तुम्ही सिंहाचे छावे आहात.
एकेकाळी मराठ्यांचे संपूर्ण हिंदुस्थानावर वर्चस्व होते.अटकेपार मराठे पोहोचले होते हा इतिहास सर्वांनाच माहित आहे.
अटक हे शहर सध्या पाकिस्तानात आहे.
शिवाजीमहाराजांच्या काळात तामिळनाडूमध्ये तंजावर व जिंजी येथे मराठ्यांचे राज्य होते.
आजही तंजावर येथे भोंसले आडनावाची माणसे राहतात. (पण त्यांना मराठी समाजात नाही.)
दिल्ली काबीज करून मराठ्यांनी तेथील बादशहाच्या संरक्षणाची हमी घेतली. तसा उल्लेख शाहीर साबळे यांनी गायलेल्या "गर्जा महाराष्ट्र माझा" या गीतात "दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा " या ओळीत केल्या गेला आहे. उत्तर व मध्य भारतातील अनेक संस्थानिक मराठ्यांना खंडणी देत होते. (कृपया आजकाल जी खंडणी उकळल्या जाते त्याच्याशी या खंडणीचा संबंध जोडू नये. विनाकारण युद्धात ओढल्या गेलो तर पराभूताकडून युद्धाचा खर्च वसूल करणे याला त्याकाळात खंडणी असे म्हणत असत). अनेक मराठी सरदारांनी महाराष्ट्राबाहेर आपली राज्ये स्थापन केली होती. उदा. ग्वाल्हेर (शिंदे), गायकवाड (बडोदे), होळकर (इंदूर) वगैरे. बंगाल आणि ओरिसा येथेही मराठे पोहोचले होते.
सुरुवातीच्या काळात इंग्रजांनी कलकत्ता येथे बस्तान बसविले होते. मराठ्यांच्या आक्रमणापासून संरक्षण व्हावे म्हणून तेंव्हाच्या शहराभोवती (की गावाभोवती ) एक खंदक खोदला होता. त्याला मराठा खंदक असे म्हणत व आजही तो भाग मराठा खंदक एरिया या नावाने ओळखला जातो. (संदर्भ- प्रा. सदानंद मोरे यांचा लेख). बंगाल/ओरिसामध्ये तर मराठ्यांची एव्हढी दहशत होती की, शोले चित्रपटात जसा गब्बर स्वत:चा उल्लेख करतो त्याप्रमाणे त्याप्रमाणे आया आपल्या रडणाऱ्या मुलाने झोपी जावे म्हणून अंगाई गीत म्हणायच्या, " बाळा आता झोप नाहीतर मराठे येतील." (प्रा. सदानंद मोरे), आणि तश्या अर्थाचे एक अंगाई गीतही मला सापडले ते मी स्वतंत्रपणे व्हाटसअप वर देत आहे. ते अंगाईगीत आजही म्हटले जाते (अर्थात ग्रामीण भागात). तुमचे कोणी उडिया/बंगाली भाषिक मित्र असतील तर तुम्ही त्या गाण्याचा अर्थ जाणून घेऊ शकता.
अर्थात एव्हढे सगळे असुनही मराठे वर्चस्ववादी होते असे म्हणता येणार नाही. कारण परप्रांतातच काय दिल्लीची सत्ता मिळूनही स्वत: सत्ताधीश न होता खऱ्या उत्तराधिकारयाच्या हातात सत्ता सोपवून मराठे महाराष्ट्रात परतले.बाजीराव पेशवेसुद्धा बुंदेलखंडच्या छत्रसाल राजाला मदत करून व त्याची बक्षिशी म्हणून मिळालेल्या मस्तानीला घेऊन पुण्यात परतले. मस्तानी ही छत्रसाल राज्याची (मानस) कन्या होती असे सांगतात. परंतु घरजावई होण्याचा विचारही बाजीरावांच्या मनात आला नाही.
म्हणूनच की काय आज सुद्धा दिल्लीत केंद्रीय मंत्रीमंडळात मनासारखे पॉवरफुल खाते मिळाले तरी मराठी मंत्र्याचे त्यात मन लागत नाही व 'गड्या आपुला गाव बरा' या उक्ती प्रमाणे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची खुर्ची त्यांना सतत साद घालत असते. इंग्रजांनी संपूर्ण हिंदुस्थान काबीज केला पण फक्त मराठेच त्यांना शेवट पर्यंत पुरले. नारायणरावाचा खून करून पराक्रमी रघुनाथराव पेशवे इंग्राजांना जाउन मिळाले नसते तर हिंदुस्थानचा इतिहास कदाचित वेगळाच असता. त्यानन्तरही नारायणरावाच्या विधवा पत्नीच्या गर्भात असलेल्या भृणाला पेशवेपदाचा टिळा लावून बारा मुत्सद्द्यांनी (बारभाईचा कारभार) राज्य सांभाळले. आणि नंतर गांधीजींनी सांगितलेल्या विश्वस्तपणाची (Trusty Ship) संकल्पना महाराष्ट्रात दीडशे वर्षे आधीच राबविली. या बारा मुत्सद्द्यांमध्ये साडे तीन शहाणे होते. त्यात नाना फडणवीस अर्धे शहाणे म्हणून ओळखल्या जात होते. होते. (आताचे 'फडणवीस' किती शहाणे आहेत ते माहित नाही)
आणि हो ताजा इतिहास म्हणजे १९६२ च्या चीनी आक्रमणानंतर देशाच्या संरक्षणाची धुरा सक्षम व्यक्तीकडे द्यावी या विचाराने पंडित नेहरूंनी महाराष्ट्राचे तेंव्हाचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना संरक्षण मंत्रीपदावर नेमले. या घटनेचा उल्लेख तेंव्हा सर्वच पत्रकारांनी " हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला " असा केला होता. त्याहून ताजा इतिहास म्हणजे १९८२ साली झालेल्या एशियन गेम्स साठी खेळाडूंना ने आण करण्यासाठी बसेस बांधण्याचे काम आपल्या MSRTC ला म्हणजे ST ला देण्यात आले. त्याच त्या एशियाड बसेस.
पुण्याचेच स्वातंत्र्यसेनानी सेनापती बापट यांच्या काव्यपंक्ती प्रसिद्ध आहेत त्या अशा
" महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले,
महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले.
तेंव्हा असा गौरवशाली इतिहास असलेल्यांच्या वंशजांनो समाजात, देशात, जगात वावरतांना ताठ मानेने जगा. मराठी माणूस/मराठी भाषा डाऊन असे कुणी म्हणत असेल तर त्याचा समाचार घेतल्याशिवाय पुढे जाऊ नका.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा