शुक्रवार, २७ जून, २०१४

चीनची नेत्रदीपक प्रगती अत्याचारी पायावर चीनने अनेक क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली असली तरी त्यामागे मानवी अत्याचारांच्या अनेक कथा दडलेल्या आहेत. इंग्लंडमधील एका महिलेने खरेदी केलेल्या पँटच्या जोडीत तिला एक चिठ्ठी सापडली, त्यात पिवळ्या रंगाच्या कागदावर असे लिहिले होते की, चीनमधून कपडय़ांची निर्यात होते; पण हे कपडे आमच्यासारख्या तुरूंगातील कैद्यांकडून रोज पंधरा तास मान मोडेस्तोवर काम करून घेऊन तयार केले जातात.
या चिठ्ठीत म्हटले होते की, एसओएस, एसओएस, एसओएस मध्य चीनमधील हुबेई प्रांतातील झिंगनान तुरूंगातील आम्ही कैदी आहोत. बराच काळ आम्ही निर्यातक्षम कपडय़ांची निर्मिती करीत आहोत. रोज आम्ही पंधरा तास काम करतो. डुकरे किंवा कुत्री खाणार नाहीत असे अन्न आम्हाला देतात. बैल व घोडय़ासारखे आमच्याकडून काम करून घेतात. आम्ही तुम्हाला विनंती करतो की, चीनच्या या अमानवी कृत्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर निषेध करा.
उत्तर आर्यलडमध्ये राहणाऱ्या कॅरेन विसिनस्का यांनी प्रीमार्कच्या बेलफास्ट स्टोअरमधून २०११ मध्ये या पँट किंवा ट्राउझर्स खरेदी केले होते. त्यानंतर त्यांनी त्यांचा वापर केला नाही व कपाटात ठेवून दिल्या. त्यानंतर एकदम गेल्या आठवडय़ात सुटीवर जाताना त्यांनी कपडे भरण्यास सुरूवात केली असता त्यांना ही चिठ्ठी सापडली. त्यांना या अन्यायामुळे धक्का बसला. त्या चिठ्ठीत काय लिहिले आहे हे त्यांनी इंग्रजीत भाषांतर करून घेतले व नंतर ही सगळी बाब अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलला कळवली. अ‍ॅम्नेस्टीचे उत्तर आर्यलडमधील संचालक पॅट्रिक कोरिगन यांनी सांगितले,की ही भयानक गोष्ट आहे. चिठ्ठी खरी आहे की खोटी हे ठरवणे अवघड आहे, पण चीनमध्ये चालणाऱ्या अत्याचारांबाबत हे हिमनगाचे टोक असावे. प्रायमार्कच्या प्रवक्तयाने सांगितले,की आम्ही याची चौकशी सुरू केली आहे. कपडे नेमके कुठून येतात याबाबत अलिकडे जागरूकता पाळली  जात आहे. बीबीसीला दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, चार वर्षांपूर्वी विकलेल्या कपडय़ांबाबतची ही गोष्ट आता उघडकीस यावी याचे आश्चर्य वाटते. आता त्या महिलेकडून ते कपडे परत घेऊन चौकशी केली जाईल. पाश्चिमात्य ग्राहकांना अन्यायाबाबत चिठ्ठय़ा सापडल्याचा हा पहिला अनुभव नाही, तर २०११ मध्ये अमेरिकेत तोडक्या-मोडक्या इंग्रजीत लिहिलेली एक चिठ्ठी सापडली होती. ती चीनमधून आलेल्या हॅलोवीन सजावटीच्या साहित्यात ठेवलेली होती. 'आम्हाला अतिशय वाईट अवस्थेत काम करावे लागते, आमची छळवणूक होते,' असे चिनी कामगारांनी त्यात म्हटलेले होते, असे सीएनएनने म्हटले आहे.(लोकसत्ता दिनांक २८/०६/२०१४)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: