गुरुवार, १६ जानेवारी, २०१४

महासत्संग की प्रचारसभा 

मकर संक्रांतीच्या पवित्र दिवशी अमरावती शहरात श्री. श्री. रविशंकर यांच्या महासत्संगाचे आयोजन केल्या गेले होते. त्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित झाले होते. मात्र आचार्यजींची वक्तव्ये निवडणूक प्रचारसभेत बोलल्यासारखी होती. आपल्या भक्तांनी आधी व्यवहार नेटका करावा व व्यवहार सुरळीत झाल्यावरच परमार्थाच्या मागे लागावे असा सरळ सरळ उद्धेश आचार्यजीन्च्या मनात असावा. स्वामी विवेकानंदसुद्धा गीता तत्वज्ञान शिकायच्या ऐवजी युवकांना फुटबॉल खेळण्याचा सल्ला देत असत. " आधी प्रपंच करावा नेटका " अशीच आमच्या संतांची शिकवण राहिलेली आहे आणि येत्या सार्वत्रिक निवडणुकीत समजूतदारपणे मतदान केल्याशिवाय आमचा प्रपंच नेटका कसा होणार ? मात्र हा उपदेश करतांना आचार्यजी एका विशिष्ट पक्षालाच मतदान करा असेही सुचवत होते. सध्याचे सरकार देश बुडवायला निघालेले असल्यामुळे " बुडविता हे जन , देखविना डोळा , म्हणून येतसे कळवळा " अशी आचार्यजीनची अवस्था झाली असल्यास नवल नाही. युवकच आता देशात क्रांती करू शकतात अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. महर्षि अरविंद आधी ब्रिटीशांच्या विरोधात लढणारे क्रांतिकारक होते. पुढे मात्र ते अध्यात्माकडे वळले व महर्षी झाले. स्वातन्त्र्यलढ्याऐवजी त्यांनी अध्यात्माला महत्व दिले.  क्रांतिकारकाचा संत झाला . त्यांनी तेंव्हा जी भूमिका बदलली त्याबद्दल भारतीय जनमानसात कुठलीही कटुता नाही. आता काळ बदलेला आहे व आध्यात्मिक गुरु, महाराज , बाबा अध्यात्माऐवजी क्रांतीची भाषा बोलतात हे सुचिन्हच समजावे लागेल. श्रीकृष्णाने सुद्धा महाभारताच्या युद्धात हाती शस्त्र घेणार नाही अशी प्रतिज्ञा करूनही शस्त्र हातात घ्यावेच लागले होते. 
विशेष म्हणजे भारतीय जनतेला छळणाऱ्या दुष्ट राक्षसाची ओळखही पटविण्यात आली आहे. आणि अध्यात्माच्या क्षेत्रातली सर्वच मंडळीनी या राक्षसाच्या निर्दालनासाठी रान उठवले आहे. ही सर्व मंडळी आपदधर्म म्हणून या चिखलात उतरली आहे. चिखलाचे काही शिंतोडे त्यांच्या अंगावरही उडतील तरिही ती मागे हटणार नाही हे नक्की. तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे  "मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे " या उक्तिची लवकरच  भारतीय जनतेला प्रचीती   येणार आहे हे नक्की. परंतु अमरावतीला झालेला हा कार्यक्रम महासत्संग होता की निवडणूक प्रचारसभा होती हा प्रश्न मात्र मात्र सध्यातरी अनुत्तरितच राहील असे दिसते. 

राजेंद्र कडू
अमरावती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: