रविवार, १ मार्च, २०१५

त्यांच्या (गडकरी) वैयक्तिक सहलीबद्दल कोणी काही बोलायचे कारण नाही. या पाहुणचाराला प्रचलित कायद्यानुसार भ्रष्टाचारही म्हणता येणार नाही; पण एक गोष्ट नक्की की, ते 'पूर्ती' प्रकरणातील कथित अवाजवी प्रकारांचा बभ्रा झाल्यानंतर पायउतार झालेले अध्यक्ष होते. त्या वेळेला पायाभूत सुविधा क्षेत्रातील एका कंपनीचे व त्यांचे संबंध असल्याचा आरोप झाला होता. त्याचबरोबर ते भाजपचे ज्येष्ठ नेतेही होते. त्या सुमारास देशातील वातावरण असे होते की, एखादे शेंबडे पोरही लवकरच होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजप व मित्रपक्षांचे सरकार येणार हे समजून होते. तसे नसते तर खुद्द गडकरींनीच आयकर अधिकाऱ्यांना 'आमचे सरकार आल्यावर तुम्हाला वाचवण्यास कोणी चिदम्बरम वा सोनिया गांधी असणार नाहीत..' असा बालिश दम मुजोरपणाने दिला नसता. हे लिहावयाचा उद्देश हाच की, गडकरींनी कितीही वेड पांघरून पेडगावला जायचा प्रयत्न केला तरी ज्या वेळेस त्यांनी हा पाहुणचार स्वीकारला त्या वेळेस ते येऊ घातलेल्या सरकारात एक वजनदार मंत्री असणार हे जे सर्वाना कळत होते, ते रुईयांना समजत नव्हते, असे म्हणणे वेडेपणाचे ठरेल. गडकरी यांनी म्हटले आहे की, त्यांचे आमचे गेल्या २५ वर्षांचे संबंध आहेत व ते आमचे मुंबईत अनेक वर्षांचे शेजारी आहेत. पण गंमत अशी की, एस्सार समूहाच्या अध्यक्षांच्या कार्यालयातून नौकेच्या कप्तानाला पाठवण्यात आलेल्या ई-मेलमध्ये या 'शेजारधर्माचा' उल्लेख नसून त्यात गडकरी हे भाजपचे माजी अध्यक्ष आहेत, असा उल्लेख आहे.-अॅड. विजय त्र्यंबक गोखले, डोंबिवली(लोकसत्ता)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: