बुधवार, २ डिसेंबर, २०१५

कुठे घेऊन चाललायात महाराष्ट्र माझा ? ………

अबू सालेमचा तुरुंगातील नवाबी थाट  
- तुुरुंग अधीक्षक हिरालाल जाधव

मुंबईतील तळोजा तुरुंगात छळ होत असल्याचा आरोप करणाऱ्या गँगस्टर अबू सालेमचा तुरुंगातील नवाबी थाट अाता उघड झाला आहे. कारागृहातील सालेमच्या शाही जीवनाची पोलखोल इतर कुणी नव्हे, तर ज्यांच्यावर सालेमने छळाचा आरोप केला होता, त्या तुुरुंग अधीक्षक हिरालाल जाधव यांनीच केली आहे. सालेमचा छळ केल्याच्या आरोपावरून जाधव यांची सध्या चौकशी सुरू आहे.
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील आरोपी असलेल्या सालेमला तुरुंगात असूनही दररोज अंघोळीसाठी गरम पाणी मिळते. तो तुरुंगात सर्रासपणे मोबाइल वापरतो. अबू सालेम तुरुंगात इतर कैद्यांबरोबर मेजवान्या झोडतोय. तिथे त्याला घरचे जेवणही मिळते. इतकेच नव्हे, तर आजारी असल्याचा बनाव करत तपासणीसाठी वारंवार तुरुंगाबाहेर जाणारा सालेम येताना  'केएफसी'चे चिकनही घेऊन येतो, असा खळबळजनक खुलासा जाधव यांनी केला आहे. चौकशीदरम्यान त्यांनी दिलेल्या लेखी उत्तराद्वारे ही माहिती उघड झाली आहे. तुरुंगातील सालेमची ही मौजमस्ती बंद केल्यामुळेच सालेमने आपल्यावर छळाचे आरोप केल्याचा दावा जाधव यांनी उत्तरात केला आहे. जाधव यांच्याकडून आपला सतत छळ होत असून हा प्रकार आपल्याला आत्महत्येस प्रवृत्त करणारा असल्याचा आरोप टाडा न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून गँगस्टर अबू सालेमने केला होता. त्यानंतर तुरुंग विभागाचे महासंचालक बिपीनकुमार सिंग यांनी चौकशीचे आदेश दिले होते.
तुरुंगात सालेमसोबत राहत असलेला कैदी क्रमांक ३३९ राजा उत्तलिंगम नाडर हा सालेमचा तुरुंगातील सेवक आहे. तो सालेमचे कपडे धुतो, त्याच्यासाठी चहा बनवतो आणि जेवण देतो. त्याची भांडीही धुतो, कोठडी साफ ठेवतो. त्याबदल्यात सालेम त्याला चैनीच्या सुविधा पुरवतो. तुरुंगातील कैद्यांना दिल्या जाणाऱ्या मेजवान्यांसाठी केएफसी चिकन आणताना सालेमला अनेकदा पकडण्यात आल्याचेही जाधव यांनी म्हटले आहे. सोबतच तिघा-चौघांना पुरेल इतके जेवण त्याला घरून येते. हे जेवणही तो आपल्या कोठडीत कैदी आणि इतर कोठड्यांतील कैद्यांमध्ये वाटून खातो. त्यामुळे सालेम हा कैदी आहे की नवाब असा प्रश्न पडावा, अशीच त्याची तुरुंगातील वागणूक असते.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा