रविवार, २१ फेब्रुवारी, २०१६

ओशोंनी म्हटले आहे……. 

 एखाद्या समाजात फक्त पुरुषच असतील तर त्यातील काहीजणांची प्रवृत्ती स्त्रैण होईल आणि फक्त स्त्रियाच असतील तर काहीजणी पुरुषी वृत्तीच्या होतील. दिव्य  मराठी मधील या फिचरमुळे ते सिद्ध होते. बातमी अशी, "चीनमध्ये पालकांना काळजी,  मुलांची वाढ मुलींप्रमाणे". 
फुजोच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक लिन वाई यांना वर्गात मुलांना दररोज शौर्यकथा शिकवण्याची सवय आहे. मुलांनी धाडसी व्हायला पाहिजे, त्यांनी महिलांचे संरक्षण करून वाईटावर मात करण्यासाठी पुढे आले पाहिजे, अशी शिकवण ते देत असतात.
लिन यांच्या या सवयीलाही एक विशेष कारण आहे. ते म्हणजे चीनमधील शिक्षण क्षेत्रात शिक्षकांची संख्या खूप कमी आहे आणि त्यामुळे नव्या पिढीतील मुलांची वागणूक स्त्रियांसारखी होऊ लागल्याची चिंता त्यांना भेडसावते. परिणामी, चिनी शिक्षणतज्ज्ञ वर्गात पारंपरिक लिंगभेद पद्धती आणि मूल्यप्रणाली पुन्हा स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहेत. याचा परिणाम म्हणून झेंग्झोच्या शाळेत मुलांकडून "रिअल मॅन'प्रमाणे वागणूक करण्याचे आश्वासन घेतले जात आहे. शांघाय येथील शाळांचे मुख्याध्यापक केवळ मुलांसाठीच्या वर्गात मार्शल आर्ट, संगणक दुरुस्ती, भौतिकशास्त्राचे शिक्षण सक्तीचे करण्याच्या प्रयत्नात आहेत. पूर्व चीनच्या हांगझाऊमधील शाळांमध्ये उन्हाळी वर्ग सुरू करण्यात आले आहेत. त्यास "वेस्ट पॉइंटबॉय' नाव देण्यात आले आहे. येथील मुलांसाठी विशेष तायक्वांदो वर्ग सुरू करण्यात आला आहे. मुलांत लपलेल्या पुरुषांना बाहेर काढणे हा त्याचा उद्देश आहे.
संपूर्ण चीनचे शिक्षण अधिकारी शिक्षकांच्या नियुक्तीसाठी प्रयत्नीशील आहेत. यावरून तेथील समस्येचे गांभीर्य कळून येते. चिनी प्रसारमाध्यमांनी "पुरुषत्वाची उभारणी आवश्यक' असल्याचा इशारा दिला. दुसरीकडे चीनमधील अस्थिर अर्थव्यवस्थेमुळे पालक मुलांच्या भविष्याबाबत धास्तावले आहेत. त्यामुळे तेही मुलांसमोर पुरुष रोल मॉडेल्स ठेवत आहेत. त्यांना पाहून धाडस, बलिदान आणि भावना तयार व्हावी हा यामागचा उद्देश आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार शाळेत शिक्षिकांवर कामाचा जास्त ताण असल्यामुळे त्यांच्या मुलांवर उलट परिणाम होत आहे. यामुळे मुलांमधील नेतृत्व क्षमता कमी होते. २० लाख लोकसंख्येच्या फुजो शहरात शिक्षकांचेच प्रमाण जास्त हवे. त्यांच्या नियुक्त्यांसाठी विशेष सवलत दिली जावी या सूचनेवरून शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांवर टीका होत आहे. यासंदर्भात फुजिआल नॉर्मल युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी शुआ रॉन्गफांग म्हणाली, पुरुषांच्या पारंपरिक क्षेत्रात महिलांचा शिरकाव होण्यासाठी त्यांनाही अशा सवलती का दिल्या जात नाहीत? असे असले तरी या वाद-विवादाची दुसरीही बाजू आहे. प्राथमिक वर्गांसाठी शिक्षिकांच्या नियुक्तीचा मुलांवर चांगला परिणाम होतो, असे बहुतांश शिक्षकांचे म्हणणे आहे. फुजो येथील केजीची शिक्षिका म्हणाली, मुलांची गरज ओळखण्याची क्षमता महिलांमध्ये जास्त असते. मुलांना मुलांप्रमाणे वागणूक करण्याची शिकवण देणे शाळांची नव्हे, तर पालकांची जबाबदारी आहे. चीनमधील शिक्षणतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेसह संपूर्ण जगात शिक्षक भरतीमध्ये असंतुलित लिंगभेदाची स्थिती आहे. मात्र चीनमध्ये हे अंतर स्पष्ट आहे.(दिव्य मराठी)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा