सोमवार, २३ डिसेंबर, २०१३

सगळेच मावसभाऊ , मिळून सर्व खाऊ 

 राजकीय नेते आपसात भांडत असतांना दिसत असले तरी आतून मात्र ते एकमेकाची सोय गैरसोय पाहत असतात . खाली दिलेला किस्सा लोकप्रभा या मराठी साप्ताहिकाच्या दिनांक २०/१२/१३/ च्या अंकात आलेला आहे.  

" काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांमध्ये असलेल्या राजकीय नेतृत्वाची पोकळी निर्माण झाल्याचे लक्षण आहे. भाजपच्या टॉप टेन नेत्यांमध्ये ८ जणांची लोकसभेत निवडून येण्याची एक टक्काही शक्यता नाही. भाजपचे अख्खे दुकान चालविणाऱ्या प्रमोद महाजन यांची कमतरता नरेंद्र मोदी यांनी भरून काढली. भाजप-संघ-समाजवाद्यांच्या 'प्रात:स्मरणात' महाजनांनी कॉपरेरेट विचारधारा आणली.व्यावहारिक चातुर्यासाठी महाजनांचे नाव आजही घेतले जाते. प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर बिगरभाजपचे सरकार असलेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली होती. त्या होत्या बिहारच्या मुख्यमंत्री राबडीदेवी. राबडीदेवी यांनी दिल्लीच्या वास्तव्यात एकही पत्रकार परिषद घेतली नाही. पण महाजनांच्या निधनानंतर त्या अनेक वृत्तवाहिन्यांशी बोलल्या होत्या. महाजनांच्या व्यक्तिगत संपर्काचा एक प्रसंग सांगितलाच पाहिजे. रालोआचे सरकार असताना दिल्लीत एक बंगला त्या वेळी शिवसेनेत असलेल्या साखरसम्राट खासदाराला मिळाला. हा बंगला राबडीदेवी यांना पसंत होता. याची कुणकुण प्रमोद महाजन यांना लागली. त्यांनी त्या साखरसम्राट खासदाराला पटवून त्या बंगल्यावरचा हक्क सोडायला लावला व दुसरा बंगला मिळवून दिला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात स्वत: जाऊन लालूप्रसाद यादव यांच्या नावावर तो बंगला हस्तांतर केला. एवढय़ावर थांबतील ते महाजन कसले? प्रमोद महाजन स्वत: संबंधित पत्र घेऊन लालूप्रसाद यादव यांच्या घरी गेले." 
आनखी एक किस्सा मला आठवतो तो असा. भाजप चे सरकार पहिल्यांदा सत्तेवर आले तेंव्हा सुषमा स्वराज यांचेकडे दूरसंचार खात्याचा कारभार आला. सत्तेवर येताच स्वराज यांनी अखिल भारतीय काँग्रेसच्या मुख्यालय असलेल्या कार्यालयाचे दूरध्वनीचे थकित असलेले चार कोटी रुपयाचे बिल माफ केले. अर्थात यामुळे स्वराज यांच्या किंवा भाजपाच्य खिशातून एक दमदिही गेली नसून जे काही नुकसान झाले नसून जे काही नुकसान झाले ते भारतीय जनतेचे झाले आहे. जनतेच्या घामाचा पैसा राजकारणी बांडगुळाना पोसण्यासाठी आणि त्यांची ऐशआरामी जीवनशैलीची सवय भागविण्यासाठी उधळ्या जात आहे. 

वरून हे राजकारणी एकमेकाचे कट्टर वैरी वाटत असले, व एकमेकांना पाण्यात पाहत असले तरी , आतून त्यांचे साटेलोटे असते. तुम्ही आम्हाला सांभाळून घ्या आम्ही सत्तेवर आलोकी तुम्हाला सांभाळून घेऊ असा हा प्रकार. आहे. आम आदमी पक्ष्याच्या अंजली दमाणी यांनी सांगितलेला अनुभव पुरेसा बोलका आहे. त्या जेंव्हा शरद पवार यांच्याविरुद्ध तक्रार घेऊन नितीन गडकरी यांचे कडे गेल्या तेंव्हा गडकरींनी त्यांना असे उत्तर दिलेकी  शरद पवार त्यांची चार कामे करतात, मीही त्यांची दोन कामे करतो. अशी अनेक उदाहरणे देता येतील.  बरेचदा असे पाहण्यात येतेकी विरोधी पक्ष्याच्या एखाद्या नेत्याचे एखादे संसानाती प्रकरण उघडकीस येते, खूप तातडीने प्रशाकीय कारवाई होतांना दिसते. परंतु थोड्याच  दिवसात प्रकरण थंड्या बस्त्यात जाते. सभागृहात तावातावाने बोलणारी मंडळी नंतर मिठाची गुळणी तोंडात घेऊन गप्प बसलेली दिसतात.

एकूणच हा प्रकार म्हणजे तेरी भी चूप मेरी भी चूप असा आहे. कारण ही सर्व मंडळी म्हणजे एकमेकाचे मावसभाऊ आहेत आहेत. नुसते मावसभाऊ नाहीत तर ही सगळी मंडळी पुतना मावशीची मुले आहेत. पुतना मावशीची नेमणूक कृष्णाला मारण्यासाठी केली होती. या कलियुगातील पुतना मावशींच्या मुलांची नेमणूक जनतारूपी कृष्णाचे रक्त पिण्यासाठी केली आहे कि काय असे वाटते.

राजेंद्र कडू

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: