शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०१५

आज ३१ ऑक्टोबर. ……


१) आज ३१ ऑक्टोबर.लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती.त्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सुमारे ५५० संस्थाने खालसा करून त्यांना भारतात सामील करून घेतले.१) आज ३१ ऑक्टोबर.पोलादी महिला इंदिरा गांधी यांची आज पुण्यतिथी.त्यांनी या संस्थानिकाचे तनखे व विशेषाधिकार प्रीव्ही पर्सेस (privilege purses) रद्द केले व त्यांना सामान्य नागरिकांच्या बरोबरीत आणून ठेवले.

गये थे नमाज पढने, रोजे गले पड गये. ………

'घर वापसी' मोहीम सुरु केली होती,
पण त्यापेक्षाही जास्त जोरात 'पुरस्कार वापसी' मोहीम सुरु आहे.
साहित्यिक, चित्रपट निर्माते आणि आता शास्त्रज्ञसुद्धा पुरस्कार परत करत आहेत.
एका पुरस्कार विजेत्याने तर पुरस्काराच्या रकमेत आपल्या जवळील रकमेची भर घालून ती रक्कम परत केली.
काश मेरे पासभी कोई पुरस्कार होता !

रविवार, २५ ऑक्टोबर, २०१५

भारतात दूरदर्शन केंव्हा सुरु झाले ?
२०१४ मध्ये ?
मोदी सत्तेवर आल्यानंतर ?
तुमचे उत्तर चुकले आहे.
१५ सप्टेंबर १९५९ म्हणजे आजपासून ५६ वर्षांपूर्वी भारतात दूरदर्शन आले.
यातील ५६ या आकड्याचा कुणाच्या छातीच्या मापाशी  संबंध नाही हे कृपया लक्षात घ्यावे.
दिल्लीनंतर दुसरे केंद्र मुंबईला १९७२ साली सुरु झाले.
हो, तुम्हाला असे म्हणता येईल की,
"बिचकी बारा सालोमें कुछ नही हुआ"
गांधी होण्याला खूप कष्ट पडतात; मात्र एक पिस्तुल हातात आले की, नथुराम होता येते. असे खूप नथुराम तयार झाले, की ते धर्माचं राज्य आणण्यासाठी प्रयत्न करतात.

अफगाणिस्तानात ते प्रयत्न यशस्वी होऊन पिढ्याच्या पिढ्या नाही, तर देश बरबाद झाला. भारतात ती प्रक्रिया काही विशिष्ट विचारधारांनी सुरू केली आहे.

भारतीय समाज निष्क्रिय असल्यानं अजूनपर्यंत त्या विरोधात फारसा आवाज उठताना दिसत नाही. समाज आवाज उठवेल, तेव्हा कदाचित वेळ निघून गेलेली असेल.

आज इस्लामी दहशतवादाला उत्तर या नावानं उभ्या राहिलेल्या हिंदुत्ववादी दहशतवाद्यांकडे कानाडोळा करणं समाजाला महागात पडेल.

बंदुका रोखायला एकदा परवानगी दिली की, बंदुकीचे तोंड कोणाकडे असावे, हे ज्याच्या हातात बंदूक असेल तो ठरवेल.

इस्लामी जगाची स्वप्ने पाहात अफगाणी जनतेने तालिबानला पसरू दिले आणि क्रमाने नंतर तालिबान्यांनी बंदुका अफगाणिस्तानातील इस्लामी जनतेवरच रोखल्या. बायकांना बुरखे सक्तीचे केले, बुद्ध मूर्ती फोडल्या. समाज जागा झाला, तोपर्यंत तालिबानी हे देशाचे सत्ताधीश झाले होते. यापासून आपण बोध घ्यायला हवा.

कोणत्याही धर्माचा असो, धार्मिक उन्माद चालवून घेता कामा नये. धर्म आपापल्या घरी किंवा मंदिर, मशीद, चर्चमध्ये; रस्त्यावर फक्त आणि फक्त राज्यघटनेचं राज्य असेल, हे सर्वच धर्मांना ठणकावून सांगायची वेळ आलेली आहे.

नुकताच न्यायालयानं मशिदीवरील भोंग्यांना ध्वनिप्रदूषण कायदा लागू होतो, हे ठणकावून सांगितलं, न्यायालयाचं त्यासाठी अभिनंदन केलं पाहिजे.

धार्मिक गुन्हेगार मुस्लिम असोत की हिंदू, आमच्या धर्माच्या भावना दुखावल्या गेल्या, हे कारण ते पुढे करतात. जणू काही संपूर्ण समाजाने भावनाविषयक आपले सर्व अधिकार बहाल केले असून समाजाचे धार्मिक नेतृत्व यांना देऊनच टाकले आहे!

सिमी, एमआयएम यांच्यासारख्या संघटनांना मुस्लिम समाजातील मूठभरांचा पाठिंबा असतो (अन्यथा मुस्लिम लीग खूप मोठा पक्ष झाल्याचे दिसले असते!) आणि बजरंग दल, श्रीराम सेना यांनाही मूठभर हिंदूंचाच पाठिंबा असतो, पण दोन्हीकडचे मूठभर दोन्हीकडच्या संपूर्ण समाजाचा कब्जा करून आपले तथाकथित धार्मिक व्यवहार संपूर्ण समाजावर लादू पाहतात.

यांच्यासाठी देशापेक्षा धर्म मोठा असतो आणि हिंसा हा धार्मिक दहशतीचा मार्ग असतो. दोन्ही धर्मातील लोकांच्या दैनंदिन प्रश्नावर मात्र यांच्या भावना दुखावत नाहीत.

शेतकरी आत्महत्या करतात आणि त्यातील ऐंशी टक्के शेतकरी हे हिंदू असतात; तेव्हा त्यांच्या आत्महत्यां मुळे यांच्या भावना दुखावल्याचे कधी ऐकिवात नाही.

भारतातील महिला पाण्यासाठी सरासरी अडीच किलोमीटर चालते, आणि त्यात ऐंशी टक्के हिंदू स्त्रियादेखील ही पायपीट करतात, यावर कधी त्यांच्या भावना दुखावत नाहीत.

देशात आज ‘सेक्युलर’ हा शब्द शिवीसारखा वापरणे हा एका ‘सांस्कृतिक संघटनेचा’ रोजचा अजेंडा झालेला आहे.

मात्र वास्तव हे आहे की, हिंदूंमधील निम्मी लोकसंख्या असलेल्या स्त्रियांना जेव्हा सती म्हणून सक्तीने जाळले जात होते, तेव्हा सतीची चाल बंद करण्यासाठी राजा राममोहन रॉय यांच्यासारखा सेक्युलर माणूसच जन्मावा लागला!

हिंदूहित रक्षक म्हणून त्या वेळी अस्तित्वात असलेल्या कोणत्याही तथाकथित सांस्कृतिक संघटनेनं बायकांना सती जाण्यापासून परावृत्त केलं नाही, उलट धर्माचार म्हणून सती जायला प्रोत्साहित केलं!

जगभरातील धर्मवादी संघटनांनी धर्माला विकृत करून लोकांच्या मनात धर्माची भीतिदायक प्रतिमा उभी केलेली आहे. मध्ययुगात माध्यमं नव्हती, शिक्षण नव्हते म्हणून हे चालून गेले. आताच्या युगात शास्त्रीय माहिती सहज उपलब्ध असल्यानं लोक चिकित्सा करतात आणि मग मुळात धर्मालाच नाकारतात!

भारताच्या जनगणनेच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीत तब्बल २९ लाख लोकांनी आपला धर्म ‘निधर्मी’ असल्याची नोंद केली. ही सुरुवात आहे. यापुढे धार्मिक उन्माद वाढवणाऱ्या सर्व शक्तींविरोधात लोकांमध्ये जावे लागेल, आणि लोकांना काय चालले आहे, यावर जागे करावे लागेल.

हा लढा सुरुवातीला या धर्मातील कट्टर विरुद्ध त्या धर्मातील कट्टर, असा असल्याचे भासत असले तरी अंतत: हा लढा सर्व धर्मातील कट्टर विरुद्ध निष्पाप सामान्य जनता असाच असतो.

धार्मिक उन्मादाला नेस्तनाबूत करण्याची ताकद लोकशक्तीमध्येच आहे. त्या शक्तीला सर्व थरातून जागं करण्याची वेळ आता आलेली आहे
 नऊ दिवस चप्पल न घातल्याने जर मनोकामना पूर्ण झाल्या असत्या तर वर्षभर अनवाणी शेतात काम करणारा शेतकरी आणि शेतमजूर सगळ्यात आनंदी असते ....वास्तव मात्र वेगळे आहे.
       #कडवे सत्य. #

सोमवार, १२ ऑक्टोबर, २०१५

"How Much Land Does a Man Need?"

शर्यत जिंकावी म्हणून घोड्याला उर फुटेपर्यंत दौडविण्यात आले व त्यात शर्यत जिंकण्याच्या बेतात असतांना घोड्याचा कोसळून मृत्यू झाला. workaholic व्यक्तींच्या मागेही चाबूक घेऊन कुणीतरी दृश्य/अदृश् घोडेस्वार उभा असतो किंवा मग भौतिक संपदा जमविण्याच्या नादात आपण किती धावलो हे कधी कधी समजतही नाही. सुप्रसिद्ध रशियन लेखक Leo Tolstoy यांची  "How Much Land Does a Man Need?" ही कथा याच विषयावर बेतलेली आहे.
घोड्याला कधीच शर्यत जिंकायची नसते. शर्यत घोडेस्वाराला (Jokey) जिंकायची असते. काही पालक मात्र स्वतः  जॉकीच्या भूमिकेत शिरतात. आणि घोड्याला उर फुटेपर्यंत दौडवितात. तरीही याला आम्ही Horse Race न म्हणता Rat Race का म्हणतो हे मला पडलेले कोडे आहे.

माणसाला एक न्याय तर प्राण्याला वेगळा न्याय. 


शर्यतीच्या घोड्याला उर फुटेपर्यंत दौडविण्यात आले. शर्यत जिंकण्याच्या बेतात असतांना घोडा कोसळला. घोडा व घोडेस्वार (Jokey) दोघेही जखमी. घोडेस्वाराला इस्पितळात पोहोचविण्यात आले तर " घोड्याला आत्यंतिक वेदना होत होत्या व या नंतर तो कुचकामाचा ठरेल " असे कारण देऊन घोड्याचे जीवन संपविण्यात आले. माणसाला एक न्याय तर प्राण्याला वेगळा न्याय.

शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०१५

Rome was not built in a day. ......
And India too.
नुकतेच दोन युध्दनौका तटरक्षक दलात सामील करण्यात आल्या. अर्थात या दोन युद्धनौका बांधण्याची योजना तयार करून व त्याची अंमलबजावणी करणे हे सर्व काम अठरा महिन्यात होणे शक्य नव्हते. म्हणजे हे सर्व काम आधीच्या सरकारचे आहे. मग कोण म्हणतो ६६ (की ६०) वर्षांत काहीच झाले नाही म्हणून.
सौजन्याची ऐशी तैशी ! नितीशकुमार उर्मट आहेत-पीएम. ……
अलेक्झांडरने राजा पुरूचा पराभव केल्यानंतर पुरूला विचारले होते, मी तुझ्याशी कसे वागावे. त्यावर पुरूने उत्तर दिले होते. "मी एक राजा आहे. तू ही एक राजा आहेस. एका राजाने दुसऱ्या राजाशी जसे वागले पाहिजे तसे तू माझ्याशी वागले पाहिजे". त्याचे हे उत्तर ऐकून अलेक्झांडरने पुरूला त्याचे राज्य परत केले. एव्हढेच नव्हे तर पुरुशी द्रोह करून अलेक्झांडरला मदत करणाऱ्या त्याच्या नातेवाईकाचेही राज्य जप्त करून पुरूला दिले. आता मात्र एक राजा (पीएम) दुसऱ्या राज्याला (सीएम) उर्मट म्हणतोय. अच्छे दिन आगये हैं 

तुम्ही सिंहाचे छावे आहात.

एकेकाळी मराठ्यांचे संपूर्ण हिंदुस्थानावर वर्चस्व होते.
अटकेपार मराठे पोहोचले होते हा इतिहास सर्वांनाच माहित आहे.
अटक हे शहर सध्या पाकिस्तानात आहे.
शिवाजीमहाराजांच्या काळात तामिळनाडूमध्ये तंजावर व जिंजी येथे मराठ्यांचे राज्य होते.
आजही तंजावर येथे भोंसले आडनावाची माणसे राहतात. (पण त्यांना मराठी समाजात नाही.)
दिल्ली काबीज करून मराठ्यांनी तेथील बादशहाच्या संरक्षणाची हमी घेतली. तसा उल्लेख शाहीर साबळे यांनी गायलेल्या  "गर्जा महाराष्ट्र माझा" या गीतात "दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा " या ओळीत केल्या गेला आहे. उत्तर व मध्य भारतातील अनेक संस्थानिक मराठ्यांना खंडणी देत होते. (कृपया आजकाल जी खंडणी उकळल्या जाते त्याच्याशी या खंडणीचा संबंध जोडू नये. विनाकारण युद्धात ओढल्या गेलो तर पराभूताकडून युद्धाचा खर्च वसूल करणे याला त्याकाळात खंडणी असे म्हणत  असत). अनेक मराठी सरदारांनी महाराष्ट्राबाहेर आपली राज्ये स्थापन केली होती. उदा. ग्वाल्हेर (शिंदे), गायकवाड (बडोदे), होळकर (इंदूर) वगैरे. बंगाल आणि ओरिसा येथेही मराठे पोहोचले होते.
सुरुवातीच्या काळात इंग्रजांनी कलकत्ता येथे बस्तान बसविले होते. मराठ्यांच्या आक्रमणापासून संरक्षण व्हावे म्हणून तेंव्हाच्या शहराभोवती (की गावाभोवती ) एक खंदक खोदला होता. त्याला मराठा खंदक असे म्हणत व आजही तो भाग मराठा खंदक एरिया या नावाने ओळखला जातो. (संदर्भ- प्रा. सदानंद मोरे यांचा लेख). बंगाल/ओरिसामध्ये तर मराठ्यांची एव्हढी दहशत होती की, शोले चित्रपटात जसा गब्बर स्वत:चा उल्लेख करतो त्याप्रमाणे त्याप्रमाणे आया आपल्या रडणाऱ्या मुलाने झोपी जावे म्हणून अंगाई गीत म्हणायच्या, " बाळा आता झोप नाहीतर मराठे येतील." (प्रा. सदानंद मोरे), आणि तश्या अर्थाचे एक अंगाई गीतही मला सापडले ते मी स्वतंत्रपणे व्हाटसअप वर देत आहे. ते अंगाईगीत आजही म्हटले जाते (अर्थात ग्रामीण भागात). तुमचे कोणी उडिया/बंगाली भाषिक मित्र असतील तर तुम्ही त्या गाण्याचा अर्थ जाणून घेऊ शकता.
अर्थात एव्हढे सगळे असुनही मराठे वर्चस्ववादी होते असे म्हणता येणार नाही. कारण परप्रांतातच काय दिल्लीची सत्ता मिळूनही स्वत: सत्ताधीश न होता खऱ्या उत्तराधिकारयाच्या हातात सत्ता सोपवून मराठे महाराष्ट्रात परतले.बाजीराव पेशवेसुद्धा बुंदेलखंडच्या छत्रसाल राजाला मदत करून व त्याची बक्षिशी म्हणून मिळालेल्या मस्तानीला घेऊन पुण्यात परतले. मस्तानी ही  छत्रसाल राज्याची (मानस) कन्या होती असे सांगतात. परंतु घरजावई होण्याचा विचारही बाजीरावांच्या मनात आला नाही.
म्हणूनच की काय आज सुद्धा दिल्लीत केंद्रीय मंत्रीमंडळात मनासारखे पॉवरफुल खाते मिळाले तरी मराठी मंत्र्याचे त्यात मन  लागत नाही व 'गड्या आपुला गाव बरा' या उक्ती प्रमाणे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची खुर्ची त्यांना सतत साद घालत असते. इंग्रजांनी संपूर्ण हिंदुस्थान काबीज केला पण फक्त मराठेच त्यांना शेवट पर्यंत पुरले. नारायणरावाचा खून करून पराक्रमी रघुनाथराव पेशवे इंग्राजांना जाउन मिळाले नसते तर हिंदुस्थानचा इतिहास कदाचित वेगळाच असता. त्यानन्तरही नारायणरावाच्या विधवा पत्नीच्या गर्भात असलेल्या भृणाला  पेशवेपदाचा टिळा लावून बारा मुत्सद्द्यांनी (बारभाईचा कारभार) राज्य सांभाळले. आणि नंतर गांधीजींनी सांगितलेल्या विश्वस्तपणाची (Trusty Ship) संकल्पना  महाराष्ट्रात दीडशे वर्षे आधीच राबविली. या बारा मुत्सद्द्यांमध्ये साडे तीन शहाणे होते. त्यात नाना फडणवीस अर्धे शहाणे म्हणून ओळखल्या जात होते. होते. (आताचे 'फडणवीस' किती शहाणे आहेत ते माहित नाही)
आणि हो ताजा इतिहास म्हणजे १९६२ च्या चीनी आक्रमणानंतर देशाच्या संरक्षणाची धुरा सक्षम व्यक्तीकडे द्यावी या विचाराने पंडित नेहरूंनी महाराष्ट्राचे तेंव्हाचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना संरक्षण मंत्रीपदावर नेमले. या घटनेचा उल्लेख तेंव्हा सर्वच पत्रकारांनी " हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला " असा केला होता. त्याहून ताजा इतिहास म्हणजे १९८२ साली झालेल्या एशियन गेम्स साठी खेळाडूंना ने आण करण्यासाठी बसेस बांधण्याचे काम आपल्या MSRTC ला म्हणजे ST ला देण्यात आले. त्याच त्या एशियाड बसेस.
पुण्याचेच स्वातंत्र्यसेनानी सेनापती बापट यांच्या काव्यपंक्ती प्रसिद्ध आहेत त्या अशा
" महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले,
महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले.
तेंव्हा असा गौरवशाली इतिहास असलेल्यांच्या वंशजांनो समाजात, देशात, जगात वावरतांना ताठ मानेने जगा. मराठी माणूस/मराठी भाषा डाऊन असे कुणी म्हणत असेल तर त्याचा समाचार घेतल्याशिवाय पुढे जाऊ नका. 

सोमवार, ५ ऑक्टोबर, २०१५

आत्मसन्मानाचा लढा


दक्षिण आफ्रिकेमध्ये वर्णद्वेषाविरुद्ध गांधीजींनी दिलेला लढा ही हिंदुस्थानातील पुढील महासंग्रामाची नांदीच ठरली. अहिंसा, सत्याग्रह ही स्वातंत्र्यप्राप्तीची शस्त्रे गांधीजींना मिळाली ती या लढय़ातूनच.
दीडशे वर्षांपूर्वी (१६ नोव्हें.१८६०) टुरो (TURO) ही बोट भारतीय मुदतबंद मजुरांची पहिली तुकडी घेऊन नाताळ येथे दक्षिण आफ्रिकेच्या किनाऱ्याला लागली व दक्षिण आफ्रिकेच्या इतिहासातील एक संघर्षमय अध्यायास सुरुवात झाली. ही घटना घडली तेव्हा कालांतराने या भारतीयांचे नेतृत्व करणाऱ्या नायकाचा जन्मही झालेला नव्हता. या पहिल्या तुकडीनंतर मुदतबंद मजुरांचे जथेच्या जथे दक्षिण आफ्रिकेमध्ये गेले. तसेच गुजरात, राजस्थानमधून काही व्यापारी कुटुंबेही दक्षिण आफ्रिका येथे स्थलांतरित झाली. अशा तऱ्हेने भारतीयांची संख्या लक्षणीयरीत्या वाढू लागली, त्यामुळेच तेथे गेलेल्या भारतीयांना अनेक अन्याय्य कायद्यांचा सामना करावा लागला.
खरे तर भारतीयांचे दक्षिण आफ्रिकेमधील पदार्पण हे ब्रिटिश मळेवाल्यांच्या गरजेतूनच झाले होते. ब्रिटिश मळेवाल्यांना दक्षिण आफ्रिकेमधील सुपीक परंतु पडीक अशा जमिनीचा ऊस, चहा, रबर यांच्या लागवडीसाठी उपयोग करावयाचा होता. ती अफाट भूमी त्यांना मोहवीत होती. परंतु दक्षिण आफ्रिकेमधील मूळचे निग्रो लोक मजुराची कामे करण्यास उत्सुक नव्हते. त्यामुळे युरोपियन मळेवाल्यांचे, खाणमालकांचे लक्ष हिंदुस्थानकडे वळले. त्यांनी विचार केला की स्वस्त, आज्ञाधारक मजुरांचा नियमित पुरवठा फक्त हिंदुस्थानातूनच होऊ शकतो. मळेवाल्यांनी आपले भाईबंद असलेल्या तत्कालीन ब्रिटिश सरकारबरोबर वाटाघाटी केल्या व त्यांच्या सुपीक डोक्यातून साकारलेली योजना प्रत्यक्षात उतरली. आता मुदतबंद मजुरांची दक्षिण आफ्रिकेमध्ये जाण्यासाठी रीघ लागली. त्यांच्यापाठोपाठ व्यापारीही जाऊ लागले. परिणामस्वरूप हिंदुस्थानी मजूर, व्यापारी व त्यांचे नोकर यांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होऊ लागली. मूलत: हिंदुस्थानी मजूर पाच वर्षांच्या करारावर दक्षिण आफ्रिकेमध्ये गेले होते. करार संपल्यानंतर भारतात परतण्याचे बंधन त्यांच्यावर नव्हते. त्यामुळे पुष्कळशा मजुरांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये स्थायिक होणे पसंत केले, तसेच छोटे व्यापारीही ट्रान्सवाल, ऑरेंज स्टेट, केप कॉलनी येथे पसरले. हे लोक भारतीयांशिवाय निग्रो आणि बोअर यांच्याबरोबरही व्यापार करू लागले. परिणामत: त्यांची सांपत्तिक स्थिती सुधारू लागली. युरोपीय मळेवाले व व्यापारी यांच्यात असूया निर्माण झाली. हिंदुस्थानी लोक त्यांच्याबरोबर स्पर्धा करत आहेत असे त्यांना वाटले. भारतीयांना असलेले मर्यादित स्वातंत्र्य त्यांना खुपू लागले. भारतीयांवर बंधने लादण्याचे प्रयत्न सुरू झाले. भारतीयांवर कॅपिटेशन टॅक्स लावण्याच्या मागणीने जोर धरला. आपल्या मताप्रमाणे राज्यकारभार होण्यासाठी, नाताळमध्ये स्वायत्त सरकार आणण्यातही ब्रिटिश मळेवाले यशस्वी झाले. मजूर व त्यांचे कुटुंबीय यांच्यावर माणशी तीन पौंड कर बसवण्यात आला. प्रत्येक मजुराला सरासरी १२ पौंड भरावे लागणार होते. मजुरांचे उत्पन्न पाहता हा कर खूपच जास्त होता. व्यापाऱ्यांवरही र्निबध लादण्यात आले. परवाना व शैक्षणिक परीक्षा पद्धत चालू केली.
नाताळप्रमाणेच ऑरेंज फ्री स्टेट आणि ट्रान्सवाल येथेही भारतीयांबद्दल असंतोष होता. १८८५ साली ट्रान्सवाल सरकारने अत्यंत जुलमी कायदा संमत केला. त्या कायद्यान्वये व्यापारासाठी राहणाऱ्या प्रत्येक भारतीयाने २५ पौंड भरून आपल्या नावाची नोंदणी करणे आवश्यक होते. तसेच भारतीयांना मालमत्ता करण्याचा अधिकार नव्हता व त्यांना ट्रान्सवालचे नागरिकत्वही मिळणार नव्हते. सरतेशेवटी ब्रिटिश पार्लमेंटकडून दबाव आणल्यामुळे रजिस्ट्रेशन फी तीन पौंड करण्यात आली आणि काही राखीव विभागात मालमत्ता करण्याचा अधिकार मिळाला. ऑरेंज स्टेटमध्येही अशीच परिस्थिती होती. नाममात्र नुकसानभरपाई देऊन भारतीय व्यापाऱ्यांना हाकलण्यात येत होते. विशेष परवाना घेऊन फक्त मजूर किंवा हॉटेल वेटर म्हणून काम करता येत असे. केप कॉलनीमध्येही साधारण हीच तऱ्हा होती. भारतीय मुले सरकारी शाळांत जाऊ शकत नव्हती किंवा त्यांना हॉस्टेलमध्ये जागा मिळत नव्हती. तरीही तेथे वर्णद्वेषाचे प्रमाण काहीसे सौम्य होते.
दक्षिण आफ्रिकेमधील भारतीयांमध्ये उत्तर प्रदेश, मद्रास व गुजरातमधील लोक जास्त होते. काही सिंधी व्यापारीही होते तर हाताच्या बोटांवर मोजण्याइतके पारसी होते. सुशिक्षित भारतीयांचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे भारतीयांची व्यथा प्रभावीपणे मांडू शकणारे कोणीच नव्हते. अशा नैराश्याच्या वातावरणातच गांधीजींचे दक्षिण आफ्रिकेमध्ये आगमन झाले. मुंबई व राजकोट येथे वकिली केल्यानंतर त्यांना दादा अब्दुल्ला आणि कंपनीकडून दक्षिण आफ्रिकेमध्ये येण्याचे निमंत्रण मिळाले. मे १८९३ मध्ये गांधीजी दरबानला पोहोचले. तेव्हा भारतीयांची अत्यंत दयनीय अवस्था होती. ‘सेमी बार्बर्स आशियाटिक्स ऑर पर्सन्स बिलॉन्गिंग टू अनसिव्हिलाईज्ड रेसेस ऑफ आशिया’ असे त्यांचे अधिकृत वर्णन होते. भारतीयांना गुलाम व हमालच समजले जाई. भारतीयांमध्ये सर्व धर्मीयांचा समावेश होता. व त्या सर्वाचा ‘कुली’ असा उल्लेख होत असे. व्यापाऱ्यांना कुली र्मचट म्हणत तर गांधीजी कुली बॅरिस्टर झाले.
दक्षिण आफ्रिकेत गेल्या गेल्याच गांधीजींना वर्णद्वेषाचा फटका बसला. दरबान ते प्रिटोरियाच्या प्रवासातच त्यांना फर्स्ट क्लासच्या डब्यातून हाकलून देण्याची ती कुप्रसिद्ध घटना घडली. गांधीजींनी संपूर्ण रात्र मॅरिट्झबर्ग स्टेशनच्या फलाटावर काढली. भारतात परतण्याचा विचारही त्यांच्या मनात डोकावून गेला. परंतु सरतेशेवटी त्यांनी धैर्याने परिस्थितीचा सामना करण्याचे ठरवले. ही घटना त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. गांधीजी म्हणतात ‘‘माय अ‍ॅक्टिव्ह नॉन व्हायोलन्स बिगेन फ्रॉम दॅट डेट’’. यानंतर प्रिटोरिया शहरातही खुद्द प्रे. क्रुगरे यांच्या घरासमोरच गांधीजींना पोलिसांच्या दडपशाहीचा सामना करावा लागला. या घटनांमुळे गांधीजी अस्वस्थ झाले. भारतीयांना त्रासदायक ठरलेल्या वर्णद्वेषाचा मुकाबला कसा करावयाचा याबद्दल ते विचार करू लागले. तशातच भारतीयांचा मतदानाचा हक्क काढून घेण्याचे घाटते आहे अशा अर्थाच्या ‘नाताळ मक्र्युरी’ या वृत्तपत्रांतील बातमीने त्यांचे लक्ष वेधले.
हा कायदा संमत होणे धोकादायक असल्याचे गांधीजींनी भारतीयांच्या निदर्शनास आणले. आम्ही कायदेशीर बाबींत अनभिज्ञ आहोत असे सांगून भारतीयांनी गांधीजींना भारतात परत न जाता दक्षिण आफ्रिकेमध्ये राहूनच हिंदी जनतेला मार्गदर्शन करण्याची विनंती केली. गांधीजी सांगतील त्याप्रमाणे करण्याची तयारी दर्शवत, गांधीजींना त्यांची फी देण्यासही लोक तयार झाले. त्या वेळी गांधीजींनी काढलेले उद्गार आजही सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्यांनी मुद्दाम लक्षात ठेवून आचरणात आणले पाहिजेत. गांधीजी म्हणाले ‘‘फीज आर आऊट ऑफ क्वेशन. देअर कॅन बी नो फीज फॉर पब्लिक वर्क. आय कॅन स्टे इफ अ‍ॅट ऑल अ‍ॅज अ सर्व्हट.’’
अखेरीस भारतीयांच्या आर्जवानुसार गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेमध्ये राहण्याचे ठरवले; अशा तऱ्हेने वकिली व्यवसायासाठी दक्षिण आफ्रिकेमध्ये गेलेले गांधीजी भारतीयांच्या संघर्षांमध्ये सामील झाले. १८९३ पासून ते १९१५ मध्ये भारतात परत येईपर्यंत गांधीजींनी या लढय़ाचे नेतृत्व केले. अथक परिश्रमाने व अहिंसेच्या निर्भय मार्गाने त्यांनी दक्षिण आफ्रिका सरकारला नमवले. भारतीयांनी दिलेल्या या ‘आत्मसन्मानाच्या लढय़ात’ गांधीजींमधील अनेक सुप्त गुणांची प्रचीती जगाला प्रथमच आली. या लढय़ांतील अनेक घटनांमध्ये वेळोवेळी गांधीजींची सत्यप्रियता, क्षमाशीलता, निर्भयता, धीरोदात्तपणा, स्त्रियांच्या सन्मानाविषयीची आस्था, निस्पृहता आणि जनमानसावरील त्यांची निर्विवाद पकड यांचे प्रत्यंतर आले.
हा संपूर्ण लढा गांधीजींनी उच्च आध्यात्मिक पातळीवरून लढवला. त्यांच्या प्रत्येक कृतीस नैतिक अधिष्ठान होते. आपण ज्यासाठी संघर्ष करत आहोत ते संपूर्ण सत्य आहे याची त्यांना खात्री होती. उदा. दक्षिण आफ्रिकामधील भारतीयांच्या लढय़ाची माहिती देण्यासाठी ते जून १८९६ मध्ये भारतात आले होते. त्या वेळी त्यांनी ‘द ग्रीव्हन्सेस ऑफ द ब्रिटिश इंडियन्स इन साऊथ आफ्रिका’ नावाचे पत्रक प्रसिद्ध केले. या पत्रकाच्या हिरव्या कव्हरमुळे ते ‘ग्रीन पॅम्प्लेट’ म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. या पत्रकाबद्दल ते आत्मविश्वासाने म्हणतात, ‘एव्हरी वर्ड, एव्हरी स्टेटमेंट इन द पॅम्प्लेट कॅन बी एस्टॅब्लिश्ड बियॉण्ड द श्ॉडोज ऑफ अ डाऊट’.
वर्णद्वेषाचा मुकाबला करण्यासाठी गांधीजींनी अविश्रांतपणे दिलेल्या लढय़ांतील काही प्रमुख घटना अशा :
१) आपल्या कार्याच्या सुसूत्रीकरणासाठी त्यांनी १९०४ च्या मध्यास सुप्रसिद्ध ‘फिनिक्स कॉलनी’ची स्थापना केली.
२) १९०४ मध्येच ‘इंडियन ओपिनियन’ या वृत्तपत्राची सुरुवात केली.
३) १९०७ मध्ये ट्रान्सवाल सरकारने रजिस्ट्रेशनचा जुलमी कायदा अमलात आणला. या कायद्यांतील सर्वात संतापजनक प्रकार म्हणजे व्यक्तीच्या अंगावरील खुणांची नोंद करून, बोटांचे ठसे घेण्यात येणार होते. स्त्रियांचीही यातून सुटका नव्हती. या अपमानास्पद कायद्याच्या विरुद्ध प्रखर लढा.
४) १९१० साली हर्मनकालेनबच यांच्या ११० एकर जमिनीवर ‘टॉलस्टॉय फार्म’ची स्थापना.
५) भारतीय लोक अन्याय्य कायद्यांविरुद्ध सातत्याने संघर्ष करत असतानाही ब्रिटिशांचे दडपशाहीचे धोरण चालूच होते. १९१३ मध्ये सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडत दक्षिण आफ्रिका सरकारने भारतीय स्त्रियांचा पत्नीपदाचा हक्क नाकारला. भारतीयांचे विवाह दक्षिण आफ्रिका कायद्याप्रमाणे झालेले नाहीत असे कारण देण्यात आले. ३० मार्च १९१३ रोजी जोहान्सबर्ग येथे भारतीयांची जंगी निषेध सभा झाली. सभेमध्ये सत्याग्रहाचे आवाहन करताना गांधीजी म्हणाले, ‘‘इट बिल बिकम द बाऊंडन डय़ुटी ऑफ द इंडियन कम्युनिटी फॉर द प्रोटेक्टिंग ऑफ इट्स विमेनहूड अ‍ॅण्ड इट्स ऑनर टू अ‍ॅडॉप्ट पॅसिव्ह रेझिस्टन्स’.
तुरुंगात जाण्यासाठी स्त्रियाही सज्ज झाल्या. कस्तुरबांसह अनेक स्त्रियांना अटक झाली. स्त्रियांना अटक झाल्यानंतर न्यू कॅसल येथील खाण कामगारानी संप पुकारला. गांधीजींच्या आवाहनासह अनुसरून संपकरी सत्याग्रहींनी घरादारावर पाणी सोडले. जनमानसावरील गांधीजींच्या जबरदस्त प्रभावाचे विलक्षण दर्शन सरकारला झाले.
६) २८ ऑक्टो. १९१३ रोजी गांधीजींच्या नेतृत्वाखाली ट्रान्सवाल येथे जाण्यासाठी ऐतिहासिक लाँग मार्चची सुरुवात झाली. हजारो मजूर अर्धपोटी राहून शांततेने, संयमाने वाटचाल करत होते. कुठल्याही कारणाने ते प्रक्षुब्ध झाले नाहीत. गांधीजींना व त्यांच्या महत्त्वाच्या सहकाऱ्यांना अटक झाली, परंतु मोर्चाच्या कार्यक्रमात खंड पडला नाही. गांधीजींच्या नेतृत्वाचे, त्यांच्यावरील विश्वासाचे हे फळ होते. या पदयात्रेसंबंधी ‘द टाइम्स’ या महत्त्वाच्या ब्रिटिश वृत्तपत्राने गौरवपूर्ण वृत्त दिले, ते येणेप्रमाणे, ‘द मार्च ऑफ द इंडियन लेबर्स मस्ट लिव्ह नि मेमरी अ‍ॅज वन ऑफ द मोस्ट रीमार्केबल मेनिफेस्टेशन्स इन हिस्टरी ऑफ द स्पिरिट ऑफ पॅसिव्ह रेझिस्टन्स’.
आपला लढा ‘पॅसिव्ह रेझिस्टन्स’ या इंग्रजी नावाने ओळखला जाऊ नये तसेच या शब्दामुळे लढय़ाचा खरा अर्थ समजत नाही असे गांधीजींना वाटत होते. म्हणूनच ‘इंडियन ओपिनीयन’मध्ये त्यांनी चळवळीला अर्थपूर्ण नाव सुचवण्याची स्पर्धा जाहीर केली होती. मगनलाल गांधींनी प्रथम ‘सदाग्रह’ हा शब्द सुचवला; त्याचा अर्थ ‘फर्मनेस इन गुड कॉज’ असा होतो. गांधीजींना हे नाव आवडले परंतु या नावात लढय़ाची संपूर्ण कल्पना व्यक्त होत नाही. त्यांनी सदाग्रह शब्दात थोडा बदल करून ‘सत्याग्रह’ हा शब्द योजला. त्याची व्याख्या गांधीजीनी ‘द फोर्स विच इज बॉर्न ऑफ ट्रथ अ‍ॅण्ड लव्ह ऑर नॉन व्हायोलन्स’ अशी केली. दक्षिण आफ्रिकेमधील लढा लढवताना काय किंवा पुढे भारताच्या स्वातंत्र्यलढय़ाचे नेतृत्व करताना काय गांधीजींनी सत्य, प्रेम (अगदी विरोधकांवरसुद्धा) आणि अहिंसा याच मार्गाने वाटचाल केली. सत्याग्रह शब्दाचे विश्लेषण करताना गांधीजींनी जणू काही आपल्या आयुष्याचे सूत्रच सांगितले आहे!
गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेमधील भारतीयांमध्ये स्वाभिमान जागृत केला व त्यातून निर्माण झालेल्या प्रतिकाराच्या ज्वालेने ब्रिटिश सरकारला ग्रासले. सरकारचा दडपशाही, अमानुष छळ, तुरुंगवास, गोळीबार या कशामुळेही लोक विचलित झाले नाहीत. अखेरीस दक्षिण आफ्रिकेमध्ये संघ सरकारला नमते घ्यावे लागले व ‘इंडियन रीलिफ बिल’ प्रसिद्ध झाले. तीन पौंडांचा अन्याय कर रद्द झाला. भारतीय कायद्याप्रमाणे झालेल्या विवाहास मान्यता देण्यासह इतरही काही सुधारणा झाल्या.
गांधीजींच्या या अभूतपूर्व लढय़ास दादाभाई नवरोजींचे सक्रिय आशीर्वाद होते, तर लोकमान्य टिळकांचा संपूर्ण पाठिंबा होता. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनेही या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केला. सर्वसामान्य भारतीय जनतेने, संस्थानिकांनी टाटांसारख्या नवोदित उद्योगपतींनी लढय़ात आर्थिक साहाय्य केले. नामदार गोखले तर गांधीजींचे गुरूच होते. गांधीजी सतत त्यांच्या संपर्कात असत.
दक्षिण आफ्रिकेमधील भारतीयांच्या स्थितीचे प्रत्यक्ष अवलोकन करण्यासाठी नामदार गोखलेनी १९१२ मध्ये दक्षिण आफ्रिकेस भेट दिली. तेथील हिंदी व युरोपियन जनतेने ‘टॉलस्टॉय ऑफ इंडिया’चे सन्मानपूर्वक स्वागत केले. जनरल बोथा व जनरल स्मट या राज्यकर्त्यांबरोबर त्यांनी वाटाघाटी केल्या. सर्व काळे कायदे रद्द करण्याचे आश्वासन त्यांना देण्यात आले. भारतात परतल्यानंतर गांधीजींवर स्तुतीसुमने उधळताना गोखले म्हणाले, ‘‘गांधी हे स्वत: तर नायक आहेतच, परंतु त्यांच्यात इतरांनाही नायक बनवण्याची अद्भुत, आध्यात्मिक शक्ती आहे.’’
हा लढा चालू असतानाच रेव्हरंड डोक यांनी गाधीजींचे चरित्र लिहिले. या पुस्तकाच्या शेवटी भारतीयांना संदेश देताना गांधीजीनी स्वत:च दक्षिण आफ्रिकेमधील आपल्या लढय़ाचे मर्म सांगितले. गांधीजी म्हणतात, ‘‘जगातील कोणत्याही भागात उत्तम ठरेल असा समाज निर्माण करण्याच्या कामात आम्ही गुंतलेलो आहोत. शरीरबळापेक्षा सत्याग्रहाचे बळ शतपटीने श्रेष्ठ होय अशी आमची श्रद्धा आहे. त्याने आमची ट्रान्सवालमधील दु:खे दूर होतील. एवढेच नव्हे तर हिंदुस्थानातील आमच्या बांधवांना राजकीय व इतर बाबतीत जो छळ सोसावा लागत आहे तोही दूर होईल.’’
लढय़ाची यशस्वी गाथा सांगता झाल्यावर आफ्रिकेला निरोप देण्याची वेळ आली. आफ्रिकेचा किनारा सोडते वेळी गांधीजींनी हिंदी व युरोपियन जनतेला संदेश दिला. आफ्रिकेतील काराराची त्यांनी इंग्लंडमधील मॅग्नाकार्टाबरोबर तुलना केली. कायद्यामध्ये वर्णविषमतेला स्थान नाही हे ब्रिटिश राज्यघटनेचे तत्त्व आफ्रिकेतील कराराने मान्य केले याबद्दल त्यांनी संतोष व्यक्त केला.
दक्षिण आफ्रिकेमध्ये वर्णद्वेषाविरुद्ध गांधीजींनी दिलेला लढा ही हिंदुस्थानातील पुढील महासंग्रामाची नांदीच ठरली. अहिंसेच्या मार्गाने सविनय सत्याग्रह केल्यास सामथ्र्यशाली राज्यकर्त्यांनाही नमते घ्यावे लागते हे त्यांनी निर्विवादपणे सिद्ध केले. या लढय़ांतील त्यांचे आचरण हा राजकीय पुढाऱ्यांसाठी एक आदर्श वस्तुपाठच आहे. त्यांनी स्वत:साठी काहीच केले नाही. गांधीजींना संपत्तीची हाव नव्हती की स्वसुखाची आस नव्हती. टीकेने ते विचलित होत नव्हते किंवा स्तुतीने हुरळून जात नव्हते. स्वत:च्या मनास जे पटते ते निर्धाराने, निर्भयतेने अमलात आणायचे हाच त्यांचा बाणा होता. दक्षिण आफ्रिकेमधील लढय़ाच्या महासंग्रामातून सत्याग्रहासारखे अमोघ अस्त्र हाती आले व हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या महानायकाचा राजकीय क्षितिजावर उदय झाला, हीच या लढय़ाची फलश्रुती आहे.
विवेक आचार्य – response.lokprabha@expressindia.com

रविवार, ४ ऑक्टोबर, २०१५

‘राहिले दूर घर माझे’

मी ‘राहिले दूर घर माझे’ हे नाटक लिहिलं त्याला आता २० र्वष होत आली. अलीकडेच मुंबई विद्यापीठात मराठी साहित्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात या नाटकाचा समावेश करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने नाटकावर बोलण्यासाठी दोन-चार कॉलेजांत जाण्याचा योग आला. मी हे नाटक का लिहिलं, कसं लिहिलं, हे जाणून घेण्याची विद्यार्थ्यांना उत्सुकता होती. अलीकडच्या विद्यार्थ्यांना मागे घडून गेलेल्या गोष्टींत किंवा इतिहासात फारसा रस नसतो. तर फाळणी आणि त्यानंतर वारंवार होणाऱ्या दंगलींमागची कारणं, त्यामागचं राजकारण माहीत नसलेल्या या मुलांना हे फाळणीचं, दंगलीचं नाटक कसं उलगडून दाखवायचं, हा मोठाच प्रश्न होता. मी साहित्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत हे २० वर्षांपूर्वीचं नाटक उसवून बघितलं आणि काही नव्या गोष्टी हाती लागल्या.
मी चौऱ्याहत्तरच्या सुमारास नाटक करायला सुरुवात केली. मी लिहीत होतो आणि स्वत:च त्याचे प्रयोग ‘थिएटर’ या संस्थेतर्फे छबिलदास शाळेत करत होतो. छबिलदासशी संबंधित आम्ही सगळेच वेगळ्या नाटकाने झपाटले गेले होतो. जुनं नाकारून नवीन नाटक शोधत होतो. फक्त वरवरची गोष्ट सांगू पाहणारं व्यावसायिक नाटक आम्हाला फारसं आवडत नसे.
सगळं व्यवस्थित चालू आहे असं वाटत असतानाच आसपास काही वेगळ्या, अ‍ॅब्सर्ड गोष्टी घडत होत्या. रथयात्रा निघाल्या होत्या. पौराणिक नाटकातला पोशाख चढवलेले नेते हातात तलवार घेऊन रथात बसून निघालेत असे फोटो वर्तमानपत्रांतून छापून येत होते. यातून काय निष्पन्न होईल याचा नेमका अंदाज येत नव्हता. ज्यांना आला होता, ते बोलत नव्हते. पुढे बाबरी मशीद पाडली गेली. बातमी ऐकून छातीत धस्स् झालं. आता काहीतरी भयंकर घडेल असं वाटायला लागलं.
आम्हाला दंगलींचा अनुभव होता. परंतु ही दंगल त्याहून वेगळी होती. बऱ्याच दिवसांपासून दंगलीची संहिता लिहिली जात होती. नीट तालमीही झाल्या होत्या. आता रस्त्यावर दंगलीचा खेळ सुरू होता. उन्माद पसरला होता. तालमींचा आपल्याला अंदाज आला नाही, आपण काही करू शकलो नाही, ही भावना मनाला छळत होती. सारेच हताश, हतबल झाले होते. भयाने, रागाने, संशयाने, नैराश्याने आतून पोखरायला सुरुवात केली होती. लिहिण्याची गरज वाटत होती. बाहेर दंगल सुरू होती, आणि मी घरात बसून लिहीत होतो. काही पात्रं, काही संवाद, काही घटना असं तुकडय़ा-तुकडय़ांत सुचत होतं. पण त्या तुकडय़ांचं नाटक होत नव्हतं. मग नाटक लिहायचा नाद मी सोडला. पण आसपास काहीतरी भयंकर घडलंय आणि आपल्याला साधं लिहिताही आलं नाही, ही जाणीव मला सतत टोचत राहिली.
पुढे सारं शांत झालं असं वाटत असतानाच बॉम्बस्फोट झाले. त्याच्याही म्हणे तालमी चालल्या होत्या. पण त्या कुणाच्या लक्षात आल्या नाहीत. उद्विग्नता आली. आपल्याला यावर काही लिहिता येत नाही, आणि लिहिलं तरी त्याचा काही उपयोग नाही असं वाटून मी नाटक, लेखन सगळं थांबवून टाकलं. कुठे तालीम चालली आहे असं दिसलं तरी भीती वाटायला लागली.
अचानक एक दिवस वामन केंद्रेचा फोन आला. एका नाटकाचं वाचन व्हायचं आहे असं तो म्हणाला. मी नाटक सोडल्याचं त्याला सांगितलं तरी तो आग्रह करत राहिला. म्हणून गुंतायचं नाही असं ठरवून गेलो. वाचनाला दोघे-चौघे जमले होते. असगर वजाहत यांच्या ‘जिस लाहौर नहीं देख्या..’ या हिंदी नाटकाचं वाचन सुरू होतं. हे नाटक सत्तेचाळीस साली देशाची फाळणी झाली त्या घटनेवर आधारित होतं.
फाळणीनंतर पाकिस्तानातल्या लाहोर शहरातले सगळे हिंदू निघून जातात. शहरातल्या एका मोठय़ा हवेलीत एक पंजाबी हिंदू म्हातारी तेवढी दंगलीत हरवलेल्या आपल्या मुलाची वाट बघत थांबते. ती पाकिस्तानात थांबलीय हे कुणाच्याच लक्षात येत नाही. भारतातून लाहोरमध्ये स्थलांतरित झालेल्या एका मुसलमान कुटुंबाला ही हवेली ‘अलॉट’ होते. आणि ते कुटुंब, हिंदू म्हातारी आणि परिसरातले भले, बुरे मुसलमान असा संघर्ष उभा राहतो.
मी लक्ष द्यायचं नाही म्हणता म्हणता नकळत नाटकात ओढला गेलो. मी माझ्या आत गाडून टाकलेलं र्अधकच्चं नाटक उसळून वर यायला लागलं. असगर वजाहतच्या नाटकात मला माझं नाटक दिसू लागलं. मला म्हणायचं आहे ते मला या नाटकाच्या आधारे म्हणता येईल असं वाटू लागलं. वाचन संपलं. हे नाटक मराठीत व्हायला हवं असं सगळ्यांचं मत पडलं. हे नाटक मी भाषांतरित करावं असं सगळे म्हणू लागले. मला नाही म्हणता आलं नाही.
ऑग्देन नॅश (ogden nash) नावाच्या कवीच्या कवितेतल्या दोन ओळी आठवतात..
कुणीही शाळकरी पोर मूर्खासारखं प्रेम करू शकेल
पण मित्रा, तिरस्कार करणं ही एक कला आहे..
आपल्याकडच्या अनेक कथा, कादंबऱ्या, कविता, नाटकं, इतिहास वाचताना या ओळी हमखास आठवत राहतात. आज तिरस्काराची कलाच खरी कला म्हणून मिरवते आहे. अशा वेळेला खऱ्या कलावंतांची जबाबदारी वाढते. त्यांना युद्ध सोडून पळता येत नाही.
मी ‘जिस लाहौर नहीं देख्या..’ या नाटकाचा आधार घेऊन माझं नाटक रचायला सुरुवात केली. वजाहतांच्या नाटकात जात, धर्म, भाषा, प्रदेश यापेक्षाही माणूस मोठा असतो, हा मुद्दा येत होता. मी लिहीत होतो त्या नाटकात तिरस्काराच्या आजाराने पोखरलेला, भयाने, सुडाने आंधळा झालेला आणि माणसावर प्रेम करण्याची सहज, नैसर्गिक वृत्तीही हरवून बसलेल्या आजच्या माणसाची शोकांतिका जास्त ठळक होत गेली.
हे नाटक करायचं कुठे? अशी चर्चा सुरू झाली. छबिलदास नाटय़गृहात आपल्याच विचारांच्या पाच-पन्नास मित्रांसमोर हे नाटक करण्यात काही अर्थ नव्हता. प्रत्यक्ष रस्त्यावर दंगल करणारे, त्यांना चिथावणारे, पाठबळ देणारे आणि दंगेखोरांच्या मागे मानसिकरीत्या उभे राहून त्यांना बळ देणाऱ्या असंख्यांपर्यंत हे नाटक जाणं गरजेचं होतं. व्यावसायिक मराठी रंगभूमीवर याचा प्रयोग झाला तरच हे शक्य होतं.
आता व्यावसायिक नाटक बघणाऱ्या प्रेक्षकांच्या काही अटी असतात. त्यांना वास्तववादी (?), कौटुंबिक नाटक आवडतं. दुसऱ्याच्या घरात डोकावून बघणं आणि आमचं उत्तम चाललंय, जगण्यात कुठल्याही बदलांची गरज नाही, असं वाटायला लावणारं नाटक बघितलं की त्यांना बरं वाटतं. गुदगुल्या होतात. अशी गुदगुल्या करणारी नाटकं त्यांना चालतात. पण तुमच्या जगण्यात, दृष्टीत खोट आहे आणि त्यात मोठय़ा बदलांची गरज आहे असं सुचवून त्यांना अस्वस्थ करण्याचा प्रयत्न केला की हे प्रेक्षक बिथरतात. त्यामुळे अशी नाटकं व्यावसायिक रंगभूमीवर होत नाहीत. आणि झालीच, तरी चालत नाहीत. असो!
हे नाटक लिहिताना भाषेचा प्रॉब्लेम होता. मूळ नाटकात हिंदी, लखनौची उर्दू आणि लाहोरची पंजाबी भाषा होती. नाटकातली पात्रं हिंसकपणे धमकावत होती. पण उर्दूमुळे ते जाणवत नव्हतं. खणखणीत पंजाबीतून सतत एक प्रेमळ ओलावा झिरपत होता. हे सगळं मराठीत कसं आणायचं, ही मोठी समस्या होती.
महाराष्ट्राला फाळणीचा थेट अनुभव नाही. त्यामुळे फाळणीवर मराठीत फारसं साहित्यही नाही. फाळणीनंतर माझा मामा आणि इतर काही नातेवाईक कराचीला निघून गेले. ते अधूनमधून कधीतरी भारतात येत. त्यांच्या वागण्या-बोलण्यातून आपलं गाव, मुलुख सुटल्याचा तडफडाट दिसे. पाकिस्तानात तिथल्यांनी आपल्याला स्वीकारलं नाही, आपण तिथेही एकटे, अलग पडलो, ही रुखरुख त्यांच्या बोलण्यात जाणवे.
मी दंगलीत आपलं घर, आपला गाव सोडून दुसरीकडे निघून जाणारी माणसं बघितली होती. त्या दुसऱ्या गावांत.. घरांत ही माणसं, त्यांची मुलंबाळं रुजली नाहीत. आपल्याला आपल्याच लोकांनी घालवून दिलं, हे विसरता न आलेल्यांची भकास गावं आणि उजाड कॉलन्या मी पाहिल्या आहेत. हे सगळं नाटकात झिरपलं. धर्माच्या नावानं विस्थापित होण्याचा मुद्दा ठळक होत गेला.
‘जिस लाहौर नहीं देख्या..’ हे नाटक हबीब तन्वीर यांनी श्रीराम सेंटरसाठी बसवलं होतं. ते मुक्त शैलीतलं होतं. त्यात दोन दृश्यांच्या मधे कोरसने म्हटलेली गाणी होती. अनेक स्थळं होती. असंख्य पात्रं होती. त्या प्रयोगात कणखर हिंदू म्हातारीची भूमिका एका तरुण मुलाने केली होती. (हबीब तन्वीरांवर बटरेल्ट ब्रेख्तचा प्रभाव होता.) मूळ नाटकाचा शेवट मी बदलला. त्यात लाहोरात असलेली शेवटची हिंदू व्यक्ती वारते आणि शहरात हिंदूच नसल्यामुळे स्मशानही नष्ट झालेलं! अशा वेळेला हिंदू म्हातारीला आई मानलेल्या मुसलमानांना आता काय करावं, असा पेच पडतो. मला वाटलं, अल्पसंख्याकाला मारून या पेचातून सुटका करून घेता येणार नाही. मी तिला जिवंत ठेवलं. ती आपला वारसा, अनुभव छोटय़ा तन्नोकडे सुपूर्द करते. आपला आजीचा बटवा तिच्याकडे सोपवते. तिला तिरस्कारातून मुक्त करते. जात, धर्म, प्रांत यापल्याड माणसाकडे बघण्याची एक विशाल दृष्टी देते. तिला निर्भय बनवते.
शेवटी रात्री दंगल पेटते. धर्माचा खरा अर्थ सांगू पाहणाऱ्या मौलानाचा खून होतो. हवेलीवर गुंड चालून येतात. तन्नो आणि दादी दरवाजा उघडून गुंडांना सामोरे जात असतानाच नाटक संपतं. काहींना हा शेवट रोमँटिक वाटला. पण अशा काळात दादीचा अनुभव, शहाणपण आणि छोटय़ा तन्नोची निरागसता तिरस्कार संपवेल, माणसाला माणसावर प्रेम करायला लावील, असा भरवसा बाळगायला काय हरकत आहे?
..आणि शेवटी अनेक वर्षांनंतर पाकिस्तानात छोटी निरागस मलाला तालिबान्यांना सामोरी गेलीच की नाही! असो!
हे नाटक कोण करील असं वाटत असतानाच निर्माते मोहन तोंडवळकर पुढे आले आणि ‘कलावैभव’ संस्थेतर्फे व्यावसायिक रंगभूमीवर हे नाटकं उभं राहिलं. वामन केंद्रेने भरपूर मेहनत घेऊन प्रयोग उभा केला. एरव्ही सामाजिक बांधीलकीच्या गप्पा मारणाऱ्या काही नटांना जास्त मानधन मिळण्याची शक्यता दिसत नसल्यामुळे इच्छा असूनही या नाटकात काम करता आलं नाही. पण निर्मिती सावंत, स्वाती चिटणीस, अविनाश नारकर, डॉ. शरद भुथाडिया, श्रीकांत देसाई, मंगेश देसाई, सोनाली पंडित, राजा अबोलेसारखे कलावंत मिळाले. त्यांनी झपाटून कामं केली. आणि एक प्रभावी प्रयोग उभा राहिला. गावागावात नाटकाचे प्रयोग झाले. प्रयोग थांबू नयेत म्हणून काही सामान्य प्रेक्षकांनी स्वत:हून देणग्या आणून दिल्या. या प्रयोगाने टोचलं, खरवडलं, अस्वस्थ केलं, तरीही प्रयोग प्रेक्षकांना आवडला.
नाटकामुळे कदाचित दंगली थांबवता येणार नाहीत; पण हे नाटक बघितलेला कुणी एक उद्या दंगलीत दगड उचलताना विचार करील, दगड भिरकावणाऱ्याला थांबवेल, एवढी अपेक्षा करायला काय हरकत आहे!(लोकसत्ता)
-शफाअत खान shafaat21@gmail.com