शुक्रवार, ६ मार्च, २०१५

अल्प किंमतीत विकत घेतलेल्या अत्यंत खडकाळ जमिनीत मेहनतीने व सयंमाने पेरलेल्या डाळींबाने चिखलीच्या गुप्ता परिवाराला यंदा कोट्यवधी रुपयाचे भरघोस उत्पन्न दिले आहे. या डाळिंबांची आखात आणि बांगलादेशात निर्यात होत आहेत. सतिश व जोत्स्ना गुप्ता परिवाराने डाळींब शेतीत हे जे यश प्राप्त केले आहे. ते विदर्भाच्या आत्महत्या ग्रस्त भागासाठी यशाची एक नवी दिशाच ठरावी असे आहे.
 बुलढाणा जिल्ह्यातील चिखली गावातील ज्योत्स्ना गुप्ता आणि त्यांचे पती सतिश गुप्ता यांनी ही किमया करून दाखवली आहे. सतिश गुप्ता चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष आहे. ज्योत्सनाताईंना शेतीची आवड होतीच पण फार माहिती नव्हती. सासरी त्यांना शेती कळायला लागली. सासरेबुवांमुळं शेतीतले बारकावे समजले. पती बँकेच्या कामात व्यस्त होते. मग त्यांनी स्वत: शेतीत उतरायचं ठरवलं.

 dalimb
 पती सतिश गुप्तांनी त्यांना २००० साली चिखली जवळ साडेसतरा एकर शेती घेऊन दिली. जमीन खडकाळ होती. त्यात काही वर्ष त्यांनी इतर पिकं घेतली, पण त्यात फार यश आलं नाही. शेवटी डाळिंब लावायचा निर्णय झाला. २००७ साली त्यांनी १२ एकरात भगवा जातीची डाळींब लागवड केली. घरच्या सधन असल्यानं यासाठी लागणारं सर्व भांडवल ज्योत्स्नाताईंना त्यांच्या पतीनं दिलं. ज्योत्सना गुप्ता यांनी दोन बाय दोनच्या खड्ड्यात डाळींबाची लागवड केली. त्याआधी प्रत्येक रोपाला १० किलो कोंबडीखत, ५० किलो शेणखत आणि निंबोळी भुकटी, ५०० ग्रॅम डीएपी, १०० ग्रॅम सुपर फॉस्फेट , १०० ग्रॅम 4-8 आणि १०० ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट टाकलं. त्यानंतर आठ बाय १२ फूट अंतरावर रोपांची लागवड केली. दोन वर्षांनी त्यांनी पहिली छाटणी केली. सेंद्रीय खतांवर जास्त भर दिला. लागवडीनंतर २६ महिन्यांनी उत्पादनाला सुरुवात झाली. झाडं मजबूत व्हावीत म्हणून पहिल्या वर्षी त्यांनी फारसं उत्पादन घेतलं नाही. प्रति झाड २० ते २५ किलो फळं घेतली. सुरुवातीला व्यवस्थापनासाठी ज्योत्सना ताईंना अनेक अडचणी आल्या. त्यावर मात करत त्यांनी बाग जगवली.
 एकरी ४०० झाडं याप्रमाणे १२ एकरात चार हजार ८०० झाडं आहेत. य़ोग्य खत आणि फवारणीच्या नियोजनामुळे प्रत्येक फळ ५०० ग्रॅम पेक्षा जास्त वजनाचं आहे. सध्या प्रत्येक झाडाला साठ किलोंपर्यंत फळं लागलेय. दर्जा चांगला असल्यामुळे ज्योत्सना गुप्तांना डाळिंब निर्यात करणं शक्य झालं. यंदा पहिल्यांदाच त्या आपल्या बागेतली डाळिंब निर्यात करत आहे, लागवडीनंतर हेच त्यांचं खरं उत्पादन आहे. आखाती देश आणि बांगलादेशात त्यांच्या डाळिंबाला मागणी आहे. व्यापाऱ्यांना त्यांनी
 प्रति किलो ६० रुपये दरानी फळं विकलीय. त्यानंतर व्यापारी डाळिंबाची निर्यात करणार आहे. प्रति झाड ३६०० रुपये त्यांना उत्पन्न मिळणार आहे. म्हणजेच १२ एकरातून त्यांना साधारण एक कोटी ७२ लाख रुपये उत्पन्न मिळणार आहेत. प्रति झाड व्यवस्थापनासाठी त्यांना ८०० रुपये असा ३८ लाख रुपये उत्पादन खर्च आला. हा खर्च वजा करता यंदा त्यांना एक कोटी ३५ लाखांपर्यंत उत्पन्न मिळणार आहे.
 ठिबक, खतं आणि पाणी व्यवस्थापन, वातावरणातील बदलानुसार फवारणीचं नियोजन ज्योत्स्नाताईं करतात. त्यांना कीड-रोगांबद्दल माहीती नसल्यास त्या तज्ञांचा सल्ला घेतात. याच प्रकारे त्यांनी आपली बाग जपलीय. आणि विदर्भाच्या खडकाळ जमिनीत एकरी ११ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न घेऊन दाखवलं. महिलांना व्यवस्थापन चांगलं जमते.
 ज्योत्स्नाताईही आपलं व्यवस्थापन कौशल्य शेतीत वापरलं. म्हणूनच त्यांनी आपल्या घरच्या नियोजनासोबतच शेतीचंही चांगलं नियोजन केलं आणि इतर महिलांसमोर एक आदर्श निर्माण करुन दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: