी यांनी भारतीय कमांडर लेफ्ट जनरल जगजीतसिंग अरोरा यांच्या समोर लेखी शरणागती पत्करली होती. व ९३,००० पाक (की नापाक) सैनिक भारताच्या ताब्यात आले होते त्यांना ताब्यात घेऊन भारतात आणल्या गेले होते. युद्धबंद्यांचा हा आकडा एक जागतिक विक्रम आहे व तो आजतागायत मोडल्या गेलेला नाही. शरणागतीची तारीख होती  १७ डिसेंबर १९७१. व पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी. लष्कर प्रमुख होते जनरल Sam Maanekshaa. त्यांना त्यांच्या या अद्वितीय कामगिरीसाठी फिल्ड मार्शल हा हुद्दा देण्यात आला. भारतीय सैन्यातील ते एकमेव फिल्ड मार्शल आहेत.
शेवटी  एक प्रश्न शिल्लक राहतो. ६५ च्या युद्धाचे संस्मरण साजरे करणाऱ्या सरकारला   मागील १७ डिसेंबरला ७१ च्या युद्धाचा स्मरण दिन साजरा करावेसे का वाटले नाही. की सध्याचे सरकार शास्त्री परिवारापासून काही धोका नाही आणि गांधी परिवारापासून धोका आहे असे समजते. कारगिल विजय मात्र दरवर्षी साजरा केला जातो. कारगिल जर विजय होता तर बांगला युद्ध 'महाविजय' होता. राजकीय साठमारीत शहिदांची उपेक्षा नको.
आतापर्यंत देशासाठी शहीद झालेल्या सर्व वीरांना सश्रद्ध अभिवादन.
राजेंद्र कडू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा