सोमवार, ३१ ऑक्टोबर, २०१६

१९३७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस मंत्रिमंडळे निवडून आल्यानंतर कैद्यांच्या परिस्थितीत थोडा बदल झाला. अंदमानच्या तुरुंगातील संघर्षांला व्यापक जनसमर्थन मिळाले आणि परिस्थिती स्वातंत्र्यसैनिकांच्या बाजूची बनली. परत परत होणाऱ्या संघर्षांमुळे कैद्यांना भारताच्या मुख्य भूमीवर आणणे आणि त्यांना वेगवेगळय़ा प्रांतातील तुरुंगात ठेवणे ब्रिटिश सरकारला भाग पडले.
आजच्या काळात या पुस्तकाचे आणखी एक महत्त्व आहे. संघपरिवाराच्या नेतृत्वाखालील प्रतिगामी शक्ती जाणीवपूर्वक साम्यवाद्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. साम्यवाद्यांना देशद्रोही म्हणत आहेत, त्यांनी ब्रिटिश सत्ताधाऱ्यांसोबत तडजोडी केल्याचे धादांत खोटे विधान पसरवत आहेत. त्यांनी अंदमानच्या राजकीय कैद्यांच्या संघर्षांचा इतिहास अभ्यासावा. त्यांनी तो प्रामाणिकपणे अभ्यासला तर त्यांना कळेल की साम्यवादी ब्रिटिशांशी कसे संघर्ष करत होते. एके काळी बहुतांशी राजकीय कैदी साम्यवादी होते. अनेक जण अंदमानात असताना आणि परत आल्यानंतर साम्यवादी कार्यकर्ते बनले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतलं हे सत्य कोणीही पुसून टाकू शकत नाही. स्वातंत्र्यसंघर्षांत असलेलं साम्यवाद्यांचं योगदान कोणीही नाकारू शकत नाही. राजकीय मतभेद हा वेगळा मुद्दा आहे. (लोकसत्ता, लोकरंग दिनांक ३१/१०/२०१६)

लेकुरे उदंड झाली,


या नाटकाबाबतची एक विशेष बाब आहे. अमेरिकेत न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, फिलाडेल्फिया, शिकागो, बोस्टन, डेट्रॉईट, टोरांटो या ठिकाणी आमच्या ‘लेकुरे’चे प्रयोग झाले. सातासमुद्रापार गेलेल्या या पहिल्या मराठी नाटकात मी होते याचा मला विशेष अभिमान आणि आनंद आहे. या दौऱ्यासाठी कोणीही प्रायोजक नव्हता. आम्ही सर्व कलाकारांनी स्वत:च्या पदरचे पैसे घालून हा दौरा ठरवला होता. येण्या-जाण्याचा खर्च आम्हीच करणार होतो. प्रयोगाची तांत्रिक व्यवस्था आम्ही कलाकारच सांभाळणार होतो. तेथील काही मराठी मंडळींकडून आमची निवासाची आणि जेवणखाणाची व्यवस्था केली जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. पण तिकडे गेल्यावर हे आश्वासन पूर्ण होऊ शकले नाही आणि आमची भलतीच पंचाईत झाली. ठरल्याप्रमाणे आम्ही पहिला प्रयोग केला आणि पुढचे प्रयोग करायचे की नाही, यावर चर्चा झाली. पण सर्वानुमते प्रयोग करायचे ठरले. आमचा सगळा खर्च भागविण्यासाठी प्रत्येक प्रयोगानंतर आम्ही प्रेक्षकांमध्ये ताट फिरवत होतो. त्यात जे पैसे जमा व्हायचे ती रक्कम प्रयोगातील सर्व कलाकारांमध्ये समान वाटप केली जायची. त्यामुळे कमावणे तर सोडाच; पण गमावण्याची वेळ आली होती. प्रयोगादरम्यान एका अमेरिकन महिलेने आम्हा सगळ्या कलाकारांना तिच्या घरी जेवायला बोलावले आणि चक्क श्रीखंड-पुरीचे जेवण करून घातले. हा अपवाद करता आमच्या या अमेरिकन दौऱ्याचा अनुभव विदारक होता.

(लोकसत्ताच्या या रविवारच्या लोकरंग पुरवणीतीळ लेखातून)
आज स्व. इंदिराजींची पुण्यतिथी......त्यांच्या स्मृतीस वंदन आणि आदरांजली.......

Blood telegram या Gary Bass यांनी लिहिलेलं पुस्तक अवश्य वाचा. 1970-71 च्या काळात बांगलादेशात (तेव्हाचे पूर्व पाकिस्तान) Archer Blood हे अमेरिकन Counsel General होते आणि त्यांच्या तत्कालीन अमेरिकन परराष्ट्र खात्याशी झालेल्या पत्रव्यवहारावर आणि व्हाईट हाऊस च्या declassified ऑडिओ टेप्स वर आधारित पुस्तक आहे. अमेरिकन नजरेतून इंदिरा गांधी पाहायला मिळतील. त्यातील दोन प्रसंग इथे मुद्दाम सांगतो....
1) युद्धपूर्वी इंदिराजी पाकिस्तान लष्कराच्या अत्याचार आणि याह्या खानच्या हुकूमशाही विरोधात जगभर जनमत तयार करत होत्या. स्वर्णसिंग हे मंत्री विशेषतः कार्यरत होते. नियोजित दौऱ्यावर इंदिराजी अमेरिकेत गेल्या. रिचर्ड निक्सन आणि हेन्री किसिंजर हे दोघे इंदिराजींचा अत्यंत द्वेष करत. व्हाईट हाउस च्या डिनरला निक्सन जगातल्या सर्व राष्ट्रांचे राजदूत आणि अमेरिकन सिनेटर याना मुद्दाम बोलावतात. सर्वांसमोर इंदिराजींचा पाणउतारा करायचा हे ठरवलेलं असतं. डिनर पूर्वी भाषणात toast करताना निक्सन अमेरिकेचं प्रभुत्व, अमेरिकेशी दुश्मनी घेतल्याचे दुष्परिणाम वगैरे अनेक विषय बोलून इंदिराजींवर दबाव आणण्यासाठी भाषण करतात. त्यांचे समर्थक जोरदार प्रतिसाद देतात, सर्वाना ते निक्सन यांचं सर्वोत्तम आणि आक्रमक भाषण वाटतं. त्या भाषणांनी आता इंदिराजी अत्यंत घाबरतील असं मत बनतं. भाषणाला उत्तर द्यायला इंदिराजी उभ्या राहतात आणि लेखकांनी लिहिलंय, "त्यानंतर सलग 40 मिनिट इंदिरा गांधी अमेरिकेच्या धोरण आणि नीतीला विवस्त्र करत होत्या. जगातल्या 20-21 देशांमधील अमेरिकेची लुडबुड, अत्याचार, पिळवणूक आणि शोषण त्यांनी स्पष्टपणे उघड मांडलं. किसिंजर यांना आठवण करून दिली कि तुम्ही स्वतः ज्यू असूनसुद्धा दुर्दैवाने हुकूमशाही अत्याचार, खून, बलात्कार या सर्व गोष्टी विसरला आहात. माझ्या देशात काही कोटी पीडित, अत्याचारग्रस्त निर्वासित आले आहेत आणि भारत त्यांना त्यांचा सन्मान, प्रतिष्ठा मिळवून देईल. सोबत असाल तर तुमच्या मदतीनं, नसाल तर एकटा भारत हे करेल". सर्व राजदूत, सिनेटर, अमेरिकन प्रेस हे स्तब्ध, थक्क झालेल्या अवस्थेत सोडून इंदिराजींनी जेवण केलं.

2) भारताने बांगलादेशात लष्कर पाठवून युद्ध सुरु केलं होतं. 8 दिवस उलटले होते. किसिंजर यांच्या सल्यावरून अमेरिकेन त्यांचं 7th fleet ला व्हिएतनाम जवळून बंगालच्या उपसागरात पाठवण्याचा आदेश दिला. अमेरिकेच्या भारतातील राजादूताने इंदिराजींना तसा निरोप पोहोचवला. आता तर इंदिरा गांधी solid घाबरणार आणि युद्धातून माघार घेणार याची खात्रीच अमेरिकेला वाटली. राजादूताने अमेरिकेत कळवलं होतं कि निरोप दिल्याबरोबर इंदिराजींचा चेहरा चिंताक्रांत झाला आणि तात्काळ उठून त्या चालू असलेल्या लोकसभेच्या विशेष अधिवेशनात गेल्या आणि त्यांनी सभागृहाला माहिती दिली आणि सांगितलं कि भारताची यावरील प्रतिक्रिया आणि भूमिका संध्याकाळी रामलीला मैदानावर जाहीर केली जाईल. तिकडे निक्सन आणि किसिंजर एकमेकांचे अभिनंदन करायला लागले, केक मागवला गेला. संध्याकाळी व्हाईट हाउस च्या situation room मध्ये इंदिराजींच्या भाषणाचा अनुवाद थेट फोनवर मिळेल याची व्यवस्था केली गेली. अचानक जाहीर केलेल्या पण लाखोंची उपस्थिती असलेल्या सभेत इंदिरा गांधी म्हणाल्या, "आज अमेरिकेनं धमकीवजा निरोप दिलाय कि त्यांचं 7th fleet आता भारताविरुद्ध बंगालच्या युद्धात उतरेल. अमेरिकेचा मानवी हक्कांबद्दलचा ढोंगीपणा आज उघडा झालाय पण मला त्यांना सांगायचं आहे कि भारत एकही पाऊल मागे हटणार नाही, उलट अत्यंत निकराने हे युद्ध लढेल. अमेरिका या युद्धात पडली, तर संपूर्ण जगाने पाहिलं नसेल असं यशस्वी युद्ध आम्ही लढू. बांगलादेश मुक्त होणारच". Situation room मधली अवस्था बघण्यासारखी होती. आता काय करायचं, युद्धात तर पडायचं नाहीये, नुसतं घाबरवायच होतं पण आता प्रतिआव्हानच मिळालंय, सन्मानजनक माघार तरी कशी घ्यायची याच विवंचनेत निक्सन आणि किसिंजर ची रात्र गेली.

निरंजन टकले यांच्या फेसबुक वॉलवरून 

शनिवार, २२ ऑक्टोबर, २०१६

हॅलो शब्द कसा प्रचलित झाला.

जुन्याकाळी फोन लावतांना टेलीफोन एक्सचेंजमधील ऑपरेटरला नंबर लावून मागावा लागायचा.

त्यासाठी ऑपरेटरला, please allow me to speak to xxxxx अशी विनंती करावी लागायची.

पुढे कालांतराने त्यातील to speak to हे शब्द गळाले व please allow me एव्हढेच राहिले.

आणखी काही काळाने त्यातील please हा शब्द गळाला व allow me शिल्लक राहिले.

आणखी काही काळाने त्यातील फ़क्त allow शिल्लक राहिले व पुढे त्याचा hello हा अपभ्रंश झाला.

आधी ऑपरेटरला hello म्हणायचे व नंतर त्याने नंबर जोडून दिल्यावर पलीकडील व्यक्तिला hello म्हणून संभाषणlला सुरुवात करायची.

आता आपण hello वरून hi वर येत आहोत.

अलेक्झांडर ग्रॅहम बेलला दोन मुली होत्या. एल्सी व मारीयाना. दोन मुलगे लहान असतांनाचं देवाघरी गेले होते.

गुरुवार, २० ऑक्टोबर, २०१६

सुरेश प्रभूंच्या निर्णयामुळे खाजगी बस चालकांना आनंदाच्या उकळ्या

दिवाळीला पुण्यावरून विदर्भात येणारांची संख्या हजारोत असते. खाजगी बसचालक यावेळेस प्रवाशांची प्रचंड लूट करतात. पुणे ते नागपूर-अमरावतीसाठी प्रसंगी दोन ते डीच हजार रुपयेही मोजावे लागतात. रेल्वेने पुणे-अमरावती-पुणे ही गाडी या हंगामात (व नेहमीसाठी पण) सोडावी ही जुनी मागणी.
तिला प्रभूंनी प्रतिसाद दिला.व एक महिन्याकरिता विशेष साप्ताहिक गाडी पुणे-अमरावती-पुणे धावणार आहे. मात्र ह्या गाडीचे वेळापत्रक म्हणजे असून अडचण नसून खोळंबा.

पुण्याहून ही विशेष साप्ताहिक गाडी दर बुधवारी दुपारी तीनला सुटून मध्यरात्रीनंतर पहाटे तीन वाजता अमरावतीस पोहोचते. आणि दर गुरुवारी अमरावतीहून दुपारी एक वाजता सुटून मध्यरात्री दोन वाजता पुण्यास पोहोचते. अमरावती हे वर्दळीचे स्टेशन नाही. रात्री रिक्षावाले सोडून सर्वत्र शुकशुकाट असतो. दोन्ही गंतव्य स्थानांना ही गाडी मध्यरात्री गैरसोयीच्या वेळी पोहोचणार असल्यामुळे तिला प्रतिसाद मिळणे कठीण आहे व म्हणजेच प्रवासी मिळत नाहीत याच सबबीखाली ती कायमची सुरु करता येत नाही असे उत्तर द्यायला प्रभू मोकळे.

प्रभूंनी एकाच दगडात दोन/तीन पक्षी मारले आहेत. कारण यावेळी पोहोचणारी गाडी देऊन त्यांनी ऑटो रिक्षावाल्यांनाही या लुटीत सामील करून घेतले आहे. प्रभूंची लीला अगाध आहे हेच खरे.

असाच प्रकार अमरावती-आगपूर-अमरावती इंटरसिटी एक्सप्रेस या गाडीबद्दल आहे. ती सकाळी साडे पाचला सुटते व इतक्या सकाळी शहराच्या सर्व भागातून स्टेशनकडे येण्यासाठी वाहनांची व्यवस्था नाही. ह्या गाडीची वेळ सकाळी साडे सहाची करावी या मागणीकडेही दुर्लक्ष केल्या जात आहे.


अशाच प्रकारे त्यांनी उधना(सुरत)-अमरावती साप्ताहिक विशेष गाडी दिली आहे ती सुद्धा अमरावतीला मध्यरात्री पोहोचणार आहे. म्हणजे तेच.

शिवाय सुरत-अमरावती-सुरत ही नियमित धावणारी त्रिसाप्ताहिक गाडी सुद्धा रात्री असावी अशी येथील व्यावसायिकांची मागणी आहे. कारण अमरावती येथील व्यावसायिक मोठ्या प्रमाणात सुरतला खरेदी साठी जात असतात व व्यवसायाची खोटी होऊ नये म्हणून ते रात्रीच्या प्रवासाला प्राधान्य देत असतात. परंतु ही गाडी कित्येक वर्षांपासून दिवसा धावते आहे.

राजेंद्र कडू

काहीही हं श्रीयुत ... 


लोकसत्ता दिनांक १९/१०/२०१६ मधील लेख

इस्रायलच्या सैनिकी कारवायांशी बरोबरी वा तुलना करण्याआधी त्या देशाचा लष्करी इतिहास पाहायला हवा.. कारगिल, पठाणकोट आणि उरी या आपल्या मार्च महिन्यातल्या परीक्षा आहेत. त्यात आपण सपशेल अपयशी ठरलो आणि नंतर मात्र जोर लावून ऑक्टोबरात यशस्वी झालो. इस्रायलचे असे एकदाही झालेले नाही..
शाळा वा महाविद्यालयाच्या ज्या वर्गात अल्बर्ट आइन्स्टाइन शिकत असतो त्या वर्गात दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या विद्यार्थ्यांने उत्तरायुष्यात शालेय कारकीर्दीविषयी बोलताना आइन्स्टाइन आणि मी पुढेमागेच होतो असे विधान केले तर ते असत्य नव्हे. परंतु तरीही ते सत्य नव्हेच नव्हे. याचे कारण या विधानावरून आइन्स्टाइन आणि ते विधानकर्त्यांची तुलना होत असताना या दोघांतील प्रत्यक्ष बौद्धिक अंतर किती हे वास्तव सोयीस्कररीत्या लपवले जाते. आइन्स्टाइनसारखा विद्यार्थी पहिला असणार हे उघड आहे आणि अशा वर्गात दुसरा क्रमांक कोणी तरी पटकावणार हेही उघड आहे. परंतु म्हणून दुसऱ्या क्रमांकाने स्वत:ची बरोबरी आइन्स्टाइनसारख्या व्यक्तीशी करण्याचे औद्धत्य दाखवावयाचे नसते. ते केविलवाणे हास्यास्पद ठरते. हा दृष्टान्त केवळ उदाहरणार्थ. जे व्यक्तींचे ते देशाचेही. म्हणजे एका देशाने अनेकदा एखादी कृती केली, उदाहरणार्थ इस्रायल, आणि कालांतराने दुसऱ्या देशाने तसेच काही हातपाय मारावयाचा प्रयत्न केला, उदाहरणार्थ भारत, तर ज्याप्रमाणे दुसऱ्या विद्यार्थ्यांने स्वत:ची तुलना आइन्स्टाइनबरोबर करणे हास्यास्पद तद्वत भारताने आपला पाट इस्रायलच्या पंगतीत स्वत:च मांडून घेणे केविलवाणे. राष्ट्रप्रेमाने भारलेल्यांना हा मुद्दा समजून घेणे बरीक अवघड असले तरी ज्यांची विचारक्षमता शाबूत आहे त्यांच्यासाठी काही महत्त्वाचे दाखले त्या पुष्टय़र्थ देणे उपयोगी ठरावे बहुधा.
सर्वप्रथम लक्षात घ्यायला हवे की शत्रुराष्ट्राचे सैनिक वा दहशतवादी हे इस्रायली जवानांच्या निजघरापर्यंत येण्याइतका इस्रायल गाफील राहिल्याचे एकही उदाहरण नाही. भारताबाबत अगदी अलीकडच्या काळातदेखील असे अनेक दाखले देता येतील. पठाणकोट आणि उरी हे अगदी ताजे. ही दोनही स्थळे सीमेलगत. म्हणजे यात प्रत्येकी दोनदा घुसखोरी झाली. भारत आणि पाक सीमेवर पहिली आणि दुसरी भारतीय लष्करी केंद्राच्या कुंपणातून झाली, ती. असे एकदा नव्हे तर दोन वेळा घडले. म्हणजे एकूण चार घुसखोऱ्या भारतीय सुरक्षा रक्षकांच्या नाकाखाली घडल्या. याशिवाय भारतीय जवानांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून बोट दाखवले जाणारे कारगिल. हे तिसरे उदाहरण. वास्तविक लष्करी अभ्यासकांच्या मते कारगिलइतकी नामुष्की आपल्या इतिहासात अन्य नाही. यास नामुष्की म्हणावयाचे कारण पाकिस्तानी जवान इतक्या खोलवर आपल्या प्रदेशात येतात, एक टेकडीच्या टेकडी पादाक्रांत करतात आणि त्या अवस्थेत काही आठवडे निवांत राहतात. याचा कोणताही सुगावा भारतीय लष्करास लागत नाही. जो लागतो तोदेखील स्थानिक मेंढपाळांनी माहिती दिल्याने. मग मात्र आपले शौर्य जागे होते आणि मोठय़ा तुंबळ युद्धानंतर आपण पाकिस्तानी घुसखोरांचा पराभव करतो. हा ‘विजय’ साजरा करणे म्हणजे मार्च महिन्यात दहावीला अनुत्तीर्ण झालेल्याने ऑक्टोबरच्या परीक्षेत शाळेत पहिला क्रमांक येणे साजरे करण्यासारखे. अशा वेळी या विद्यार्थ्यांस आनंदोत्सव काय करतोस, तू मुदलात आधी अनुत्तीर्ण झाला होतास, असे विचारणे हे आसपासच्या शहाण्यांचे कर्तव्य ठरते. जी गत विद्यार्थ्यांची तीच आपल्या देशाची. कारगिल, पठाणकोट आणि उरी या आपल्या मार्च महिन्यातल्या परीक्षा आहेत. त्यात आपण सपशेल अपयशी ठरलो आणि नंतर मात्र जोर लावून ऑक्टोबरात यशस्वी झालो. इस्रायलचे असे एकदाही झालेले नाही. याउलट शत्रूस जाग यायच्या आधीच इस्रायलने शत्रुराष्ट्रात घुसून शत्रुराष्ट्राच्या भूमीतच त्यास गारद केल्याची अनेक उदाहरणे आहेत.
यातील सर्वात मोठे उदाहरण म्हणजे १९६७ सालातील सिक्स डे वॉर नावाने ओळखले जाणारे युद्ध. त्याची पाश्र्वभूमी अशी की त्या आधी काही वर्षे इजिप्तचे गमाल अब्दुल नासर यांना आपण अरबांचे सर्वोच्च नेते असल्याचा भास होऊ लागला होता. तत्कालीन सोविएत रशियाच्या मदतीच्या जिवावर फुगू लागलेला नासर यांचा बेडूक बैलाएवढा झाला आणि इस्रायलला ढुशा देऊ लागला. सोबतीस नासर यांनी शेजारील जॉर्डन आणि सीरिया या दोन देशांनाही घेतले आणि इस्रायलचा घास घेण्याचे मनसुबे आखले गेले. त्यावर काही होण्याआधीच इस्रायली विमानांनी ६७ सालातील जून महिन्यातल्या एका पहाटे इजिप्तमध्ये घुसून शत्रुराष्ट्रांची विमाने जागच्या जागी टिपली. या हल्ल्याचा झपाटा इतका होता की इजिप्त, सीरिया आणि जॉर्डन या तीन देशांपैकी एकाच्याही विमानाला उडण्याचीदेखील संधी मिळाली नाही. इस्रायलच्या या माऱ्यात तब्बल ४५० विमाने बसल्याजागीच उद्ध्वस्त झाली. त्यानंतर सात वर्षांनी १९७३ सालच्या योम किप्पुर युद्धात इजिप्तने आधीच्या युद्धात झालेला अपमान दूर करण्याचा प्रयत्न केला. सीरियाच्या साथीने इजिप्तने योम किप्पुर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या यहुदींसाठीच्या पवित्र दिवशी इस्रायलमध्ये फौजा घुसवल्या. सुरुवातीला काही काळ इस्रायल हडबडले. परंतु लवकरच विलक्षण लष्करी चापल्य दाखवत इस्रायलने असा काही प्रतिहल्ला केला की त्यात उलट शत्रुराष्ट्राने आपलाच भूभाग गमावला. म्हणजे या युद्धाआधी इस्रायलचा जो काही भूभाग होता त्यात या युद्धानंतर वाढ झाली. यातले काहीही आपल्याला करता आलेले नाही. इस्रायलच्या या आणि अशा शौर्याचे दाखले कित्येक डझनांनी देता येतील. आपल्याकडे असे किती दाखले आहेत?
इस्रायलच्या शौर्याचे आणखी एक उदाहरण म्हणजे त्या देशाच्या सैनिकांनी हाती घेतलेले ऑपरेशन एंटेबे. ही घटना १९७६ सालातील. तेल अविव येथून पॅरिस येथे जाण्यासाठी निघालेले विमान पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी युगांडातील एंटेबे येथे पळवून नेले. हे साधेसुधे अपहरण नव्हते. कारण अपहरणकर्त्यांचे स्वागत युगांडाचा क्रूरकर्मा सत्ताधीश इदी अमीन याने केले. परिणामी ओलिसांची सुटका करणे अधिकच जोखमीचे झाले. असा प्रयत्न झाल्यास इस्रायली जवानांवर युगांडाचे सैनिक हल्ला करतील अशी धमकी अमीन याने दिली होती. तरीही त्याची कोणतीही पर्वा न करता सात दिवसांच्या अखंड योजकतेनंतर इस्रायलने एंटेबे विमानतळावर घुसून कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी फक्त १०० कमांडोज चार हजार किलोमीटरचे अंतर कापून एका रात्री एंटेबे येथे उतरले आणि आपल्या एकाही नागरिकाचा बळी न देता या जवानांनी अपहरणकर्त्यांना आणि त्यांच्या मदतीला आलेल्या युगांडाच्या जवानांना ठार केले. या प्रचंड गुंतागुंतीच्या, धाडसी कारवाईत इस्रायलने फक्त एक कमांडो गमावला. लेफ्टनंट कर्नल योनातन नेतान्याहू हे त्याचे नाव. इस्रायलचे विद्यमान पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांचे ते ज्येष्ठ बंधू. याउलट आपल्याला सामोरे जावे लागलेल्या एकमेव विमान अपहरण प्रकरणात आपले परराष्ट्रमंत्री अपहरणकर्त्यांच्या मागणीपुढे शरणागत होत काश्मिरातील बंदीवान दहशतवाद्याची मुक्तता करण्यासाठी जातीने हात बांधून सादर झाले. त्यासाठी ते अफगाणिस्तानातील कंदाहार येथे स्वत: गेले. तत्कालीन परराष्ट्रमंत्री जसवंत सिंग यांनी त्या वेळी मुक्त केलेला दहशतवादी म्हणजे आजचा मौलाना मसूद अझर. भारत सरकारच्या औदार्यानंतर त्याच वर्षी त्याने जैश ए महंमद या दहशतवादी संघटनेची स्थापना केली आणि आज आपण त्याच्याच नावाने शंख करीत असतो. इस्रायलने हा असला उद्योग केल्याचे किती दाखले सापडतील?
इतके शौर्य आणि विजिगीषु वृत्ती असूनही लक्षात घेण्याची बाब म्हणजे इतक्या युद्धखोरीनंतरही इस्रायलला पॅलेस्टिनचा प्रश्न इतक्या वर्षांनंतरही मिटवता आलेला नाही. तेव्हा इस्रायल अािण भारत या देशांच्या वास्तवात इतकी महाप्रचंड दरी असूनही आपली बरोबरी इस्रायलशी करण्याचे औद्धत्य कोणी दाखवत असेल तर वास्तवाच्या जवळ जाणारी, किमान बुद्धिमानांनाही समजेल अशी एकच प्रतिक्रिया उमटेल : काहीही हं श्रीयुत.
First Published on October 20, 2016 3:27 am
Web Title: india modi compares military surgical strike capabilities to israel

शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०१६

या आधी 1975 साली जेंव्हा इंदिरा हटाव मोहीम जोरात सुरु होती तेंव्हा विरोधकांना लोकनायकांच्या स्वरूपात दूसरे गांधी सापडले.

मात्र लोकनायकांनी "पोलीस व लष्कराच्या जवानांनी त्यांना त्यांच्या वरिष्ठlचे आदेश योग्य वाटतं नसल्यास ते पाळू नये असे आवाहन केले आणि ते दुसरा गांधी होण्याच्या शर्यतीतून बाहेर फेकल्या गेले.
खरच त्यांचा सल्ला पोलीस व लष्कराने मानला असता तर देशांत अराजक माजले असते.
स्वातंत्र्य आंदोलनाचे वेळी बहुसंख्य पोलीस कर्मचारी व लष्करी जवान भारतीय होते. तरीही गांधीजींनी कधीही असे आवाहन केले नाही. कारण गांधीजीना हे माहिती होते की देश स्वतंत्र झाल्यावर हेच पोलीस देशाची कायदा व सुव्यवस्था सांभाळणार आहेत व हेच लष्करी जवान देशाचे रक्षण करणार आहेत.

स्वतंत्र भारताला शिस्तबद्ध पोलीस दल व संरक्षण दलाची गरज पडेल ही दूरद्रुष्टी त्यांच्याजवळ होती.

1978 साली लोकनायकांना पुढे करून विरोधकांनाम सत्ता मिळाली खरी पण ती अट्ठावीस महिनेच टिकली.

त्यानंतर यूपीए-2 च्या कार्यकालात विरोधकांना परत दुसरा गांधी म्हणून अण्णांना समोर केले. आपली माणसे त्यांच्या भोवती पेरली व काम फत्ते झाल्यावर यथासमयी भाजपच्या छावणीत दाखल झाली.
सर्वसामान्य माणसाबद्दल कळवळ आणि पंधरावीस दिवस उपोषण करण्याची क्षमता याशिवाय अण्णांजवळ दूसरे भांडवल नव्हते.
1978 प्रमाणेच यावेळेस अण्णांना पुढे करून विरोधक 2014 मध्ये पुन्हा सत्ता मिळवण्यात यशस्वी झाले. तेँव्हाची सत्ता अट्ठावीस महीने टिकली. यावेळेस कदाचित दुप्पट काळ म्हणजे छप्पन महीने टिकेल असे वाटते (कारण त्यांनी जाहीर केले आहे की त्यांची छाती छप्पन इंचाची आहे, म्हणून एक अंदाज बांधला.
म्हणूनच मी अपेक्षा व्यक्त केली होती की दुसरा गांधी होणारच नाही काय?
बार्टीच्या जाहिराती पुन्हा सुरु,
काय आहे बार्टी,
बार्टी म्हणजे BARTI ,
डॉ बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिटयूट.
या बार्टीने मागासवर्गीयांसाठी असलेला सरकारी निधीतून वर्तमानपत्रांना मोठमोठया  जाहिरातीचा रतीब घालणे सुरु केले होते व या जाहिराती अगदी एकदिवसाआड किंवा कधीकधी दररोज सर्वच प्रमुख वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध होत होत्या.
त्याबद्दल मी फेसबुकवर लिहिताच  शासनाणे संस्थेच्या या 'प्रेस कनेक्शन' ची चौकशी सुरु केली होती व त्यामुळे हे जाहिरात प्रकरण काही दिवस बंद होते.
मात्र गेल्या काही दिवसांपासून पुन्हा नियमितपणे जाहिराती जाहिराती येणे सुरु झाले आहे.
हि संस्था मागासवर्गीय युवकांच्या कल्याणासाठी आहे की वर्तमानपत्रे पोसण्यासाठी?

बुधवार, १२ ऑक्टोबर, २०१६

भारताने बलुच आंदोलनाच्या नादी लागू नये.

मोदींनी आवेशात येऊन पाकिस्तानला बलोच आंदोलनावरून डीवचले. मात्र आपण हे विसरता कामा नये की, भारतातसुद्धा निरनिराळया प्रांतांत फुटीरतावादी आंदोलने नेहमी सुरु असतात. पजांबमध्ये दहा वर्षे आपण अराजकतेचा कालखंड पाहिलेला आहे. अनेक निरपराध जीवांचा त्यात बळी गेलेला आहे. या आंदोलनाला पाकिस्तानची फूस व मदत होती. पंजाब प्रांत पाकिस्तानच्या सीमेलगत आहे. पाकिस्तानातील 44 % लोकं पंजाबी भाषा बोलतात.अजूनही खलिस्तानच्या (स्वतंत्र पंजाब) मागणीला समर्थन असणाऱ्यांची संख्या कमी नाही. खलिस्तान आंदोलनांचा ऑपेरेशन ब्ल्यु स्टार मोहिमेद्वारे बिमोड करणाऱ्यl इंदिराजी व तत्कालीन लष्कर प्रमुख जनरल अरुण वैद्य यांचा खलिस्तानवादी अतिरेक्यांनी खून केला. त्या मारेकरयांच्या नातेवाईकांचl दरवर्षी सत्कार केल्या जातो.उद्या जर पाकिस्तानने या आंदोलनाला पुन्हा बळ द्यायचे ठरविले आणि खलिस्तानवाद्यांना मदत पोहोचवून त्यांना स्वतंत्र पंजाब निर्माण करण्याचे स्वप्न दाखविले. तर ती भारतासाठी मोठी डोकेदुखी ठरेल.तिकडे ईशान्य भारतही अशांत आहे आणि अरुणाचल व अन्य भूभागावर चीन टपून आहे. अरुणाचलमधील नागरिकांना स्टेपल व्हिसा देण्याचा आगाउपणा चीन करत असतो. भारत-पाक वादात आपण पाकच्या बाजूने उभे राहू असे चीनने जाहीर केले आहे. ईशान्य भारतातील जनता स्वतःला भारतीय समजण्यास तयार नाही.अशा परिस्थीतीत भारताने बलुच आंदोलनास बळ द्यायची चूक केल्यास एकीकडे पाकिस्तान व दुसरीकडून चीन भारताला पोखरण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. समोरासमोरील युद्धापेक्षा असे छुपे युद्ध भारताची जास्त दमछाक करू शकते. शिवाय फुटीरतावादयांचे मनोरथ पूर्ण होण्याची शक्यताही नाकारता येतं नाही. तेंव्हा भारताने बलुच आंदोलनापासून दूर रहावे हे उत्तम.
ब्रिटनमध्ये वास्तव्यासाठी इंग्रजी भाषेची चाचणी आवश्यक



दीर्घकाळ वास्तव्यासाठी ब्रिटनमध्ये राहणाऱ्या स्थलांतरितांना इंग्रजी भाषेची चाचणी देणे सक्तीचे करण्यात आले असून, नव्या अटीमुळे त्या देशात राहणाऱ्या अनेक स्त्र‌ियांना हद्दपार व्हावे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी सोमवारी हे स्पष्ट केले. या निर्णयाचा सर्वाधिक मोठा फटका ब्रिटनमधील इंग्रजी न येणाऱ्या हजारो मुस्लिम महिलांना बसणार आहे.

ब्रिटनमध्ये वास्तव्यासाठी आलेल्या स्थलांतरितांच्या पत्नीला डिपेन्डंट व्हिसावर त्या देशात येते. मात्र, येथून पुढे पत्नी किमान अडीच वर्षे ‌ब्रिटनमध्ये वास्तव्यास असेल, तर तिला इंग्रजी भाषेची चाचणी अनिवार्य असेल आणि संबंधित पत्नी या चाचणीत नापास झाली, तर पुढील काळात तिला ब्रिटनमध्ये वास्तव्याचा अधिकार राहाणार नाही. तिची रवानगी तिच्या मूळ देशात करण्यात येईल, अशी माहिती कॅमेरॉन यांनी दिली. 'ब्रिटनमध्ये आल्यानंतर अपत्यप्राप्ती झालेल्या पालकांपैकी एकाचे वास्तव्य ब्रिटनमध्ये निश्चित झाला असेल, तर संबंधित अपत्याला आणि एका पालकाला ब्रिटनचे नागरिकत्व मिळेल; परंतु दुसरा पालक, 'जोडीदार अधिवास कार्यक्रमां'तर्गत ब्रिटनमध्ये आला असेल, त्याला इंग्रजी भाषेची चाचणी अनिवार्य आहे. अन्यथा त्याला मायदेशी परतावे लागेल.

'जोडीदार अधिवास कार्यक्रमां'तर्गत असलेले नियम अधिक कडक करण्यात येत असून, अडीच वर्षांच्या काळात इंग्रजी भाषेतील सुधारणा पुन्हा तपासण्यात येणार आहे. इंग्रजी भाषेत सुधारणा झाली नाही, तर ब्रिटनमधील वास्तव्य यापुढे निश्चित राहणार नाही. हा नियम कडक असला, तरी या देशामध्ये राहायला येणाऱ्यांवरही तेवढी जबाबदारी राहील.' 'जोडीदार अधिवास व्हिसा'च्या नियमावलीमध्येदेखील आता इंग्रजी भाषेची चाचणी लागू करण्यात आली आहे. ब्रिटनमध्ये जन्माला आलेल्या मुलांनाही इतर देशांत राहता येणार नाही. त्यामुळे काही प्रकरणांत मायदेशी रवाना होणाऱ्या एका पालकासोबत मुलांना त्या देशात नेता येणार नाही.

मुस्लिम महिलांवर गंडांतर?

ब्रिटनच्या सरकारने दावा केला आहे, की १ लाख ९० हजार मुस्लिम महिलांना नीट इंग्रजी येत नाही. त्यातील ३८ हजार महिलांना इंग्रजी अजिबात येत नाही. कॅमेरॉन म्हणाले, 'इंग्रजी भाषा शिकली नाही, तर अनेक संधी कमी होतात. आमच्या देशामध्ये येणाऱ्या लोकांना इंग्रजी येणे आवश्यक आहे.' ही योजना ऑक्टोबरपासून लागू करण्यात येणार आहे. यामुळे ब्रिटनमधील स्थलांतरितांचे जीवन विस्कळित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Maharashtra Times)