सोमवार, ४ जानेवारी, २०१६

शेगाव :

एक आगळे वेगळे देवस्थान.



विदर्भवीर जाम्बुवन्तराव धोटे यांनी श्री संत गजानन महाराज संस्थान व इतरही धार्मिक स्थळांना टीकेचे लक्ष्य केल्यामुळे इतर स्थळांबद्दल जरी नाही तरी शेगाव संस्थानाबद्दल माझे जे आकलन आहे ते वाचकांच्या समोर मांडणे मला आवश्यक वाटले. माझ्या मते शेगावचे संत गजानन महाराज संस्थान देशात आगळे वेगळे देवस्थान ठरावे असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. संस्थान परिसरात प्रवेश करताच ते लक्षात येते.  संस्थान परिसरात लक्षणीय अशी स्वच्छता ठेवल्या जाते. सेवेकरी सतत साफसफाईमध्ये मग्न दिसतात. सेवेकरयांना स्वच्छ पांढरा  नेहरू सदरा ,पायजामा, व टोपी असा गणवेश दिलेला आहे. भाविकाने फुलांच्या पुडीचा कागद किंवा दोरा जरी खाली टाकला तरी अजिबात न खेकसता सेवेकरी तो तत्परेतेने उचलून घेतात. भाविकांना दर्शनासाठी मार्गदर्शन करतांना " माउली " हेच संबोधन त्यांच्या तोंडून ऐकू येते. येथे भाविक म्हणजे पुजारयाचा गुलाम/आश्रित  नसून एक व्हीआयपी म्हणून त्याला वागविल्या जाते. इतर बऱ्याच देवस्थानांमध्ये मात्र भाविक पुजारी/पंडे /बडवे यांच्या मर्जीवर देवदर्शनाचा लाभ घेतांना दिसतात.

निवासासाठी आरामदायक अशा खोल्या असलेल्या  " भक्तनिवास " नामक भव्य इमारती उभारलेल्या आहेत. भाडेही अगदी माफक. एका वेळेस पाच हजार भाविक राहू शकतील एवढी भक्तनिवासांची एकूण क्षमता आहे. खोली उपलब्ध नसेल तर अत्यंत आरामदायक व प्रशस्त अशा  (स्वच्छ प्रसाधनगृहाची सोय असलेल्या) स्वागत कक्षात खोली उपलब्ध होईपर्यंत निवांत बसण्याची सोय आहे. भाविक आल्या आल्या सेवेकरी पाण्याचे ग्लास घेऊन हजर होतो. शेगाव व्यतिरिक्त गजानन महाराज जेथे जेथे गेले होते तेथे तेथे उदा. ओंकारेश्वर , त्र्यंबकेश्वर, आळंदी, पंढरपूर वगैरे ठिकाणी भक्तनिवासांची अशीच व्यवस्था केलेली आहे. मात्र कोणत्याही ठिकाणच्या भक्तनिवासामधल्या खोल्यांचे आगाऊ आरक्षण दिले जात नाही. (आता फक्त शेगाव येथील भक्तनिवासाचे ऑन लाईन आरक्षण सुरु झाले आहे) भक्त निवासाला हॉटेलचे स्वरूप येऊ नये म्हणून हा नियम केलेला असावा.

रेल्वे स्थानक (बस स्थानक ) ते संस्थान तसेच संस्थान ते आनंद सागर व परत निशुल्क बस सेवा आहे व त्यासाठी भरपूर बसेस संस्थांनकडे आहेत व स्वतःचा पेट्रोल पंप ही  आहे. बस सेवा निशुल्क आहे म्हणून वाहक चालक भाविकांना हिडीसफिडीस करतील असे मुळीच नाही. सौजन्य हा इथला परवलीचा शब्द असावा. जेवणाची माफक दरात सोय आहे व त्यासाठी संस्थान परिसरात दोन तर आनंद  सागर परिसरात दोन ( पैकी एक पर्यटन क्षेत्रात व एक प्रवेशद्वाराजवळ ) भोजन कक्ष आहेत. नम्रता पूर्वक सेवा हे संस्थानचे वैशिष्टे आहेत. भाविकांवर डाफरणे हा प्रकार महाराष्ट्रात सर्वत्र आढळतो त्याचा येथे मागमूसही नाही. बहुधा डाफरणे हा शब्दच यांच्या शब्दकोशात नसावा. अगदी सुरक्षारक्षक सुद्धा हा नियम पाळतांना दिसतात.

गर्दीचे उत्कृष्ट व्यवस्थापन हा संस्थानचा हातखंडा प्रयोग आहे. लाखोंची  गर्दी उसळली  तरी  श्रींचे  दर्शन सुरळीतपणे पार पडेल याची येथे खात्री असते . महोत्सवी वर्षात तीन ते चार किलोमीटर रांग होती. संपूर्ण मार्गात भाविकांसाठी अल्पोपहार, पिण्याचे पाणी , सुसज्ज रुग्णवाहिकेसह डॉक्टरांचा ताफा अशी सोय शेगाव संस्थानच करू जाणे. प्रगट दिनानिमित्त दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक शेगावी येतात . हा सोहळा दरवर्षी माघ वद्य सप्तमीला ( या वर्षी  १ मार्च  २०१५ ला ) असतो.

या सर्व यंत्रणेमागे संस्थानचे अध्यक्ष आदरणीय शिवशंकर पाटील यांची प्रेरणा व मार्गदर्शन आहे. संस्थानचे काहीही नको म्हणून पिण्याचे पाणी सुद्धा घरून आणणारे भाऊ संस्थेद्वारे चालविल्या जाणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील सशुल्क जागा सुद्धा गुणवत्तेनुसार भरल्या जातील याची दक्षता घेतात. नातेवाईकांची वर्णी लावणे हा प्रकार येथे नाही. सेवेकरयांच्या कुटुंबियांची अन्नधान्याची बेगमी करून दिल्या जाते. विना मोबदला काम करण्यास तयार असणाऱ्या सेवेकरयांची नेहमीच मोठी प्रतीक्षा यादी असते व कधी कधी वर्ष दोन वर्षानंतर नंबर लागतो. असे हे आगळे वेगळे गजानान महाराज संस्थान शेगाव.

मी सश्रद्ध असा भाविक नाही मात्र एक कुतूहल म्हणून मी कुटुंबीयांसोबत नेहमीच शेगावला जातो. जे श्रद्धावान भाविक आहेत ते संस्थानाविषयी अधिक चांगले मनोगत व्यक्त करू शकतील असे मला वाटते . धोटे जींनी शेगावला न जाताच शेरेबाजी केलेली दिसते. व सगळ्यांनाच एका तराजूने तोलण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. विशेष म्हणजे बुलडाणा जिल्ह्यातील एका धार्मिक स्थळी वार्षिक यात्रेत मनोरुग्णांना उपचाराच्या नावाखाली यातना दिल्या जातात व रुग्णांच्या नातेवाईकांची पिळवणूक केल्या जाते त्याबद्दल मात्र त्यांनी कुठलाही  उल्लेख केला नाही.  असा सर्वधर्मसमभाव काय कामाचा ?
विठ्ठल एकदा पंढरीतून बेपत्ता होऊन सावता माळ्याच्या हृद्यात लपून बसले होते अशी आख्यायिका आहे. देव हा भक्तांच्या हृद्यात वसतो हे शेगाव संस्थानच्या संचालकांनी व सेवेकर्यांनी ओळखले. म्हणून तेथे सदैव भाविकांना माउली असे संबोधतात तेंव्हा या आख्यायिकेची त्याची प्रचीती येत.
शेगाव मुंबई-नागपूर रेल्वेमार्गावर असून येथे बहुतेक जलद गाड्या थांबतात
संकेतस्थळ www.gajananmaharaj.org 

राजेंद्र कडू ,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा