रविवार, ९ मार्च, २०१४

कचऱ्याची नव्हे, लाकडाचीच होळी पेटवा 

होळी जवळ आली आहे. पर्यावराणवाद्यांची वृक्ष तोड न करण्यासम्बम्धी आवाहने वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध होत आहेत. काही मंडळी लाकडांऐवजी कचऱ्याची होळी करण्याचा सल्ला देतांना दिसत आहे. वरील दोन्ही सल्ले चुकीचे आहेत असे माझे मत आहे. शहरी  भागात जो कचरा निर्माण होतो तो त्याचे विघटनशील व गैरविघटनशील असे दोन प्रकार आहेत. विघटशील कचरा जाळणे चुकीचे आहे कारण त्यापासून उत्कृष्ट प्रकारचे खत तयार होऊ शकते व ते आपण आपल्या फुलझाडांसाठीसाठी व परसबागेसाठी वापरू शकतो. विघटनशील कचरा जाळणे म्हणजे जमिनीची सुपीकता पणाला लावणे होय. घरगुती विघटनशील कचऱ्याचे खत बनवून ते शेतकऱ्याकडे कसे पोहोचेल हे पर्यावरणवाद्यांनी पाहायला पाहिजे. गैरविघटनशील कचऱ्यामध्ये जास्त करून प्लास्टीकचा  समावेश असतो व प्लास्टिक जाळल्यावर  जो धूर निघतो त्यामुळे  मोठ्या प्रमाणावर घातक विषारी वायू हवेत सोडल्या जातात व वायू प्रदूषण होण्याची शक्यता असते. त्या मुळे प्लास्टिक जाळणे म्हणजे वायू प्रदूषणात भर घालणे होय. 
दुसरा मुद्दा आहे वृक्षतोडीचा. होळीसाठी झाडे मुळापासून मुळीच तोडली जात नसून केवळ झाडाच्या फांद्याच तोडल्या जातात. व कुठल्याही मोठ्या झाडाची फांदी तोडली तर झाडाचे काहीही नुकसान होत नाही. उलट " कि तोडता तरु फुटे आणखी भराने " या उक्तीनुसार झाडाला पूर्ववत नवीन फांद्या येतात. दरवर्षी शेतकरी पावसाळ्यापूर्वी शेताच्या बांधावरील कडूनिंबाच्या व तत्सम मोठ्या झाडाच्या सर्व फांद्या तोडून फक्त झाडाचा शेंडा तेवढा ठेवतात. याचे कारण असे की  पिकांचे नुकसान करणारया माकडांना उंचावर आसरा घेता येऊ  नये म्हणून . कारण झाडांवर बसलेल्या माकडांना हुसकावून लावणे जिकीरीचे असते. आणि अशी ही संपूर्ण छाटलेली झाडे पुढील उन्हाळ्यापर्यंत पूर्ववत वाढलेली असतात.  लाकडांची होळी पेटविण्याचे समर्थन आणखी एका गोष्टीसाठी करता येईल. ते असे की लाकूड हे कुठलीही गुंतवणूक न करता पुनर्निर्माण करता येण्यासारखी वस्तू आहे. कुठलेही वृक्षारोपण न करता असंख्य झाडे दरवर्षीच उगवत असतात आणि कुठलेही खतपाणी न देता व मशागत न करता ती केवळ मोफत मिळणाऱ्या सूर्यप्रकाशाचा वापर करून मोठी होत असतात. गरज आहे ती एकाच गोष्टीची ती म्हणजे त्यांची पूर्ण वाढ होईपर्यंत त्यांची गुरे व कुऱ्हाड  यांच्या पासून संरक्षण करण्याची. पूर्ण वाढ झालेले झाड छाटायला काहीच हरकत नाही. म्हणजे मुद्दल राखून नुसत्या व्याजावर आपली होळी साजरी करता येईल. मुळात सरकार दरवर्षी जी वृक्षारोपणाची मोहीम राबविते त्याची काहीच गरज नाही. दरवर्षी पक्षी व गुरेढोरे यांची विष्ठेद्वारे बीजारोपण होत असते व झाडे उगवत असतात. त्या झाडांचे संरक्षण केले तरी महाअरण्ये  उभी राहू शकतात. होळीचे केवळ नावच बदनाम केले आहे. आमच्या घरातील सुंदरआकर्षक भपकेबाज सागवानाचे फर्निचर हे जंगल तोडीला कारणीभूत आहे. आम्हाला शहरात सिमेंट कॉन्क्रीटचे 'जंगल' उभारायचे असते व त्यासाठी लागणारया पक्क्या विटा भाजण्याकरीता जी भट्टी धगधगत असते त्यामुळे खरी जंगले उजाड बनताहेत. वर्षातून एकदा येणाऱ्या होळीविरुध्द कांगावा करण्यापूर्वी थोडे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
माझ्या या युक्तीवादा वरून मी कुणी प्रखर हिंदुत्ववादी वगैरे असेल असा आपला गैरसमज झाला असेल तो कृपया मनातून काढून टाका. साप साप म्हणून भुईला धोपटणे सुरु आहे व कचरा जाळा म्हणून जो उफराटा सल्ला दिल्या जात आहे म्हणून ही दुसरी बाजू समोर मांडत आहे. 
राजेंद्र कडू