रविवार, २३ मार्च, २०१४

जेटलींचे वक्तव्य, समस्त सुनांवर अन्याय

विश्वास पाटील यांच्या झाडाझडती या कादंबरीत एका प्रसंगाचे वर्णन आहे. धरणग्रस्तांना नवीन ठिकाणी वसवण्यात येते. या वस्तीत स्मशान नसते म्हणून प्रेतावर अन्त्य संस्कार करण्याकरिता मंडळी जुन्या महसुली गावाच्या स्मशानभूमीत जातात. मात्र त्या गावातील लोक त्यांना तेथे अंत्यसंस्कार करण्यास मनाई करतात. त्यांची स्मशान भूमी बाहेरच्या लोकांसाठी नाही असे गावकरी सुनावतात. 
वऱ्हाडात आपले वतनदारी गाव सोडून दुसऱ्या गावात रहायला जाणाऱ्याना आसामी असे संबोधण्यात येते व ते दुय्यम दर्जाचे मराठे आहेत असे समजण्यात येते. आता या परिस्थितीत फरक पडला असण्याची शक्यता आहे. मात्र अशा या बाहेरच्या मंडळींना गावाच्या राजकारणात लुडबुड करू न देण्याची दक्षता मुळची  तेथील वतनदार मंडळी घेत असतात. मात्र गावात लग्न होऊन सासरी आलेल्या सुना मात्र याला अपवाद ठरतात. आता महिलांसाठी मोठ्या प्रमाणात सरपंचपदे राखीव झाल्यामुळे राजकारणी मंडळी मोठ्या आनंदाने आपल्या सुनांना सरपंचपदासाठी पुढे करताहेत. त्या आपल्या गावाच्या मुळ रहिवाशी नाहीत, उपऱ्या आहेत अशी कुणाच्याही मनात शंका येत नाही. मात्र या साठी जेटली यांनी मात्र हरकत घेतली आहे. लग्न होऊन सासरी आलेल्या स्त्रीला परके मानण्याची पद्धत भारतीय संस्कृतीत नाही. मात्र जेटली ज्या पक्षाचे नेते आहेत तो पक्ष भारतीय संस्कृतीचे कितीही गोडवे गात असला तरी प्रत्यक्षात मात्र त्याची वागणूक तालिबानी दिसून येत आहे. महिलांवर शारीरिक हल्ले करणाऱ्या श्रीराम सेनेच्या प्रमुखाला भाजपमध्ये प्रवेश देऊन लगेच त्याची हकालपट्टी करण्याची नामुष्की भाजपवर आलेली आहे. राष्ट्रपतीपदी एक महिला प्रतिष्ठापूर्वक निवडून येऊ नये म्हणून त्या निवडणुकीला ग्रामपन्चायतीच्या निवडणुकीचे  स्वरूप या पक्षाने आणले होते. सोनिया गांधीवरही भाजपने गेल्या दहा पंधरा वर्षात भरपूर शाब्दिक हल्ले केले. त्यांना पांढऱ्या पायाची म्हणण्यापर्यंत मजल गेली.  पण भारतीय संस्कृतीची बूज असलेल्या भारतीय मतदारांनी भाजपच्या कोल्हेकुईकडे दुर्लक्ष केले व दोनदा काँग्रेसला विजयी केले. मात्र भाजपला आपले काहीतरी चुकते आहे असे कधीच वाटत नाही व आपला जुनाच फार्म्युला ते पुन्हा पुन्हा वापरत आहेत. जेटलींच्या ताज्या वक्तव्यामुळे समस्त भारतीय सुनांचा अवमान झाला आहे.
राजेंद्र कडू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: