गुरुवार, १३ मार्च, २०१४

प्रस्थापीत राजकीय पक्षांच्या उलट्या बोंबा 

केजडीवाल यांच्या मुंबई दौऱ्यामुळे मुंबईकरांची जी गैरसोय झाली त्यामुळे सर्वच  प्रस्थापित राजकीय पक्षांनी आपवर तोंडसुख घेणे सुरु केले आहे. वास्तविक पाहता सर्वच राजकीय पक्ष जे मोर्चे आंदोलने करतात. त्याचा सर्वसामान्य जनतेला नेहमीच त्रास होतो. राजकीय पक्षांनी पुकारलेले बरेचसे बंद हे स्वयंस्फूर्त नसून कार्यकर्त्यांनी दडपशाही करून यशस्वी केले जातात. त्यांनी काढलेल्या मोर्चामुळे वाहतुकीची कोंडी होते. व कधी कधी त्याला विपरीत वळण लागून हिंसाचारही होतो. मात्र सर्वच प्रस्थापित पक्षांनी जणू काही हे पहिल्यांदा झाले आहे असा कांगावा सुरु केला आहे. ज्यादा प्रवासी घेतले म्हणून ऑटोरिक्षा चालकांवर दंडाची कारवाई केली. 
अमरावती शहरातील राजकमल चौक  राजकीय पक्षांना आंदण दिला आहे. येथे धरणे, आंदोलन, मोर्चा, पुतळे जाळणे, निषेध सभा यांची वर्षभर रेलचेल असते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. व नागरिकांना प्रचंड गैरसोय होते. एसटी वाहतूक बायपास मार्गे वळवावी लागते. त्यामुळे राजापेठ, साईनगर येथून प्रवास करू इच्छीणारे किंवा तेथे उतरू इच्छिणारे प्रवासी यांचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. भरीसभर दहीहांडी उपक्रम ही राजकमल चौक किंवा राजापेठ चौक येथेच साजरा होतो. हा एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे पण तोही आता राजकीय पक्षांनी दत्तक घेतला आहे. वरील सर्व उपक्रम नेहरू मैदानात घेणे शक्य आहे. व तुमच्या आंदोलनाला पाठींबा देणारी जनता तेथेही आपली हजेरी लावेनच. मात्र इतरत्र अपेक्षित गर्दी होणार नाही या भीतीने राजकमल चौकातील फुकटचा प्रेक्षक वर्ग मिळावा म्हणून जनतेला वेठीस धरण्याचे कारण नाही. आपवर वेगवेगळ्या कारणासाठी गुन्हे दाखल करणे सुरु आहे. त्याची जी कारणे आहेत तसे गुन्हे सर्वच राजकीय पक्ष सर्रास करत असतात व तो जणू काही त्यांचा जन्मसिद्ध हक्कच आहे असे ते मानतात मात्र नवजात आपला मात्र ही   सूट नाही. मी आपचा समर्थक नाही पण तरीही स्वतः काचेच्या घरात राहणाऱ्यांनी आपच्या घरावर दगडफेक करू नये असे माझे मत आहे.
राजेंद्र कडू 
९४२३१२५२५४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: