गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०१४

एका रात्रीतून मतपरिवर्तन कसे काय होते ? 

मुंबईचे पोलिस आयुक्त ( आता  माजी ) नोकरीचा राजीनामा देऊन भाजपाच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढविण्यास सज्ज झाले आहेत. एखाद्या पक्षात प्रवेश करून महत्वाची जबाबदारी पार पाडायची म्हणजे त्या पक्षाच्या ध्येय धोरणाचा सखोल अभ्यास करून व त्या पक्षाने अंगीकारलेली तत्वे आत्मसात करून मगच त्या पक्षाचे सदस्यत्व एखादी व्यक्ती स्वीकारते असा माझा  भाबडा समज होता. प्रत्यक्षात मात्र असे दिसते की कोणत्या पक्षाची चलती  आहे हे पाहून त्या पक्षात संधिसाधू उडी घेतांना दिसत आहेत. त्यातल्या त्यात भाजप व आप या दोन पक्षांना सध्या जास्त मागणी आहे. गेल्या वेळेस हत्ती चिन्हावर निवडणूक लढविलेले पुण्यातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक या वेळेस आपच्या झाडूवर स्वार होऊ पाहताहेत. 
या सर्व गदारोळात मला एक प्रश्न नेहमीच पडतो तो सरकारी नोकरीत मोठ्या हुद्द्यावर असणारीमंडळी राजीनामा दिल्यानंतर किंवा निवृत्त झाल्यानंतर लगेच एखाद्या पक्षात कसा काय प्रवेश करतात. म्हणजेच यांचे सगळे आधीच ठरलेले असते. याचाच अर्थ नोकरीत असतांना हि मंडळी शरीराने एखाद्या पक्षाच्या सरकारचे नोकर तर मनाने दुसरेच कुठलेतरी आदर्श मानणाऱ्या पक्षाच्या विचाराचे. त्यामुळे त्यांच्याकडून विद्यमान सरकार कसे अडचणीत येईल हे पहिले जाण्याची व तशी कामगिरी  बजाविण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उदाहरणार्थ निवृत्त झाल्यावर मोदींच्या मांडीला मांडी लावून बसणारे माजी लष्कर प्रमुख यांनी एका बलाढ्य लष्कराच्या प्रमुख पदी असूनही आपल्या जन्मतारखेबद्दल जो पोरकटपणा केला तो अशोभनीय होता. एखाद्या सरकारी बाबू सारखे ते सरकार विरुद्ध कोर्टातही गेले. निवृत्तीनंतरही बरीचशी पोरकट विधाने त्यांनी केली व नंतर कोर्टात ती मागेही घेतली. काही उच्च सरकारी अधिकारी नोकरीत असतांना सरकारला कोंडीत कसे पकडता येईल याची विरोधी पक्षाला संधी मिळवून देतात व नंतर विरोधी पक्षाचे सरकार आले कि निवृत्तीनंतर त्यांना त्याचा घसघसीत मोबदला मिळतो. या सर्व पार्श्वभूमीवर अमेरिकेत असलेली पद्धत योग्य वाटायला लागते. तेथे नवीन अध्यक्ष निवडून आला की पूर्वीच्या अध्यक्षांनी उच्च  पदावर नेमलेले सर्वच अधिकारी राजीनामा देतात व नवीन अध्यक्षाला त्याच्या विचाराशी सुसंगत असणारी माणसे नेमण्याचा मार्ग मोकळा करून देतात. अर्थात आपल्या देशात हे केले तर " टगे " राजकारणी प्रत्येक नको असलेल्या अधिकाऱ्याला " परदेशी " करतील. पण त्यामुळे तत्वाला मुरड घालून प्रशासन चालविणारी मंडळी निवृत्त झाल्यावरच तत्व पालनाला सुरुवात करतात. त्यामुळे देशात  तत्वासाठी झगडणाऱ्या  तरुण मंडळीची वानवा जाणवते. उतारवयात तत्वासाठी लढा पुकारण्याऐवजी तरुणपणातच जर नोकरीचा राजीनामा दिला किंवा नोकरीच स्वीकारली नाही तर देशाला त्याचा काहीतरी फायदा होईल. नाहीतरी आमच्या पूर्वजांनी म्हटले आहे की शहाण्याची गुलामी करावी पण मूर्खाची चाकरी करू नये. सद्याच्या प्रवुत्तीला मात्र एकच म्हण लागू पडते, करून करून भागले आणि देवपूजेला लागले.आमच्या मागच्या पिढीतल्या स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्यासाठी आपले शिक्षण, नोकऱ्या सोडल्या. आपल्यालाही दुसरे ( की तिसरे, चौथे ) स्वातंत्र्य मिळवायचे आहेना ?
राजेंद्र कडू
९४२३१२५२५४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: