बुधवार, २४ सप्टेंबर, २०१४

अस्मितेचा कडेलोट देशाच्या फाळणीकडे घेऊन जाईल.

मोदी वारंवार आपण गुजराती असल्याचा उल्लेख करत आहेत. पंतप्रधान होण्यापूर्वीसुद्धा गुजरातचे मुख्यमंत्री असतांना ते वारंवार " सहा कोटी गुजरात्यांची अस्मिता " असा उल्लेख आपल्या भाषणात करत होते. ते सुद्धा चूकच होते कारण गुजरातमध्ये फक्त गुजरातीच राहत नाहीत.  किंबहुना भाषावार प्रांतरचना झाल्यावर सुद्धा भारताच्या कोणत्याही  राज्यात फक्त विशिष्ट भाषिक लोकच फक्त राहतात असे नाही. आणि आता पंतप्रधान झाल्यावर सुद्धा आपण गुजराती आहोत असा उल्लेख त्यांनी करणे अनुचित आहे.  गेल्या काही महिन्यांपासून अमेरीकेतील  गुजराती समाज मोदींच्या येत्या अमेरिका दौऱ्यात  त्यांच्या स्वागताची कशी कशी तयारी करत आहे याच्या बातम्या माध्यमातून झळकत आहेत. या बाबतीत माध्यमे सुद्धा बेजाबादारीने वागताहेत. वस्तुत: माध्यमांनी अशा बातम्या द्यायला पाहिजे की अमेरिकेतील भारतीय नागरिक मोदींच्या स्वगाताची जय्यत तयारी करताहेत. कारण मोदी भारताचे पंतप्रधान म्हणून अमेरिकेस जात आहेत गुजरातचे पंतप्रधान म्हणून नव्हेत. अस्मितेच्या या वायफळ प्रदर्शनामुळे पंतप्रधानपदी गुजराती माणूस आहे, आपल्या राज्याचा नाही याचे वैषम्य देशातील अन्य राज्यांच्या जनतेमध्ये वाढीस लागू शकते. आणि असा गुजराती अस्मितेचा आलेख वाढत गेला आणि पुढचा पंतप्रधान गुजराती नसला तर गुजराती जनतेच्या ते पचनी पडणार नाही व गुजराती जनतेमध्ये फार मोठे वैफल्य पसरेल आणि देशाचा पंतप्रधान गुजराती नाही तर ,कशाला या देशात रहायाचे अशी भावना वाढीस लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी आम्ही शीख अस्मितेची खलीस्तानच्या मागणीकडे झालेली वाटचाल व त्यामुळे पंजाबची झालेली होरपळ अनुभवलेली आहे. तमिळ अस्मितेचाही दाहक अनुभव घेतलेला आहे. काश्मीर भारताचेच आहे असे ठणकावून सांगतांना देशातील  प्रत्येक राज्य हे भारताचेच आहे हे आम्हाला विसरता कामा नये.
मागे एकदा क्रिकेटच्या वर्ल्ड कप मध्ये अंतिम सामना पाकिस्तान व भारत या पारंपारिक शत्रूंमध्ये मध्ये होईल असे गृहीत धरून क्रिकेटप्रेमींमध्ये मोठा उन्माद पसरला होता. पण हे दोन्ही देश अंतिम सामन्यात न पोहोचल्यामुळे क्रिकेट शौकीनांमध्ये मोठी निराश पसरली व मोठ्या प्रमाणावर तिकिटे रद्द केली गेली व आपण क्रिकेटप्रेमी नसून उन्मादप्रेमी आहोत हे आपण दाखवून दिले होते. असेच या बाबतीतही न होवो. मोदी जर पंतप्रधान होणार नसतील तर कशाला मतदानाला जायचे असे ही गुजराती जनतेला वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रतिभाताई राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्यानंतर फक्त काही दिवसच "जळगावची कन्या", " अमरावतीची सून " असा माफक कौतुक सोहळा साजरा झाला व नंतर सर्व काही सामान्य झाले. तेंव्हा आपण अस्मिता प्रदर्शित करण्याची मर्यादा पाळू या व याचा विपर्यास होऊन आमची वाटचाल अघटिताकडे होणार नाही याची काळजी घेऊ या.
राजेंद्र कडू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: