सोमवार, २३ मे, २०१६

सिस्टीमच्या बाहेर राहूनच सिस्टीम बदलता येईल ………

बऱ्याच 'विचारवंतांना' वाटते की चांगल्या लोकांनी राजकारणात यावे. त्यामुळे राजकारण शुद्ध होईल. किंवा काहींना वाटते कि मी सनदी अधिकारी होऊन प्रशासनात सुधारणा घडवून आणील. परतू असे होणे शक्य नाही कारण चांगला माणूस राजकारणात गेला तरी इतर भ्रष्ट मंडळी त्याला वर जाऊ देतील हे शक्य नाही.
तो कितीही चांगला असला तरी तो राजकारणाच्या काठावरच राहील याची बाकी मंडळी काळजी घेतील. जनतेला सुद्धा चांगला माणूस नकोच आहे. जो बदली, बढतीसाठी चिट्ठी देईल, जो लायसन्स, परमिट मिळवून देईल, मुलाला चांगल्या संस्थेत प्रवेश मिळवून देईल, सरकारी कोट्यातील घर मिळवून देईल, माझे अतिक्रमण नियमित करून देईल असाच नेता आम्हाला हवा असतो. एखाद्या आमदाराने "बदली साठी भेटू नये" अशी दारावर पाटी  लावली तर तो पुन्हा निवडून येण्याची शक्यता कमीच.
सनदी अधिकारी कितीही चांगला असला तरी प्रशासकीय यंत्रणा त्याला त्याच्या मनाप्रमाणे काम करू देत नाही हा आपला अनुभव आहे. अशा अधिकाऱ्याची लवकरच उचल बांगडी होते. वाढ्राचे प्रकरण उकरून काढणाऱ्या अशोक खेमका यांची बदली भाजप सरकार सत्तेवर आल्यावर पुरातत्व खात्यात (गाडलेले मुडदे उकरण्याच्या कामावर) करण्यात आली. आणि आता तर त्यांना बढती मिळून सुद्धा खालच्या पदावर काम करण्यास सांगितले आहे कारण ते वर ज्या जागेवर जाणार असतील तेथे गेल्यावर ते सत्ताधारयांना अडचणीचे ठरू शकतील अशी  साताधीशांना भीती असावी. अशा दोन चार बदल्या झाल्यावरही तो 'सुधारला' नाही तर मग प्रशिक्षण संस्था वगैरेमध्ये साईड पोस्टिंग ठरलेलेच आहे.
अर्थात चांगली माणसे बदल घडवून आणू शकत नाहीत असे नाही. परंतु त्यासाठी खूप चिकाटी व संयम ठेवावा लागतो.
एका शास्त्रज्ञाने अशी फुशारकी मारली होती की  ही  पृथ्वी मी लाथेने फुटबॉलसारखी उडवून दाखवतो, फक्त मला पृथ्वीच्या तीन फूट वर उभं रहायला जागा द्या. त्याला माहित होते की अशी जागा कुणी देऊ शकत नाही. कारण पृथ्वी कुणाला सोडत नाही. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे सर्व प्राणीमात्रांना पृथ्वीला धरून रहावे लागते. म्हणजेच कुठल्याही यंत्रणेत जाउन तुम्ही ती यंत्रणा बदलू शकत नाही. ती यंत्रणा बदलायची असेल तर तुम्हाला यंत्रणेच्या बाहेर राहूनच त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. म्हणजेच राजकारण/प्रशासन शुद्ध/स्वच्छ करायचे असतील तर राजकारणाच्या/प्रशासनाच्या बाहेर राहून करावे लागेल. कारण यंत्रणेमध्ये तुम्ही शिरलात तर यंत्राणा तुम्हाला आपल्यासारखे बनविण्याचा प्रयत्न करते व तुम्ही त्यासाठी तयार नसलात तर तुम्हाला कोपऱ्यात/बाहेर ढकलून देण्यात यंत्रणा तत्पर असते. तेंव्हा जे काही करायची इच्छा असेल ते बाहेर राहून करा. राजकारणाच्या/ प्रशासनाच्या चक्रव्यूहात शिरलात तर तुमचा अभिमन्यु होण्याची शक्यता जास्त आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: