शनिवार, ९ एप्रिल, २०१६

अाधुनिक युगातही भारतीय महाकाय भूमापन थक्क करणारे ………

भूमापन दिन विशेष
स्वा तंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी भारतीय भूमापनचे (जमीन मोजणी) काम पूर्ण केले. विशेष बाब म्हणजे ब्रिटिशांनी या काळात आधुनिक तंत्रज्ञान नसतानाही आपल्या कुशाग्र बुद्धीच्या बळावर भारताचे जमिनीचे महाकाय असे मोजणीचे काम शंखू साखळी पद्धतीने केले. अशा परिस्थितीत महाकाय अशा भारताचे भूमापन करणे ते पण अचूक, मोजणी करताना किती खडतर संकटे, अडचणी आली असतील याची कल्पना केलेलीच बरी. भारतीय भूमापनामुळे भारताचे नकाशे, अभिलेख तयार झालेत.
ब्रिटिशांनी भारतावर १५० वर्षे राज्य केले. भारताचे स्वातंत्र्यप्राप्तीसाठी भारतातील क्रांतिकारक महापुरुषांनी ब्रिटिशांशी शेवटपर्यंत जिकिरीचा लढा दिला. यामध्ये अनेक क्रांतिकारक शहीद झाले. त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळवून भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. जिगरबाज क्रांतिकारक शहीद झाल्याने भारताची खूप मोठी भरून निघणारी हानी झाली, तर दुसरीकडे ब्रिटिशांनी आपल्या राज्य काळात संगणक युगामधील अत्याधुनिक तंत्रज्ञान, यंत्रसामग्री, विकसित नसतानाही भारतात विविध क्षेत्रांत केलेली नेत्रदीपक प्रगती ही थक्क करणारी आहे. ब्रिटिशांनी भारतात रेल्वे, विमान सेवा, नदीवरील मोठमोठे पूल, शासकीय, खासगी टोलेजंग रेखीव, देखण्या मजबूत इमारती आहेत. आजही त्याकडे पाहिल्यास असे वाटते की, काही दिवसांपूर्वीच या वास्तूची निर्मिती केली असावी, असा जिवंतपणा त्यात दिसून येतो. अजूनही ब्रिटिशकालीन पूल, इमारतीची मजबुती शाबूत आहे.
भारतातील भूमापनचा इतिहास पाहिला, तर भारत देश हा कृषिप्रधान देश असल्याने पूर्वी जमीन महसूल उत्पन्नाचे साधन होते. प्राचीन भारतामध्ये राज्य कारभार चालवण्यासाठी राजाला जमिनीचे एकूण उत्पन्नापैकी काही अंश कर म्हणून घेण्याची पद्धत पुरातन काळापासून होती. राजेशाही काळात राजाला जमीन महसूल गोळा करण्याचा अधिकार होता. अकबर काळात जमीन महसूल गोळा करण्याच्या पद्धतीत अकबर बादशहाच्या काळात त्याचा मंत्री ताेरडमल यांनी जमिनीची मोजणी काठी साखळी याचा उपयोग करून जमिनीचे क्षेत्र बिघा या परिमाणात काढले. त्यानंतर ब्रिटिश राज्यकर्त्यांनी जमीन महसूलवर विशेष लक्ष दिले. शासन सुरळीत सुरू ठे‌वण्याच्या दृष्टिकोनातून जमीन महसूल कर चांगला, योग्य राहील, हे ब्रिटिश राज्यकर्त्यांनी लक्षात घेऊन त्यांनी रयतवारी पद्धत सुरू केली. त्यामुळे शासन शेतकरी यांचा सरळ संबंध आला. त्यामुळे ब्रिटिशांनी भारतातील भूमापनाच्या कामाकडे विशेष लक्ष दिले. परंतु, खरे अचूक, सखोल असे भारतातील जमिनीच्या मोजणीचे काम ब्रिटिशांनी केले असल्याचे सत्य नाकारता येत नाही.
ब्रिटिश कार्यकाळात भारतीय भूखंडाच्या पहिल्या मोजणीचे काम सुरू करण्यासाठी १० एप्रिल १८०२ मध्ये त्रिकोणमितीय भूमापन पद्धतीने आधाररेषा टाकण्याचे काम ब्रिटिश सरकारमधील कर्नल लॅम्बटन यांनी केले. या कामाची सुरुवात त्यांनी मद्रासजवळील थॉमस पर्वतापासून केली. सन १८०२ मध्ये कर्नल विल्यम लॅम्बटन यांनी मद्रासहून भारत मोजणीचे काम सुरू केले. ते काम सुरू असतानाच कर्नल लॅम्बटन यांचे भारतातील महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमध्ये निधन झाले. हिंगणघाट येथे आजही त्यांचे समाधीस्थळ आहे. त्यानंतर भारत भूमापनाचे काम जॉर्ज एव्हरेस्ट यांनी पुढील ३३ वर्षांत पूर्ण केले, अशा प्रकारे एकूण ३७ वर्षांत त्यांनी महाकाय अशा भारतीय भूमापनाचे मोजणीचे काम पूर्ण केले. जॉर्ज एव्हरेस्ट यांचे भूमापन क्षेत्रामधील कार्याला विशेष महत्त्व आहे. त्यांनी विशाल अशा एव्हरेस्ट शिखराच्या मोजणीचे काम केले. म्हणूनच हिमालयातील शिखर क्रमांक एव्हरेस्ट हे नाव दिले आहे. तत्कालीन जमाबंदी आयुक्त एम. जे. एच अन्डरसन यांनीही भूमापनाचे उत्कृष्ट काम केलेले असल्याने त्यांना महसूल प्रशासनाचे पितामह म्हणून आेळखले जाते. या ३७ वर्षांच्या भूमापन कार्यात खडतर कठीण परिस्थितीत अनेक भूमापकांनी आपले प्राण गमावले. ज्यांनी अमूल्य असे भूमापनाचे काम केले त्यांच्या त्यागाची आठवण, चिरंतन स्मृती राहावी म्हणून सन १९०४ मध्ये स्थापन झालेल्या भूमि अभिलेख खात्यामध्ये १० एप्रिल हा दिवस भूमापन दिन म्हणून साजरा केला जातो.
िब्रटिशांनी भारतीय भूमापन शंखू साखळी पद्धतने केले. यामध्ये त्यांनी जमिनीचे क्षेत्र एकर गुंठ्यात काढले. भूमापनामध्ये वापरलेल्या साखळीचा उपयोग गुंटूर नामक अधिकाऱ्याने अमलात आणला. त्यामुळे या साखळीला गुंटूर चेन म्हणण्यात येते. ३३ फूट लांबीची ही साखळी असून, ती १६ भागांत विभागली आहे. त्या प्रत्येक भागाला आणा म्हटले जात होते. गुंटूर यांच्या नावावरून पुढे गुंठा हा शब्द रूढ झाला. एक साखळी लांब आणि एक साखळी रुंद अशा ४० गुंठ्यांचा एक एकर, असे प्रमाण ठरवण्यात आले. गुंठ्यांच्या जमिनीच्या क्षेत्रात एक एकर म्हणत जमिनीचे क्षेत्रफळ गुंठा, आणा, प्रती आणा यामध्ये शोधून काढल्याने प्रती भाग आण्याच्या आधारे शेतसारा प्रमाणदर निश्चित करून जमीन महसूल आकारणी करणे सोयीस्कर ठरले. त्यानुसार ब्रिटिश राज्यकर्त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने जमीन महसूल गोळा करण्यास सुरुवात केली.
ब्रिटिशांनी भारतात केलेले भूमापन आजच्या परिस्थितीमध्ये आजही मोक्यावरील- जागेवरील परिस्थितीच्या तंतोतंत अचूक मेळात असल्याचे दिसते. ब्रिटिशांनी भूमापन करतेवेळी जमिनीमध्ये गाडलेल्या निशाणी किंवा सर्व्हे नंबर लिहिलेले दगड नकाशातील अभिलेखानुसार, मोक्यावर आजही दिसून येतात. भूमापन केल्यावर हस्तलिखित तयार झालेले सर्व्हे नंबर, गट नंबरचे नकाशे त्यामध्ये दऱ्याखोऱ्या, रेल्वे लाइन, नदी-नाले , रस्ते, विहिरी, झाडे अचूक दर्शवण्यात आली आहेत. १५० ते २०० वर्षे उलटूनही मोठ्या प्रमाणातील नकाशे, महत्त्वाचे अभिलेखाचे जतन भूमि अभिलेख विभाग अभिलेखागारात सुस्थितीत आहेत. त्याच बरोबर टिपणे उतारे, पोट हिस्सा आदी महत्त्वाचे दस्तऐवज भूमि अभिलेख विभागामध्ये काही प्रमाणात सुस्थितीत आहे. यावरून असे दिसून येते की, त्यांच्या कामाचा दर्जा किती दर्जेदार होता. नकाशे महत्त्वाचे अभिलेख वारंवार हाताळावे लागत असल्याने काही प्रमाणात जीर्ण झाले. याबाबत भूमि अभिलेख खात्याकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे. भूमि अभिलेख खात्यातील जतन करून ठेवलेला जमिनीचा अभिलेख म्हणजे भूमि अभिलेख खात्याचे हृदय आहे.
जमीन मोजणीमध्ये शंखू साखळी पद्धत वेळखाऊ किचकट असल्याने ती बंद करण्यात येऊन त्याऐवजी मोजणी फलक यंत्र-प्लेन टेबलद्वारे जमिनीची मोजणी करण्याची पद्धत सुरू झाली. सध्याच्या परिस्थितीत आजच्या आधुनिक युगामध्ये जमीन मोजणीमध्ये नवनवीन तंत्रे अवलंबण्यात येत आहेत. प्लेन टेबलनंतर आता ई.टी.एस. मशीन, जीपीएस मशीन तसेच सॅटेलाइट या आधुनिक यंत्रांद्वारे मोजणीचे काम प्रगतिपथावर आहे.(दिव्यामराठी आज)
{किशोरइंगळे, वरिष्ठभूमापक भूमि अभिलेख विभाग, अकोला.



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: