३० वर्षांच्या पोलिस सेवेत १७२ रिवॉर्ड मिळवणारे फौजदार,
झेरॉक्स काढायला आले अन् पोलिस होऊनच घरी परतले
उत्कृष्ट सेवेसाठी पोलिस पदकाने होणार सन्मानित | ||
यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील खर्डा गावंडी हे राजेंद्र होटे यांचे मूळ गाव. १९८४ मध्ये त्यांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली. शिक्षण झाल्यानंतर सैन्यात जायचे आणि देशसेवा करायची हे त्यांनी ठरवले होते. दरम्यान, परीक्षेचा निकाल लागला म्हणून गुणपत्रिकाच्या झेरॉक्स काढायच्या होत्या. गावात किंवा आजूबाजूला झेरॉक्सची सोय नसल्याने राजेंद्र होटे धामणगाव रेल्वेला आले. त्याच ठिकाणी त्यांना माहीत झाले की, उद्या गडचिरोलीला पोलिस भरती आहे. त्यामुळे ते त्याच ठिकाणाहून रात्रीच्या रेल्वेने रवाना झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिस भरतीला उभे राहिले आणि पोलिसात दाखल झाले. यवतमाळ जिल्ह्यातून जाऊन त्यांनी गडचिरोलीला पोलिस दलात सेवा सुरू केली. मागील २८ वर्षे ते गडचिरोलीतच कार्यरत होते. या काळात त्यांनी गडचिरोली, सिरोंचा, रेगोडा, देसाईगंज आणि स्थानिक गडचिरोलीसह इतर ठिकाणीसुद्धा सेवा केली. गडचिरोलीतील २८ वर्षांच्या सेवेत त्यांनी नेहमी प्रामाणिकपणे सेवा केली. त्याचेच फळ त्यांना आतापर्यंत तब्बल १७२ वेळा रिवॉर्ड मिळाले. गडचिरोलीला असताना होटे हे पोलिस शिपाई ते पोलिस जमादारपदापर्यंत कार्यरत होते. त्याच काळात त्यांना १७२ पैकी तब्बल १६५ पदके मिळाली आहेत. होटे २०१४ मध्ये अमरावतीला बदलीवर आले. त्याच वर्षी त्यांनी विभागीय परीक्षा उत्तीर्ण करून फौजदार पदावर बढती मिळवली. सध्या ते फौजदार म्हणून जिल्ह्यातील मंगरुळ दस्तगीर पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. कामाला न्याय मिळाला "२८ वर्षे गडचिरोली सेवा केली. या सेवाकाळात प्रामाणिकपणा आणि अधिकाधिक उत्तम काम करण्यावर भर होता. त्यामुळेच मला कधीही अडचण गेली नाही. या उत्तम कामगिरीमुळेच आतापर्यंत १७२ रिवॉर्ड मिळाले आहे. तसेच केंद्र शासनाचे पोलिस सेवा पदक जाहीर झाले. या पदकाने आमच्या कामाला न्याय मिळाला आहे".- राजेंद्र होटे, पोलिस उपनिरीक्षक. वडिलांची इच्छा पूर्ण झाली मी फौजदार व्हावे, अशी वडिलांची इच्छा होती. या इच्छापूर्तीसाठी उशीर झाला. मात्र, आज फौजदार झालो. वडिलांची इच्छा पूर्ण केल्याचे समाधान आहे. यातही पोलिस सेवा पदक मिळाल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे, असे फौजदार होटे यांनी सांगितले. - अनुप गाडगे अमरावती(दिव्य मराठी) |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा