मुख्यमंत्र्याच्या 'हौस'वाईफचा मुक्तछंद
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता ‘स्टार
ऑफ द मिलेनियम’ अमिताभ बच्चनसोबत नृत्य करत असल्याचं छायाचित्र नुकतंच
सार्वजनिक झालं. बऱ्यापैकी तंग आणि पाश्चिमात्य पेहरावातल्या अमृता
पाश्चिमात्य नृत्य करताना दिसल्या. क्षणभर कल्पना करा की, राज्यात-देशात
सध्या काँग्रेस किंवा भाजपेतर पक्षाची सत्ता आहे. नोटबंदीमुळं जनता त्रस्त
आहे. सीमेवरून दर दिवसाआड कोणत्या ना कोणत्या गावात शहिदांची पार्थिवं येत
आहेत. शेतमालाचे पडलेले भाव, महागाई वगैरे नेहमीच्या समस्या आ वासून आहेतच.
अशा स्थितीत समजा काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचं
‘वेस्टर्नाइज्ड’ रूपातलं छायाचित्र जनतेपुढं आलं असतं तर? संस्कृतीरक्षणाचा
मक्ता घेतलेल्या तथाकथित संघटना आणि खास करून संघ परिवारातील मंडळींनी काय
धुमाकूळ घातला असता?
विश्व हिंदू परिषदेचा एखादा नेता डोळे वटारून म्हणाला असता, ‘सीमा पर
जवान अपनी जान कुर्बान कर रहे हैं और यहाँ कांग्रेसी सीएम की पत्नी नृत्य
करने मे दंग है. अरे कुछ तो शरम करो. देश के लिए कुछ ना कर सको तो कोई बात
नहीं मगर कम से कम शहीदों की इज्जत करना तो सीखो.’
ऊठसूठ प्राचीन भारतीय संस्कृतीचे गोडवे गाणारा एखादा योगी म्हणाला
असता, ‘मुझे लगता है उनका मानसिक संतुलन ढल गया है. प्राचीन भारतीय सभ्यता
का ग्यान उन को नहीं है. उन को हर रोज प्राणायाम करना चाहिये. चलो दीर्घ
साँस अंदर... आराम से साँस बाहर.’
‘खरं म्हणजे हा राजकारणाचा विषय असू शकत नाही. माननीय
मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवतींबद्दल आम्हास पूर्ण आदर आहे. त्यांच्या
व्यक्तिगत जीवनात त्यांनी काय करावं, यावर बोलण्याचा आम्हास अधिकारदेखील
असू शकत नाही. तरीदेखील काही गोष्टी या वेळ-काळ पाहून करायच्या असतात.
त्यांनी थोडा संयम पाळला असता तर ते माननीय मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेस
साजेसे झाले असते,’ अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षातल्या देवेंद्र फडणवीस
यांच्यासारख्या भाजप नेत्याने दिली असती. संघचालक किंवा तत्सम पदावरच्या
कोणी बौद्धिकच झाडले असते. ‘कुलीनता आणि शालीनता हा स्त्रीधर्म आहे. परंतु,
पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण करण्याची पद्धत आपल्याकडे
इतकी बोकाळली आहे की, त्या नादात आपण स्वतःचे अध:पतन करून घेतो आहोत,
हेसुद्धा लक्षात येत नाही. तुम्ही पाहिलेच असेल, अलीकडेच एका
मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने काय केले ते? मी नाव घेणार नाही. काय चालले
आहे? कुठे निघालो आहोत आपण? तोकडे, उत्तान कपडे घातल्याने स्त्री मुक्ती
होते का? विश्वगुरू होण्याच्या मार्गावर असलेल्या हिंदुस्थानच्या
परमवैभवाला डाग लावण्याचे प्रयत्न आपल्याच लोकांकडून सुरू आहेत. जबाबदार
व्यक्ती समाजापुढे असा आदर्श ठेवणार असतील तर आपल्याला फार सावधपणे काम
करावे लागणार आहे.
जयतु जयतु हिंदुराष्ट्रम,’ असे भव्य तारे तोडून संघवाले मोकळे झाले असते.
उग्र बजरंगी मंडळी चार पावलं पुढं जात ‘अखंड हिंदुस्थानच्या स्त्रीजातीची मान आज शरमेने झुकली आहे,’ असं म्हणाली असती. तोकड्या कपड्यात वावरणाऱ्या अशा स्त्रियांमुळेच समाजाचे चारित्र्य धोक्यात आले आहे. जीन्स-स्कर्टची ही उत्तान पाश्चिमात्य संस्कृती मुळापासून उखडून टाकली पाहिजे. सरकारने अशा कपड्यांवर तातडीने बंदी न घातल्यास योग्य कार्यवाही करण्यास आम्ही समर्थ आहोत. जय श्रीराम, अशी धमकीदेखील त्यांनी दिली असती.
उग्र बजरंगी मंडळी चार पावलं पुढं जात ‘अखंड हिंदुस्थानच्या स्त्रीजातीची मान आज शरमेने झुकली आहे,’ असं म्हणाली असती. तोकड्या कपड्यात वावरणाऱ्या अशा स्त्रियांमुळेच समाजाचे चारित्र्य धोक्यात आले आहे. जीन्स-स्कर्टची ही उत्तान पाश्चिमात्य संस्कृती मुळापासून उखडून टाकली पाहिजे. सरकारने अशा कपड्यांवर तातडीने बंदी न घातल्यास योग्य कार्यवाही करण्यास आम्ही समर्थ आहोत. जय श्रीराम, अशी धमकीदेखील त्यांनी दिली असती.
थोडक्यात काय तर मुख्यमंत्र्यांच्या पत्नीनं वेस्टर्न कपड्यात,
वेस्टर्न डान्स केल्यानं स्त्रीची शालीनता आणि भारतीय संस्कृती रसातळाला
चालल्याचा गोंगाट संस्कृतिरक्षकांनी माजवला असता. हे सगळं अस घडलंच असतं,
अशी शंका घेण्यात काडीइतकीही अतिशयोक्ती नाही. कारण संस्कृतिरक्षकांचा
इतिहासच तसा आहे. पंडित नेहरू आणि लेडी माउंटबॅटन यांच्या मैत्रीची आजही
हीन चिरफाड करणारे लोक कोण आहेत? जर्मन राजदूताच्या पत्नीबरोबर सलमान
खुर्शीद यांनी केलेल्या नृत्याची खिल्ली उडवणारे कोण होते? शशी थरूर
यांच्या पत्नीला ‘पचास करोड की गर्लफ्रेंड’ म्हणून कोणी हिणवलं?
दिग्विजयसिंह यांच्या उतारवयातील लग्नाची टिंगल कोण करत राहिलं? अशी
कित्येक उदाहरणं अमृता यांच्या नृत्याइतकीच खासगी होती. त्यात इतरांनी नाक
खुपसण्याचं कारण नव्हतं. ‘व्हॅलेंटाइन’ऐवजी वसंतपंचमी साजरी करा,
‘थर्टीफर्स्ट डिसेंबर’च्या ऐवजी गुढीपाडवा, यासारख्या सूचना लादण्याचा
प्रयत्न सातत्यानं होतो. काय योग्य-अयोग्य ही चर्चा नंतरची, पण कोणी कसं
वागावं, याबद्दलचं व्यक्ती व मतस्वातंत्र्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न
संस्कृतिरक्षक सतत करत असतात, हे नाकारता येत नाही. ‘हिंदू राष्ट्रा’चं
स्वप्न उरी बाळगलेले हेच संस्कृतिरक्षक अमृता यांच्या नृत्यासंदर्भात मात्र
मिठाची गुळणी धरून आहेत, या त्यांच्या दांभिक-दुटप्पीपणावरचा आक्षेप या
निमित्तानं नोंदवायला हवा.
बाकी ‘सीएम’च्या पत्नीचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व मान्य केलं पाहिजे.
मुख्यमंत्र्यांच्या कामात त्या ढवळाढवळ करत असल्याचं अजून दिसलेलं नाही.
स्वतंत्र स्त्री म्हणून त्यांनी कसं जगावं, यावर इतरांनी मतं लादण्याची गरज
नाही. ‘सीएम’च्या खुल्या दिलाचंही कौतुक या निमित्तानं जरूर व्हायला हवं.
हे नृत्य सार्वजनिक होऊन त्यातून विरोधकांना आयतं कोलीत मिळणार, याची पूर्ण
कल्पना असूनही सीएमनी या नृत्यास आडकाठी आणली नाही. डोक्यावरून पदर,
कपाळावर रुपयाएवढं कुंकू अशा रूपात सीएममागून मुकाट चालणाऱ्या आणि
‘साहेबां’चा आब राखण्यासाठी सदोदित कृत्रिम बंदिस्त आयुष्य जगणाऱ्या ‘मिसेस
सीएम’ पाहण्याची आजवर महाराष्ट्राला सवय. या पार्श्वभूमीवर अमृता उपभोगत
असलेलं स्वातंत्र्य मराठी मनाला नवीन आहे. पण एक लक्षात घ्यावं लागेल,
स्वतः सीएम पन्नाशीतही पोहोचलेले नाहीत. नव्या पिढीचा हा मुख्यमंत्री.
त्यांची पत्नी स्वतःच्या पायावर उभी असलेली ‘करिअरिस्ट’ आहे. बँकिंग, आयटी
किंवा कॉर्पोरेट जगातली बड्या पदावरची स्वावलंबी स्त्री जितकी मुक्त असू
शकते तितकंच पुरुषसत्ताक संस्कृती झुगारणारं स्वतंत्र आयुष्य अमृता जगत
आहेत. वैयक्तिक इच्छा-आकांक्षा, आवडीनिवडी गुंडाळून नवऱ्यामागं फरफटत
जाण्याइतक्या बांधील त्या नाहीत, असा कयास आपण करू शकतो. अमृतांच्या या
मुक्तछंदामुळं संस्कृतिरक्षक संघपरिवार अगदीच बावचळून गेला असावा. गणवेशात
संघशाखेवर नियमित जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या खासगी
आयुष्याबद्दल या मंडळींनी जितक्या सहजतेनं सहिष्णुता दाखवली तितकाच
मोकळेपणा संघपरिवारानं इतरांबाबतीतही दाखवावा, ‘वेस्टर्न कल्चर’ची बौद्धिकं
लादू नयेत, अशी अपेक्षा करायला काय हरकत आहे?
जाता जाता अमृता यांनीही एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यावी. तुमचे पती
महाराष्ट्रासारख्या संपन्न राज्याचे मुख्यमंत्री आहेत म्हणूनच अमिताभनं
तुमचा हात इतक्या सहजी हातात घेतला. तुमचा गळा फार गोड आहे किंवा पदन्यास
अप्रतिम आहे म्हणून नव्हे. फक्त गुणवत्तेचाच निकष लावायचा तर कदाचित
तुम्हाला रांगेत उभारावं लागेल, अशा दर्जाच्या गायिका आणि सौंदर्यवती
नृत्यांगना भारतात उदंड आहेत.
sukrut.k@gmail.com
sukrut.k@gmail.com
(सुकृत खांडेकर यांचा आजच्या दिव्य मराठीतील 'मधुरिमा' पुरवणीत लेख)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा