रविवार, १७ एप्रिल, २०१६

सेल्फीच्या आजारातून मुलीला वाचवा

महिलेची फेसबुकवर पोस्ट,  'सुंदर दिसण्यासाठी मुलगी राहते उपाशी.'
लँकशायरची ३४ वर्षीय वेकी वॉरथनची वेगळीच समस्या आहे. तिची मुलगी कॅटलिन (१३) 'सेल्फी'च्या इतकी आहारी गेली आहे की तिला हा रोगच जडला आहे. रोज ती शंभरावर सेल्फी काढते. नंतर फेसबुकवर शेअर करते. एवढेच नव्हे, सडपातळ सुंदर दिसावे म्हणून ती दिवसभर उपाशी राहते.
सौंदर्याचे एवढे वेड की तासनतास ती आयब्रो सेट करत असते. विविध मॉडेल्सची छायाचित्रे पाहत बसते. अनेकदा मेकअपच्या नादात ती शाळेत जायचेच विसरून जाते. वेकी तिची समजून काढून कंटाळली आहे. शेवटी तिने एका मनोविकारतज्ज्ञाला दाखवले. तरी काही फरक पडला नाही. 
शेवटी वेकीने आता फेसबुकलाच पत्र पाठवले आहे. फेसबुकवर मुलीचा फोटो टाकून एक पोस्टही लिहिली आहे. तिला आता आशा आहे की, लोकच कॅटलिनची समजूत काढतील. तिला सांगतील की, ती मेकअपविनाच खूप संुदर दिसते.
सेल्फीत खूप सुंदर दिसावे म्हणून माझ्या मुलीस वेड लागले आहे. तिच्या आरोग्यावर याचा परिणाम होत आहे. ती मेकअपविनाच सुंदर दिसते हे मलाही पटते. तिची सुंदर दिसण्यासाठी चालणारी धडपड पाहून मला वाईट वाटते. सडपातळ दिसावी म्हणून ती अक्षरश: कित्येक दिवस जेवतच नाही. शाळेतही डबा खात नाही. सतत विचारत असते, 'मी फार जाड दिसत आहे का ?' 
माध्यमेही अनेकदा तरुणींना सुंदर मुलींची छायाचित्रे दाखवून हा सेल्फीचा रोग जडवतात. बहुतांश मुलींना मॉडेल्सचे फोटो पाहून त्यांच्यासारखेच आपण दिसावे असे वाटते. हा प्रश्न आता केवळ कॅटलिनपुरता मर्यादित नाही. जगात अशा अनेक माता असतील ज्या माझ्यासारख्याच त्रस्त असतील. (दिव्य मराठी विशेष. www.epaperdivyamarathi.bhaskar.com )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: