सोमवार, २२ फेब्रुवारी, २०१६

भारतात कुणालाच राहायचे नाही, 

असा निष्कर्ष आज प्रसिद्ध झालेल्या बातमीवरून काढल्यास ते वावगे ठरणार नाही. बातमीत असे म्हटले आहे की पासपोर्ट जारी करणाऱ्या देशांमध्ये चीन आणि अमेरिकेनंतर भारताचा तिसरा क्रमांक लागतो. हा आकडा ६० लाखांवरून १ कोटी २० लाखांवर गेला. त्यासाठी परराष्ट्र खात्याची ३७ कार्यालये व ९० सेवाकेंद्रे आहेत. भाजपाच्या काही नेत्यांनी लोकांना सरळ सरळ धमकावणेच सुरु केले आहे की मोदींना विरोध करणाऱ्यांनी, गोमांस खाणाऱ्यानी पाकिस्तानात निघून जावे. लोकांनी हे फारच मनावर घेतलेले दिसते. 





आम्ही सारे फाऊंडेशनचा (एक लाखाचा) कार्यकर्ता पुरस्कार गजाननअमदाबादकरांना


शेतकरी आंदोलक तथा लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या 'छात्र युवा संघर्ष वाहिनी'च्या मुशीतून तयार झालेले कार्यकर्ते गजानन अमदाबादकर यांना आम्ही सारे फाऊंडेशनचा कार्यकर्ता पुरस्कार जाहीर झाला आहे. एक लाख रूपये रोख सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या २० मार्च रोजी सायंकाळी वाजता मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात त्यांना हा पुरस्कार बहाल केला जाईल. प्रख्यात साहित्यिक प्राचार्य डॉ. विठ्ठल वाघ, शेतकरी नेते चंद्रकांत वानखडे अमर हबीब यावेळी उपस्थित राहणार आहेत. समाजजीवनाच्या एखाद्या क्षेत्रात आयुष्य झोकून देवून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला दरवर्षी 'आम्ही सारे' कार्यकर्ता पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यापूर्वी लेखक अमर हबीब, विजय विल्हेकर सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
 

१३२ वर्षांपूर्वीची सहिष्णुता ……… 

१३२वर्षांपूर्वीच बंदी
एएमयू (अलिगढ मुस्लिम युनिवर्सिटी) चा दावा आहे की, विद्यापीठाचे संस्थापक सर सय्यद अहमद खान यांनी १८८४ मध्येच कॅम्पसमध्ये गोमांसावर बंदी आणली होती. कॅम्पसमध्ये गोमांसावर बंदी असलेली देशातील हे बहुतेक पहिलीच शैक्षणिक संस्था आहे.
इतकेच नव्हे तर खान यांनी बकरी ईद एएमयूच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही गायीची कुर्बानी देऊ नये, असे सांगितले होते. (सविस्तर बातमी काळाच्या दिव्यमराठीमध्ये)


रविवार, २१ फेब्रुवारी, २०१६

अनेक देशांत कर्कश संगीत नृत्यावर बंदी………. 


स्वित्झर्लंडच्या लुसाने शहरात सायलेंट डिस्को बेकायदेशीर आहे. यात लोक हेडफोन घालून नाचतात. अधिकाऱ्यांच्या मते, सायलेंट डिस्कोचे नाव असूनही त्यांच्या कार्यक्रमांचा आवाज स्थानिकांसाठी कटकटीचा होता. अनेक देशांत नृत्य, गाण्यांवर अस्वाभाविक बंदी लागू आहे.
जर्मनी- टेंझवरबॉट(नृत्यावरील बंदी) कायद्यानुसार ईस्टरदरम्यान डान्स पार्ट्यांच्या आयोजनावर बंदी आहे. उत्सवाचे पावित्र्य लक्षात घेऊन ही तरतूद केलेली आहे. पायरेट पार्टी समूह याच्याविरोधात नृत्यांचे आयोजन करत असतो.
जपान- १९४८पासून मध्यरात्रीनंतर सार्वजनिक ठिकाणी नृत्य करण्याच्या बंदीचा नियम सरकारने मागच्या वर्षी हटवला. २०२० मध्ये टोकियो ऑलिम्पिकसाठी हा निर्णय घेण्यात आला.
ब्राझील-२०००२००८ मध्ये ब्राझीलने डान्स पार्टीवर बंदी घातली होती. रेडलाइट वसाहतीतील अशा आयोजनांवर कडक निर्बंध लावले गेले. पोलिसांच्या मते, याचा गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध आहे. २००९ पासून अशा पार्ट्या पुन्हा सुरू झाल्या.
टांझानिया-सरकारनेमागच्या वर्षी किंगोडोरो नृत्यावर बंदी घातली. सोशल मीडियावर या विवस्त्र नृत्याबाबत खूप टीका सुरू होती. त्यामुळे टांझानियाची राष्ट्रीय ओळख धोक्यात होती.
ज्युलियाजोराथियन(दिव्यामराठी)

ओशोंनी म्हटले आहे……. 

 एखाद्या समाजात फक्त पुरुषच असतील तर त्यातील काहीजणांची प्रवृत्ती स्त्रैण होईल आणि फक्त स्त्रियाच असतील तर काहीजणी पुरुषी वृत्तीच्या होतील. दिव्य  मराठी मधील या फिचरमुळे ते सिद्ध होते. बातमी अशी, "चीनमध्ये पालकांना काळजी,  मुलांची वाढ मुलींप्रमाणे". 
फुजोच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक लिन वाई यांना वर्गात मुलांना दररोज शौर्यकथा शिकवण्याची सवय आहे. मुलांनी धाडसी व्हायला पाहिजे, त्यांनी महिलांचे संरक्षण करून वाईटावर मात करण्यासाठी पुढे आले पाहिजे, अशी शिकवण ते देत असतात.
लिन यांच्या या सवयीलाही एक विशेष कारण आहे. ते म्हणजे चीनमधील शिक्षण क्षेत्रात शिक्षकांची संख्या खूप कमी आहे आणि त्यामुळे नव्या पिढीतील मुलांची वागणूक स्त्रियांसारखी होऊ लागल्याची चिंता त्यांना भेडसावते. परिणामी, चिनी शिक्षणतज्ज्ञ वर्गात पारंपरिक लिंगभेद पद्धती आणि मूल्यप्रणाली पुन्हा स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहेत. याचा परिणाम म्हणून झेंग्झोच्या शाळेत मुलांकडून "रिअल मॅन'प्रमाणे वागणूक करण्याचे आश्वासन घेतले जात आहे. शांघाय येथील शाळांचे मुख्याध्यापक केवळ मुलांसाठीच्या वर्गात मार्शल आर्ट, संगणक दुरुस्ती, भौतिकशास्त्राचे शिक्षण सक्तीचे करण्याच्या प्रयत्नात आहेत. पूर्व चीनच्या हांगझाऊमधील शाळांमध्ये उन्हाळी वर्ग सुरू करण्यात आले आहेत. त्यास "वेस्ट पॉइंटबॉय' नाव देण्यात आले आहे. येथील मुलांसाठी विशेष तायक्वांदो वर्ग सुरू करण्यात आला आहे. मुलांत लपलेल्या पुरुषांना बाहेर काढणे हा त्याचा उद्देश आहे.
संपूर्ण चीनचे शिक्षण अधिकारी शिक्षकांच्या नियुक्तीसाठी प्रयत्नीशील आहेत. यावरून तेथील समस्येचे गांभीर्य कळून येते. चिनी प्रसारमाध्यमांनी "पुरुषत्वाची उभारणी आवश्यक' असल्याचा इशारा दिला. दुसरीकडे चीनमधील अस्थिर अर्थव्यवस्थेमुळे पालक मुलांच्या भविष्याबाबत धास्तावले आहेत. त्यामुळे तेही मुलांसमोर पुरुष रोल मॉडेल्स ठेवत आहेत. त्यांना पाहून धाडस, बलिदान आणि भावना तयार व्हावी हा यामागचा उद्देश आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार शाळेत शिक्षिकांवर कामाचा जास्त ताण असल्यामुळे त्यांच्या मुलांवर उलट परिणाम होत आहे. यामुळे मुलांमधील नेतृत्व क्षमता कमी होते. २० लाख लोकसंख्येच्या फुजो शहरात शिक्षकांचेच प्रमाण जास्त हवे. त्यांच्या नियुक्त्यांसाठी विशेष सवलत दिली जावी या सूचनेवरून शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांवर टीका होत आहे. यासंदर्भात फुजिआल नॉर्मल युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी शुआ रॉन्गफांग म्हणाली, पुरुषांच्या पारंपरिक क्षेत्रात महिलांचा शिरकाव होण्यासाठी त्यांनाही अशा सवलती का दिल्या जात नाहीत? असे असले तरी या वाद-विवादाची दुसरीही बाजू आहे. प्राथमिक वर्गांसाठी शिक्षिकांच्या नियुक्तीचा मुलांवर चांगला परिणाम होतो, असे बहुतांश शिक्षकांचे म्हणणे आहे. फुजो येथील केजीची शिक्षिका म्हणाली, मुलांची गरज ओळखण्याची क्षमता महिलांमध्ये जास्त असते. मुलांना मुलांप्रमाणे वागणूक करण्याची शिकवण देणे शाळांची नव्हे, तर पालकांची जबाबदारी आहे. चीनमधील शिक्षणतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेसह संपूर्ण जगात शिक्षक भरतीमध्ये असंतुलित लिंगभेदाची स्थिती आहे. मात्र चीनमध्ये हे अंतर स्पष्ट आहे.(दिव्य मराठी)

मुंबई पोलिस नेहमी न. १ 

पोस्टाने तक्रार, पोलिसांकडून लगेच दखल, पैसेही मिळाले


अमरावती शहरात राहणारे एक ६० वर्षीय व्यक्ती कुटुंबासह मुंबईत गेले होते, दरम्यान एका टॅक्सीचालक त्याच्या सहकाऱ्याने त्यांची हजार ६०० रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणाची अमरावतीच्या या गृहस्थांनी डाकेद्वारे तक्रार केली. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन मुंबई पोलिसांनी आरोपी शोधले, त्याच्याकडून ही रक्कम वसूल केली आणि इतकेच नाही, तर ही रक्कम अमरावतीतील या गृहस्थांच्या बँक खात्यात टाकून त्यांना परतसुद्धा पाठवली. या प्रकाराने ते आश्चर्यचकित झाले असून, त्यांनी पोलिस दलाचे आभार मानले आहे.
शहरातील स्वस्तिकनगरात राहणारे दिलीप बसवंतराव देशमुख यांनाच आलेला हा पोलिसांचा सुखद अनुभव. त्यांनी हा अनुभव 'दिव्य मराठी'ला सांगितला. दिलीप देशमुख सेवानिवृत्त बँक व्यवस्थापक आहेत. त्यांच्या कुटुंबासह दुबईला जाण्यासाठी जानेवारीला ते मुंबईत गेले. त्यांनी दादर पश्चिमवरून विमानतळावर जाण्यासाठी टॅक्सी ठरवली. टॅक्सीत बसल्याबरोबर या टॅक्सीजवळ एक व्यक्ती आला. हा व्यक्ती आणि टॅक्सीचालक यांच्यात आर्थिक देवाणघेवाणीवरून वाद सुरू होता. दरम्यान, त्या व्यक्तीने देशमुख यांना हजार रुपयांची चिल्लर आहे का? असे विचारले. त्या वेळी देशमुख यांनी दोन पाचशे रुपयांच्या उर्वरित.पान १२
नोटात्यांना दिल्या. काहीवेळातच तो व्यक्ती देशमुख यांना म्हणाला, तुम्ही मला १०० रुपयांच्याच नोटा दिल्या. रात्रीची वेळ असल्यामुळे अंधारात होऊ शकते आपली चूक असे समजून त्यांनी पुन्हा त्याला पाचशे रुपयांच्या दोन नोटा दिल्या. त्यानंतर चालक तो व्यक्ती सोबतच होता. देशमुख यांना टॅक्सीने विमानतळावर सोडून दिले, त्या वेळी तब्बल ९९० रुपये बिल झाले असे सांगून तेसुद्धा पैसे घेतले. हा सर्व प्रकार देशमुख यांच्या लक्षात आला, ज्या ठिकाणी २०० ते २५० रुपये मीटरप्रमाणे बिल यायला पाहिजे होते, त्या ठिकाणी जास्त रक्कम घेतली. मात्र, त्याच्याशी बोलण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता. कारण दुबईला जाणारे विमान होते. दरम्यान, देशमुख यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी या टॅक्सीचा क्रमांक घेतला आणि दुबईला निघून गेले. दरम्यान, १२ जानेवारीला ते अमरावतीत परत आले. त्यांनी १३ जानेवारीला पोलिसांकडे मुंबईत डाकेद्वारे या प्रकरणात तक्रार केली. तक्रार केल्यानंतर याबाबत दखल घेईल किंवा नाही, हा नंतरचा प्रश्न होता. पण आश्चर्यच, मुंबई पोलिसांकडून देशमुख यांना २८ जानेवारीला फोन आला की, तुमची फसवणूक करणाऱ्या दोघांना आम्ही पकडले असून, तुमचे हजार ६०० रुपयेसुद्धा जप्त केले आहे. ही रक्कम तुम्हाला परत करायची आहे, यासाठी तुमचा खातेक्रमांक द्या, त्यामुळे देशमुख यांनी खातेक्रमांक पाठवला. नंतर देशमुख यांना दुसरा सुखद धक्का बसला तो १५ फेब्रुवारीला ही रक्कम पोलिसांनीच त्यांच्याच बँक खात्यात जमा केली होती. एखादे यापेक्षाही लहान प्रकरण झाल्यास पोलिस ठाण्यात जा, तक्रार नोंदवा, पायपीट करा, असे अनेक अनुभव पोलिसांचे सर्वसामान्यांना आले आहे. मात्र, देशमुख यांचा अनुभव लक्षात घेता. पोलिस अनेकदा सर्वसामान्यांची कशाप्रकारे दखल घेतात त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात, हे या प्रसंगावरून दिसून येते.
विश्वासच बसत नाही
^मंुबईतएकाटॅक्सीचालक त्याच्या सहकाऱ्याने हजार ६०० रुपयांनी आम्हाला फसवले. याप्रकरणी डाकेने तक्रार केली. या तक्रारीची नोंद घेऊन पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन आमची रक्कमसुद्धा जप्त केली. तसेच खात्यात परतसुद्धा टाकली. हा प्रकार आमच्यासाठी आश्चर्यकारक आहे. आमचा यावर विश्वासच बसत नाही आहे. महाराष्ट्र मुंबई पोलिसांचे आम्ही आभार मानतो. दिलीप देशमुख, सेवानिवृत्तबँक व्यवस्थापक, अमरावती.

गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०१६

अनुपम खेर म्हणाले होते " पद्म पुरस्कार म्हणजे एक विनोदच आहे. आणि मोदी सरकारने त्यांनाच यावर्षी पद्मविभूषण पुरस्कार देऊन आपली विनोदबुद्धी शाबूत आहे हे सिद्ध करून दाखवले. परंतु काही लोक मात्र या पुरस्कारालाच मोठे करतात. त्यापैकी एक म्हणजे अमरावतीचे सेंद्रिय/नैसर्गिक/अध्यात्मिक शेतीचे गाढे अभ्यासक व खंदे प्रचारक श्री सुभाषराव पाळेकर. त्यांना यावर्षी पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांचा संपर्क क्रमांक - ०९४०५८३६४१० संकेतस्थळ www.palekarzerobudgetspiritualfarming.org/ 

सोमवार, ८ फेब्रुवारी, २०१६

साधना फॉरेस्ट ………

इस्रायलचे अविराम रोजीन नोकरी सोडून भारतात आले, 
१३ वर्षांत ७० एकर पडीक जमिनीवर १८ हजार झाडे लावली


ऑरोविले (तामिळनाडू) ही कथा आशेचा किरण जागवणारी आहे. २००० ची घटना आहे. इस्रायलचे अविराम राेजीन आणि त्यांची पत्नी योरिटी यांना भारतातील हिरवाईने भुरळ घातली. केरळमधील वन क्षेत्र पाहून त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. प्रवास पुढे वाढत त्यांनी तामिळनाडूच्या ऑरोविलला भेट दिली. येथील पडीक जमीन पाहून मन खिन्न झाले. लोकांशी संवाद साधल्यानंतर येथील जमीन पिकत नसल्याने लोकांनी स्थलांतर केल्याचे सांगण्यात आले. यातूनच त्यांना येथील लोकांसाठी काही तरी केले पाहिजे, याची प्रेरणा मिळाली. या निश्चयातून ते भारतात परतले. ऑरोविलेमध्ये त्यांनी ७० एकर शेती विकत घेतली. स्थानिक लोकांच्या मदतीने हिरवाई फुलवण्यासाठी हळूहळू प्रयत्न होऊ लागले. १३ वर्षांच्या अविश्रांत मेहनतीला फळ मिळाले. त्यांनी पडीक जमिनीवर १८ हजार झाडे लावली. अविराम यांनी नव्या वनाला साधना फॉरेस्ट असे नाव दिले. विशेष म्हणजे, यामध्ये बहुतांश फळझाडे आहेत.
रोपटे न्याहाळताना अविराम रोजीन.
साधना फॉरेस्टमध्ये बनवलेली झोपडी आणि सोलर पॅनल. इन्सेट पर्यावरणानुकूल वातावरणात आयुष्याचा आनंद घेताना देश-विदेशातील पर्यटक.
हे ठिकाण पूर्णपणे पर्यावरणानुकूल नैसर्गिक आहे
रोजीन म्हणाले, हा पर्यावरणानुकूल प्रयोग आहे. इथे झोपडी तयार करण्यात आली आहे. सौर ऊर्जेतून झगमगाट निर्माण करण्यात आला आहे. बायो टॉयलेट तयार करण्यात आले आहे. जगभरातील साधारण १५० युवा स्वयंसेवक इथे कार्यरत असतात. इथे ते वृक्षारोपण करून आयुष्याचा आनंद घेतात. हे ठिकाण आकाराला येण्यासाठी स्थानिक लोकांनी खूप परिश्रम घेतले. यामुळे रोजगारासाठी स्थलांतर होण्याचे प्रमाण घटले आहे. साधना फॉरेस्टचे हेच उद्दिष्ट होते. घटलेली पाणी पातळी वाढवण्यावर आम्ही भर देत आहोत. कमी पाण्यामुळे जमीन पडीक होते. त्यामुळे तलाव, चर खोदून पावसाचे पाणी मुरवले जात आहे. 

या वनात बहुतांश फळझाडे आहेत. उदा. : केळी, नारळाची झाडे आहेत.
शाकाहारी किचनमध्ये ऊर्जाबचतीच्या शेगड्या पवनऊर्जेवर चालतात.
या संस्थेने हैती आणि केनियामध्ये असे कार्य सुरू केले आहे.
रोजीन यांनी गावात लोकांना पडीक जमिनीवर शेतीचे प्रयोग शिकवले.
साधना फॉरेस्टमध्ये देश-विदेशातील १५० लोक कायम दिसतात.





 

रविवार, ७ फेब्रुवारी, २०१६

  श्वेत्ता भट्टड यांनी शेतकऱ्यांच्या व्यथांकडे लक्ष वेधण्यासाठी दोन तास स्वत:ला जमिनीत पुरून घेतले. जनमंचच्या नागपूरच्या शेतकरी मेळाव्यात सामाजिक कार्यकर्त्या आर्टीस्ट श्वेत्ता भट्टड यांनी शेतकऱ्यांच्या व्यथांकडे लक्ष वेधण्यासाठी दोन तास स्वत:ला जमिनीत पुरून घेतले. पर्यावरण परिषदे दरम्यान पॅरीस येथे स्वत:ला शवपेटीत पुरून घेऊन पर्यावरणाच्या ऱ्हासाकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर तिसऱ्यांदा त्यांनी नागपुरात हे प्रतिकात्मक आंदोलन केले. देशपांडे सभागृहाच्या परिसरात खड्डा खणून त्यात कॉफीन ठेवली. श्वेता भट्टड यांनी त्यात दोन तास घालवले. कॉफीनमध्ये हवेचा पुरवठा होईल, अशी व्यवस्था केली होती. डॉक्टरांची चमूही सज्ज होती. सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून त्यांच्यावर देखरेख ठेवली जात होती. पुणे, पॅरिसनंतर तिसऱ्यांदा नागपुरातच हे प्रतिकात्मक आंदोल करीत असल्याचे श्वेता भट्टड यांनी सांगितले. जगात शेतकऱ्यांची हीच परिस्थिती असल्याचे शेतकऱ्यांशी संवाद साधल्यावर आपल्या लक्षात आले, असेही त्या म्हणाल्या. या प्रतिकात्मक आंदोलनात जीवाला धोका असल्याने आम्ही श्वेताला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या निर्धारापुढे आमचे काही चालले नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी तिच्या आईने व्यक्त केली.(सविस्तर बातमी आजच्या दिव्यमराठीमध्ये)





शुक्रवार, ५ फेब्रुवारी, २०१६

३० वर्षांच्या पोलिस सेवेत १७२ रिवॉर्ड मिळवणारे फौजदार,  

झेरॉक्स काढायला आले अन् पोलिस होऊनच घरी परतले
उत्कृष्ट सेवेसाठी पोलिस पदकाने होणार सन्मानित
३१ वर्षांपूर्वी म्हणजेच १९८४ मध्ये झेरॉक्स काढण्यासाठी घराबाहेर पडलेला युवक थेट पोलिस दलात भरती होऊनच घरी परतला. जवळपास २८ वर्षांच्या गडचिरोली येथील सेवेकाळात त्यांना तब्बल १७२ रिवॉर्ड मिळाले. प्रामाणिकपणा आणि अधिकाधिक उत्तम सेवेचे फळ म्हणून यंदा केंद्र शासनाच्या गृह विभागाने त्यांना पोलिस पदकही जाहीर केले आहे. ५३ वर्षीय या जिद्दी आणि बहाद्दूर पोलिस उपनिरीक्षकांचे नाव आहे राजेंद्र पुंडलिकराव होटे.
यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील खर्डा गावंडी हे राजेंद्र होटे यांचे मूळ गाव. १९८४ मध्ये त्यांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली. शिक्षण झाल्यानंतर सैन्यात जायचे आणि देशसेवा करायची हे त्यांनी ठरवले होते. दरम्यान, परीक्षेचा निकाल लागला म्हणून गुणपत्रिकाच्या झेरॉक्स काढायच्या होत्या. गावात किंवा आजूबाजूला झेरॉक्सची सोय नसल्याने राजेंद्र होटे धामणगाव रेल्वेला आले. त्याच ठिकाणी त्यांना माहीत झाले की, उद्या गडचिरोलीला पोलिस भरती आहे. त्यामुळे ते त्याच ठिकाणाहून रात्रीच्या रेल्वेने रवाना झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिस भरतीला उभे राहिले आणि पोलिसात दाखल झाले. यवतमाळ जिल्ह्यातून जाऊन त्यांनी गडचिरोलीला पोलिस दलात सेवा सुरू केली. मागील २८ वर्षे ते गडचिरोलीतच कार्यरत होते. या काळात त्यांनी गडचिरोली, सिरोंचा, रेगोडा, देसाईगंज आणि स्थानिक गडचिरोलीसह इतर ठिकाणीसुद्धा सेवा केली. गडचिरोलीतील २८ वर्षांच्या सेवेत त्यांनी नेहमी प्रामाणिकपणे सेवा केली. त्याचेच फळ त्यांना आतापर्यंत तब्बल १७२ वेळा रिवॉर्ड मिळाले. गडचिरोलीला असताना होटे हे पोलिस शिपाई ते पोलिस जमादारपदापर्यंत कार्यरत होते. त्याच काळात त्यांना १७२ पैकी तब्बल १६५ पदके मिळाली आहेत. होटे २०१४ मध्ये अमरावतीला बदलीवर आले. त्याच वर्षी त्यांनी विभागीय परीक्षा उत्तीर्ण करून फौजदार पदावर बढती मिळवली. सध्या ते फौजदार म्हणून जिल्ह्यातील मंगरुळ दस्तगीर पोलिस ठाण्यात कार्यरत आहे.
कामाला न्याय मिळाला
"२८ वर्षे गडचिरोली सेवा केली. या सेवाकाळात प्रामाणिकपणा आणि अधिकाधिक उत्तम काम करण्यावर भर होता. त्यामुळेच मला कधीही अडचण गेली नाही. या उत्तम कामगिरीमुळेच आतापर्यंत १७२ रिवॉर्ड मिळाले आहे. तसेच केंद्र शासनाचे पोलिस सेवा पदक जाहीर झाले. या पदकाने आमच्या कामाला न्याय मिळाला आहे".- राजेंद्र होटे, पोलिस उपनिरीक्षक.

वडिलांची इच्छा पूर्ण झाली
मी फौजदार व्हावे, अशी वडिलांची इच्छा होती. या इच्छापूर्तीसाठी उशीर झाला. मात्र, आज फौजदार झालो. वडिलांची इच्छा पूर्ण केल्याचे समाधान आहे. यातही पोलिस सेवा पदक मिळाल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे, असे फौजदार होटे यांनी सांगितले. -

अनुप गाडगे अमरावती(दिव्य मराठी)
 

सोमवार, १ फेब्रुवारी, २०१६

जुलमाचा राम राम   ………

ब्रिटिश खासदारांना आता शरियाची सक्ती
बांधकामामुळे नवीन इमारतीत आसन व्यवस्था

ब्रिटिश खासदारांना शरिया कायद्याची अंमलबजावणी करावी लागू शकते. त्यात मद्यपान करणे या गोष्टीचाही समावेश आहे. सध्या ब्रिटिश संसद भवनाच्या डागडुजीचे काम सुरू आहे. त्यासाठी ४ अब्ज पौंडाचा खर्च येणार आहे. त्यामुळे हाऊस ऑफ कॉमन्सच्या सदस्यांची पंचाईत झाली आहे.
ब्रिटनच्या संसदीय समितीने त्यावर उपाय शोधून काढला आहे. सदस्यांना बसण्यासाठी रिचमंड हाऊसमध्ये तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. येथे आरोग्य मंत्रालयाचे कार्यालय आहे, परंतु लंडनच्या व्हाइट हॉल पॉलिटिकल हबमधील ही इमारत दोन वर्षांपूर्वी एका इस्लामिक बॉड स्कीम सुकूक योजनेसाठी निधीचा पुरवठा करण्यासाठी देण्यात आली होती. ही इमारत लीजवर देण्याची अट ठेवण्यात आली होती. त्याचा वापर शरिया कायद्याच्या विरोधात केला जाणार नाही. 'द टाइम्स'नुसार खासदार या इमारतीमध्ये आल्यास त्यांना दारू पिणे सोडावे लागेल आणि शरिया कायद्याचे पालन करावे लागेल. वेस्टमिन्स्टरमधून सहा वर्षे बाहेर राहण्याची तयारी खासदारांना करावी लागणार आहे. त्यांना तत्काळ वेस्टमिन्स्टरमधील १० बार आणि रेस्तरांमध्ये जाणेही सोडावे लागेल. जुलै २०१४ मध्ये अर्थमंत्री जॉर्ज ओस्बोर्न यांनी इस्लामिक निधीची घोषणा केली होती. पाश्चात्त्य देशातील ही सर्वात मोठी घोषणा होती. सुमारे २० कोटी पौंडाचे बॉन्डसला सुकूक नाव देण्यात आले होते.(दिव्यमराठी)
 

पंचावन्न कोटीचे बळी ............. 

From the post of Ajit Phanse
Ajit Phanse, Ajay Patil and Tukaram Bhosale posted in कारण एकच राजकारण.
Ajit Phanse
January 30 at 8:21am

इयत्ता चौथी च्या पुस्तकात नथूराम गोडसे ह्या माथेफिरुने तत्कालीन भारत सरकारने पकिस्तानला 55कोटि दिले म्हणून म.गांधीं ना ठार मारले असे वाचले होते तेव्हा पासुन नथूराम म्हणले की 55कोटि आठवायचे आणि त्याने बरोबरच केले असे वाटायचे.ह्या समजुती ला जोरदार तडाखा दिला तो जगण फडणिसांनी.
महात्म्याची अखेर ह्या पुस्तक प्रकाशच्या निमित्ताने तें सातारयाच्या नगर वाचनालयात आले होते, त्यानिमित्त त्यांनी तासभर भाषण केले आसवे. आपल्या पुस्तकातील महत्वाच्या बाबी स्पष्ट करताना नथुरामने फाळणी पूर्वीच म .गांधींना मारण्याचे अनेक प्रयत्न केले होते हे तपशीलवार सांगितले, ते भाषण ऐकून मी हादरलो .अरे 55कोटि चा प्रश्नच नसताना हा मनुष्य म.गांधींना मारण्याचा प्रयत्न करत होता म्हणजे काय ? मग तो माथेफिरु पण नसणार. मग तो चौथीचा धडा कोणी लिहिला असावा. अनेक प्रश्न मनात उभे राहिले.जगण फडणिसांचे ते पुस्तक ह्या सर्व प्रश्नाचं उत्तर देते.ते पुस्तक वाचून मग मी जिथे जिथे संधी मिळेल तिथे नथूरामाचे खोटेपणा सांगू लागलो.पुस्तकात स्वातंत्र्य पूर्वी गांधीजी पाचगणीला आले असताना त्यांच्यावर नथूने हल्ला केला असल्याची नोंद आहे आणि हा हल्ला रोखला होता भिलार या पाचगणी जवळच्या गावातील बाळासाहेब भीलारे या तरुणाने.
हल्ला करताना नथूचा हात बाळासाहेब भीलारेने तो वरच्या वर पकडला होता. बाळासाहेब भीलारे ना प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला तो पत्रकार मित्रांच्या मुळे त्यावेळी तें राष्टावादी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष होते त्यांनी तोच किस्सा पुन्हा एकदा सांगितला. गांधी हत्या प्रयत्नात फाळणी प्रश्नच नसताना होता ह्याचा तो जीता जागता पुरावा होता.
पाचगणी पोलीस स्टेशनला आज ही त्या गुन्ह्याची नोंद आहे
आज हत्येनंतर 55कोटी साठी म.गांधी जी चा ख़ून केला असे उल्लेख असलेले पाठ्यपुस्तक नाही तसेच नथू भक्त पण कबूल करतात हत्या 55कोटी साठी नव्हतीच.
फाळणीचा प्रश्न नसताना सन 1934 पासुन म.गांधीजीना नथूराम मंडळी मारण्याचे प्रयत्न करित होती.ह्या मंडळी नी कधी फाळणी ज्यांनी केली तें ब्रिटिश किंवा ज्यांना फाळणी पाहीजे होती तें मुस्लिम ह्यांना कधी मारण्याचा प्रयत्न का केला नाही हा प्रश्न आज ही अनुत्तरित राहतो

कर्नाटकमध्ये आता प्रेम करायचीही भीती वाटते ! ………

देशातील सर्वात युवा साहित्यिक मुद्दू तीर्थहळ्ळी हिची खंत;
राज्यात दादागिरी वाढतेय
लेखक,कलावंतांना धमक्या मिळणं कर्नाटकात नित्याचंच आहे. त्यातूनच नवा इतिहास मांडू पाहणाऱ्या एम. एम. कलबुर्गी यांचा खून झाला. आमच्या राज्यात सांस्कृतिक संघटनांची दादागिरी इतकी वाढलीय की, िमत्र िनवडताना तो परधर्मीय नाही ना, याचा हजारदा िवचार करावा लागतो. एकेकाळच्या सहिष्णू आणि पुरोगामी असणाऱ्या कर्नाटकात आता प्रेम करायचीही भीती वाटत अाहे, अशी खंत साहित्य अकादमी पुरस्कार परत करणारी देशातील सर्वात अल्पवयीन साहित्यिक मुद्दू तीर्थहळ्ली हिने 'दिव्य मराठी'कडे व्यक्त केली.
गुजरातमधील नवसारीजवळच्या दांडी येथे शनिवारी शेकडो लेखक, कलावंत जमले होते. देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या विरोधात त्यांनी 'निर्भय बनो' रॅली काढली. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी १७ वर्षीय मुद्दू येथे आली होती. 'कलबुर्गी माझे मार्गदर्शक होते. धारवाडला त्यांना अनेकदा भेटले होते. त्यांची हत्या झाल्यानंतर मला धक्का बसला. हत्येचा निषेध करायला पाहिजे असं वाटलं. त्याचा एकमेव मार्ग पुरस्कार वापसी हा होता. त्यामुळेच साहित्य अकादमी पुरस्कार परत केल्याचं तिनं सांगितलं.
बारावीत शिकणाऱ्या मुद्दूच्या दोन कादंबऱ्या, दोन कवितासंग्रह आणि ललित लेखाचं एक अशा पाच कलाकृती प्रकाशित झाल्या आहेत. बारा वर्षांची असताना मुद्दू साहित्य अकादमी पुरस्काराची मानकरी ठरली. तिच्या ललित लेखसंग्रहास २०११ मध्ये कर्नाटक साहित्य अकादमीचा 'युवा पुरस्कार' मिळाला. कन्नड लेखक डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची हत्या झाली, तेव्हा मुद्दूने आपला पुरस्कार परत केला. पुरस्कार वापसीच्या चळवळीतील सर्वात अल्पवयीन म्हणून मुद्दू त्यावेळी चर्चेत आली होती.

'जंगलाच्या वाटेवरचे फूल' या तिच्या कादंबरीवर चित्रपट आला आहे. शिमोगातील सह्याद्री हायस्कूलमध्ये बारावीत ती शिकते आहे. तिला कन्नड साहित्यात पीएच. डी. करायची आहे. म्हणूनच दहावीला ८० टक्के गुण िमळूनही तिने कला शाखा निवडली. शाळकरी वयात कादंबरीकार झालेल्या मुद्दुच्या कुटुंबात लेखनकलेचा वारसा नव्हता. आई गृहिणी तर वडील मरीन इंजिनिअर आहे.
मुद्दू म्हणाली-
'कर्नाटकात आज सहलीच्या बसमध्ये परधर्मीय विद्यार्थ्यांबरोबर जाता येत नाही.
काय खावं, काय नेसावं या बाबी संघटना ठरवू लागल्यात. मोठेपणी काय बनायचं, हेसुद्धा आम्ही ठरवायचं नाही. मग प्रेम वगैरे तर सोडूनच द्या, इतका कर्नाटक बदलला आहे.'
कर्नाटकात याआधी भाजपचं सरकार होतं. आता काँग्रेसचं आहे. सरकार बदलूनही मुस्कटदाबी कायम आहे. सरकार कोणत्याही पक्षाचं असले तरी खरा प्रश्न अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा आहे, असं तिचं म्हणणं आहे.
(अशोक अडसूळ | दांडी (गुजरात)दिव्य मराठी)