तो लष्करात अधिकारी होता. गोळ्या घालून
मारलं त्याला.. आणि मग वर्षभरानंतर त्या देशाच्या पंतप्रधानांना त्याच्या
पत्नीला भेटण्यासाठी त्याच्या घरी जावं लागलं. तेथे एक अत्यंत महत्त्वाचा
निर्णय त्यांनी जाहीर केला. काय होता तो निर्णय?
देशद्रोहासारखं मोठं, इतकं गंभीर दुसरं पाप नाही. ज्या भूमीत आपण
जन्मलो, ज्या भूमीनं आपल्याला मोठं केलं, त्या भूमीशी प्रतारणा करणं किती
वाईट. माणसाच्या जगण्याच्या ज्या काही किमान निष्ठा आहेत, त्यातली एक
महत्त्वाची म्हणजे मातृभूमीशी असलेली बांधीलकी. पण असतात काही काही
नतद्रष्ट जे देशाशी प्रतारणा करतात. कसला न कसला मोह होतो त्यांना. आणि मग
ते इमान विकतात.
आणि हे असलं पाप एखाद्या लष्करी अधिकाऱ्याच्या नावावर असेल तर मग पाहायलाच
नको. असा अधिकारी मग पाप्यांमधला पापी. ज्यानं देशाचं रक्षण करायचं तोच जर
असं देशाच्या मुळावर उठला तर त्याइतका गंभीर गुन्हा असूच शकत नाही. अशा
गुन्ह्यास एकच प्रायश्चित्त असू शकतं.
ते म्हणजे देहान्त. फासावर लटकवणं, मारून टाकणं. अशा किडक्या सडक्या
व्यक्तींना हाच एक मार्ग असतो ही विषवल्ली संपवण्याचा. या अशा शिक्षेमुळे
गुन्हेगाराला तर शासन होतंच. पण जे संभाव्य गुन्हेगार असतात त्यांनाही धडा
मिळतो. खबरदार.. अशी देशप्रतारणा केलीत तर! तेव्हा देहान्त प्रायश्चित्त हा
मोठा जालीम इलाज आहे बदमाशांना सरळ करण्याचा. आणि त्याहूनही मुख्य म्हणजे
नवे बदमाश तयार होणं रोखण्याचा..
त्यामुळे मीर तोबिआन्स्की याला देहान्ताची सजा दिली गेली यात काहीही गर
नाही. मीर लष्करी अधिकारी. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारा. आणि त्याचा
देशही कसा? तर नुकतंच स्वातंत्र्याचं स्वप्न पाहू लागलेला. भारतासारखाच.
ब्रिटिशांनी सगळा जीवनरस शोषून घेतलेला. त्यामुळे स्वत:च्या पायावर उभं
राहायचं तर पायात जोर नाही. आसपास मदतीला कोणी नाही. असलेच तर सगळेच शत्रू.
त्यामुळे त्या देशाच्या भाग्यविधात्यांनी ठरवलं, सगळ्यांशी निष्ठुरपणे
वागायचं. देशाच्या विरोधात जरा जरी आवाज करताना कोणी दिसला तर त्याचा गळाच
आवळायचा. सगळे तयार झाले. देशप्रेम तसा सगळ्यांच्याच आवडीचा विषय. आणि
मुख्य म्हणजे हे प्रेम व्यक्त करणं तसं सोपंदेखील असतं. शत्रूच्या नावे
कडाकडा बोटं मोडली, त्याला चार शिव्या हासडल्या की आपोआप देशप्रेमाचं
प्रमाणपत्र मिळतंच मिळतं. या धोरणाच्या जोडीला त्या देशानं आणखी एक केलं.
शत्रूसाठी आपल्या देशातला एक जरी नागरिक हेरगिरी करताना आढळला, फितुरी
करताना सापडला तर त्याला जरादेखील दयामाया दाखवायची नाही.. असं ठरवलं. थेट
सुळावर चढवून मोकळं व्हायचं अशा बदमाशाला.
त्यातूनच या देशाची कडवा राष्ट्रवादी अशी प्रतिमा उभी राहिली. कडवे
राष्ट्रवादी देशासाठी काहीही करायला तयार असतात. हे असं सुरुवातीलाच करायचं
असतं. एकदा का कडवा राष्ट्रवादी अशी प्रतिमा तयार झाली की नंतर तशी
प्रतिमा असलेला जो काही करतोय तो राष्ट्रवाद असंच मानलं जाऊ लागतं. म्हणजे
मग त्याला कुणी विरोध केला की चक्क देशालाच विरोध असं सगळे म्हणू लागतात.
आणि सगळे म्हणतात म्हणजे ते बरोबरच मानायचं असतं, लोकशाहीत.
हे मीरला माहीत नसावं कदाचित. कारण तसा त्याचा लोकशाहीशी काही फार संबंध
आला नव्हता. नुकताच तर कुठे तो देश रांगायला लागला होता. स्वातंत्र्याचा
श्वास घेत होता. त्यामुळे मीरला हे काही बारकावे कळत नव्हते. आता हेच जर
नाही कळलं लोकशाहीत तर काय अर्थ आहे?
नव्हताच तो. जो काही होता-नव्हता तो मीरचा गुन्हा उघड झाल्यावर त्याच्या
विरोधातील रागात वाहून गेला. मीरनं फितुरी केल्याचं उघड झालं. मीर लष्करात
होता आणि त्याच्या देशाच्या वीज कंपनीत सुरक्षा अधिकारी होता. या
कंपनीतल्या अधिकाऱ्यांची ब्रिटिशांबरोबर ऊठबस असे. कारण त्या कंपनीशी
ब्रिटिशांचा तांत्रिक सहकार्याचा करार होता. असं म्हणतात की याच कंपनीच्या
ठिकठिकाणच्या गोदामांत सरकारनं युद्धात कामी येतील म्हणून गुप्त अस्त्रसाठे
करून ठेवले होते. आता इतकी महत्त्वाची माहिती सगळ्यांना थोडीच माहीत
असणार. लष्करातले अत्यंत कळीचे अधिकारी आणि त्या कंपनीचे काही वरिष्ठगण
यांनाच त्याची माहिती होती. पण तरी ती फुटली. ही माहिती फुटल्याचं कळलं
कसं?
तर शत्रुराष्ट्रानं बरोबर या अस्त्रांच्या गोदामांना लक्ष्य केलं आणि
उद्ध्वस्त करून टाकली ती. मीरच्या मायदेशाला हा मोठा झटका होता. सगळेच
हादरले त्यामुळे. या सगळ्यांची खात्रीही पटली. कोणीतरी फंदफितुरी
केल्याशिवाय ही अशी माहिती फुटणं अशक्यच. मग शोध सुरू झाला. कोण असेल तो
अस्तनीतला निखारा? सगळ्यांच्या नजरा हळूहळू मीरकडे वळायला लागल्या. मीरच
तो. त्यात त्याच्याकडे वॉकीटॉकी सापडला. म्हणजे नक्की तोच. याच
वॉकीटॉकीवरनं त्यानं शत्रूशी संधान बांधलं असणार.. खात्री पटली सगळ्यांची.
आपला देशबांधव इतका क्षुद्र वागू शकतो? मुळापासून उपटून टाका ही विषवल्ली..
राष्ट्रवादाचा सामूहिक आविष्कार संतप्त सुरांतून व्यक्त होऊ लागला. त्याची
धग अगदी लष्करी नेतृत्वापर्यंत पोहोचली. त्यांनाही जाणवलं लवकरात लवकर काय
तो निर्णय घ्यायला हवा या मीरचा. तो लवकर घ्यायचा तर कोर्टकचेऱ्या वगरे
करून चालणार नव्हतं. आणि त्याची गरजही नव्हती. कारण मीर लष्करी अधिकारी
होता. कोर्टमार्शल हा सोपा आणि जलद मार्ग होता. तेव्हा हे कोर्टमार्शल
ठरलं. त्यात मीर दोषी ठरला. आता तो दोषी ठरलाच आहे तर त्याला आणखी जिवंत
ठेवायचं कारणच काय, असा सुज्ञ विचार लष्करी अधिकाऱ्यांनी केला. बरोबरच होतं
त्यांचं. तेव्हा असाच योग्य दिशेनं विचार करणारा लष्करी अधिकारी म्हणाला..
याच्या फाशीची तरी कशाला वाट पाहायची.. उगाच वेळ जातो.. त्यापेक्षा इथेच
मारून टाकू या त्याला.. मग ते मीरला घेऊन निघाले शहराकडे. जाताना वाटेत एका
शाळेची रिकामी इमारत दिसली. तिकडे घेऊन गेले त्याला. मीर आत जात असताना
बरोबरच्या अधिकाऱ्यांनी गोळ्या घातल्या त्याला.. पाच गोळ्यांत मीर मेला..
बातमी पसरली. त्याच्या बायकोला माहीत होतं, आपल्या नवऱ्यानं असं काहीही
देशविरोधी वगरे केलेलं नाही. तो अगदी निर्दोष आहे. पण कोण ऐकणार तिचं..
आपल्या नवऱ्याच्या मरणाचं दु:ख वागवत ती जगत राहिली.
साधारण वर्षभरानंतर राजधानीजवळच्या झुडपात दुसऱ्या एका हेराचं प्रेत
सापडलं. त्याचं नाव अली कासीम. हा खरं तर याच देशासाठी काम करत होतं. पण
मीरप्रमाणेच त्याला हाताळणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याला संशय आला हा दुहेरी खेळ
खेळतोय. म्हणजे आपल्या देशासाठी काम करता करता शत्रुराष्ट्रासाठीही काम
करतोय. पण हा काही लष्करी कर्मचारी नव्हता. तेव्हा त्याच्यासाठी काही
कोर्टमार्शलच्या उपचाराची गरज नव्हती. त्यामुळे या लष्करी अधिकाऱ्यानं
राष्ट्रवादी विचार केला आणि या हेराला मारून टाकलं. तसंच गोळ्या घालून.
पण काही वेडपट मानवतावादी संघटनांनी त्याच्या मृत्यूचं भांडवल केलं.
त्यामुळे सरकारला दखल घ्यावी लागली. अलीच्या मृत्यूची चौकशी झाली.
त्याबरोबरीनं त्याला मारणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याचीही चौकशी झाली. त्यात
त्याला मान्य करावं लागलं.. अलीला मी वैयक्तिक कारणांमुळे ठार केलं.
ही बातमी पसरली आणि मीरच्या पत्नीची आशा पल्लवीत झाली. तिनं अॅटर्नी
जनरलकडे अर्ज केला. माझ्या नवऱ्याच्या मृत्यूची पण चौकशी व्हायला हवी.
एव्हाना राष्ट्रवादाचा उन्माद ओसरला होता. सरकारनं ती विनंती मान्य केली.
मीरच्या मृत्यूची साद्यंत चौकशी झाली. आणि त्यातल्या निष्कर्षांनं सर्वानाच
धक्का बसला.
मीर निर्दोष होता. त्याच्यावर ज्या हेरगिरीचा आरोप झाला होता ती
प्रत्यक्षात दुसऱ्यानेच केली होती. तिच्याशी मीरचा काडीचाही संबंध नव्हता.
आणि तो दुसरा हेरगिरी करणारा ब्रिटिशच होता. पण त्याच्यासाठी ती हेरगिरी
नव्हतीच.
पण या निष्कर्षांने सगळेच हादरले. सगळ्यांनी मान्य केलं.. ज्याचं मरण आपण
साजरं केलं, त्याचा या गुन्ह्यात काहीही दोष नाही. सरकारनं मग त्याचं पाíथव
कबरीतून पुन्हा काढलं. त्यावर सरकारी इतमामानं अंत्यसंस्कार केले. त्याचा
लष्करी हुद्दा पुन्हा परत केला. त्याच्या कबरीवर लिहिलं.. चुकून मारला
गेलेला..
त्याच्या पत्नीची माफी मागायला त्या देशाचे पंतप्रधान जातीनं त्याच्या घरी
गेले. पत्नीला तेवढंच समाधान. नवरा तर परत येणार नव्हताच. पण निदान
त्याच्यावरचा दोषडाग तरी दूर झला.. ती पंतप्रधानांना म्हणाली, 'या सरकारी
चुकीची किंमत मी किती मोजली हे तुम्हाला कळतंय का? माझं काय आणि कसं नुकसान
भरून देणार तुम्ही?'
पंतप्रधानांनी जाहीर केलं.
यापुढे या देशात कोणालाही देहान्त प्रायश्चित्ताची शिक्षा दिली जाणार नाही..
ही घटना १९४८ सालातली.
००
त्या देशाचं नाव इस्रायल.
पंतप्रधानांचं नाव बेन गुरियन.
१९६२ साली अॅडॉल्फ आएकमन या होलोकॉस्ट गुन्हेगाराला दिलेली फाशी वगळता
इस्रायलनं हा निर्णय आजतागायत पाळलाय. अगदी गेल्याच महिन्यात इस्रायल
पार्लमेंटनं.. केनेसेट.. फाशीच्या शिक्षेचं पुनरुज्जीवन करण्याचा ठराव
फेटाळून लावला.
त्या देशाचं म्हणणं, काळाबरोबर नवनवे पुरावे पुढे येत असतात.. इतिहासही
बदलत असतो. आज समोरच्या पुराव्यांमुळे दोषी ठरलेला उद्या नव्या घटना उघडकीस
आल्या की निर्दोष असल्याचं समजतं.. मग मारलेला जीव परत कसा आणणार..
अनेकांसाठी आदर्श असणाऱ्या, अनुकरणीय वाटणाऱ्या, राष्ट्रवादाचा महामेरू
अशा इस्रायलची भूमिका माहीत असावी, यासाठीच या मीरमरणाचं मोल..( Article by Girish Kuber published in Loksatta dt. 08/08/2015
girish.kuber@expressindia.com

@girishkuber
गिरीश कुबेर